सुधीर लंके, निवासी संपादक, लोकमत, अहमदनगर
दोन बॅरिस्टर मुख्यमंत्री व त्यांना भिडणारे आठवी पास विरोधी पक्षनेते, हा संघर्ष राज्यातील नवीन पिढीने पाहिलेला नाही; पण राज्याच्या प्रगल्भ राजकीय संस्कृतीचे हे ठळक उदाहरण आहे. चळवळीतून साकारलेले नेतृत्व किती कसदार असते हे यातून दिसते. हा इतिहास बबनराव ढाकणे यांच्या निधनामुळे आज राज्याला पुन्हा एकदा आठवला असेल.
अहमदनगर जिल्ह्यातील ढाकणे हे १९८१-८२ मध्ये विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. या काळात अ. र. अंतुले व बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री होऊन गेले. दोघेही बॅरिस्टर. त्यांच्याशी ढाकणे संसदीय आयुधे वापरून वैचारिक संघर्ष करत. ढाकणे यांचा पिंडच लढाऊ दिसतो. पाथर्डी येथे शिक्षण घेताना वसतिगृह अधीक्षक रागावले म्हणून वयाच्या चौदाव्या वर्षी ते एसटीने मुंबईला गेले. तेथून विनातिकीट दिल्लीला जात थेट पंडित नेहरूंना भेटले. ही दंतकथा वाटावी; पण हाच मुलगा मोठेपणी खासदार, मंत्री म्हणून दिल्लीत पोहोचला.
तालुक्यातील प्रश्न सुटत नाहीत म्हणून १९६८ साली विधानसभेच्या गॅलरीतून त्यांनी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांवर पत्रके भिरकावली होती. हा विधानसभेचा मानभंग होता. त्यांनी सभागृहाची माफी मागावी, असा प्रस्ताव आला. मात्र, माफी न मागितल्याने त्यांची रवानगी आठ दिवस ऑर्थर रोड जेलमध्ये झाली. लगोलग नाईकांनी पाथर्डीच्या समस्याही जाणून घेतल्या. १९७२ च्या दुष्काळात ढाकणे पंचायत समितीचे सभापती होते. लोकांच्या हाताला काम नव्हते.
पुन्हा मुंबई गाठत नाईकांसमोर वस्तुस्थिती मांडली. त्यातून पाझर तलाव, नालाबंडिंग, रस्ते ही कामे सुरू होऊन सत्तर हजार लोकांना रोजगार मिळाला. इंजिनिअरची कमी होती म्हणून दहावी पास मुलांना तलाव व बंडिंगची आखणी कशी करायची हे शिकविले गेले. दुष्काळाशी लढाई करणारा हा पॅटर्न पाहण्यासाठी इंदिरा गांधी त्यावेळी पाथर्डीत आल्या होत्या. नाईकांवर विधानसभेत पत्रके भिरकावली; पण त्यांनीच प्रश्न सोडविले म्हणून त्यांचा पाथर्डीत पुतळा उभारण्याचा निर्णय ढाकणेंनी घेतला. विशेष म्हणजे, नाईकांनीच पुतळ्याचे अनावरण करावे, असा प्रस्ताव ठेवला. स्वत:च पुतळ्याचे अनावरण करणे ही नाईकांची परीक्षाच होती. म्हणून मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण अनावरणाला आले.
ज्या विधानसभेने ढाकणेंना शिक्षा दिली त्याच सभागृहात ‘पुलोद’ सरकारच्या काळात १९७८ ला ते आमदार म्हणून पोहोचले. शरद पवारांच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले. पुढे विरोधी पक्षनेता झाले. जनता पक्षाच्या स्थापनेपासून ढाकणे त्या पक्षात होते. प्रदेशाध्यक्षही झाले. वीस वर्षांचा कालखंड त्यांनी विधिमंडळात काढला. जनता पक्ष विभागल्यानंतर बीड लोकसभेची जागा जनता दलाकडे गेली. त्यावेळी १९८९ साली ते बीडमधून केशरकाकू क्षीरसागर यांच्याविरुद्ध लढले व जिंकले. चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळात ते कोळसा व ऊर्जा राज्यमंत्री झाले.
मंडल आयोगाच्या मागणीसाठी त्यांनी १९८३ साली विधानसभेत राजदंड पळविला होता. १९७७ साली बेरोजगार तरुणांचा मोर्चा काढला. पुढे मंत्री झाल्यावर त्यांच्यासाठी शंभर रुपये बेकारभत्ता मंजूर करण्याचा आग्रह धरला. शेती, सिंचन, ऊसतोड कामगार, सहकार, शिक्षण, ऊर्जा असे अनेक प्रश्न त्यांनी मांडले. अपक्ष, काँग्रेस, जनता पक्ष, पुन्हा काँग्रेस व शेतकरी विचारदल असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. १९९४ साली ते दुग्धविकासमंत्री झाले. त्यावेळी त्यांनी गुजरातच्या आनंद डेअरीच्या धर्तीवर महिलांचे सहकारी दूध संघ सुरू करण्याचा निर्णय घेतला.
‘लोकमत’च्या एका मुलाखतीत ते म्हणाले होते, ‘आमची पिढी फारशी शिकली नव्हती; पण आम्ही सतत लोकांमध्ये राहून शिकलो. समाजाचाही आमच्यावर धाक होता. आता असा धाक कमी होतोय. सत्ताधारी लोकशाहीची दमकोंडी करताहेत तर विरोधक त्यांच्याशी जुळवून घेताहेत’...