राजकारणाचे एकमेव लक्ष्य सत्ता हेच असते आणि ती मिळविण्यासाठी नेत्यांना नको तशा लटपटी व खटपटी कराव्या लागतात. त्या करताना आपली वैचारिक निष्ठा निदान दिखाव्यापुरती तरी जपता येणे हे चांगल्या नेतृत्वाचे लक्षण ठरते. मात्र निष्ठा गुंडाळून ठेवून खुर्चीसाठी तडजोडी पत्करणाऱ्यांचे पुढारीपण नुसते उथळच नव्हे तर लाचारही दिसत असते. त्याचवेळी दुसरीकडे सत्तेसाठी नवी दैवते डोक्यावर घेण्याचे राजकारणही चालत असते आणि त्याचे उथळपणही ते करणाऱ्याच्या ढोंगांवर प्रकाश टाकत असते. परवापर्यंत जी माणसे आपल्याकडे पाहत वा फिरकत नव्हती ती एकाएकी भलत्याच भक्तिभावाने आपल्या दिशेने येत असलेली पाहून दैवतेही चकित होत असतात. असे आश्चर्य व अचंबा आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या वाट्याला येत असणार. परवापर्यंत त्यांचे निष्ठावंत अनुयायी (त्यांना ते प्रेमाने ‘माय क्राउड’ असे म्हणत) त्यांच्या दर्शनाला येत. त्यांच्या खांद्यांवर निळे झेंडे असत. क्वचित त्यात काही तिरंगेही असायचे. आताच्या त्यांच्या दर्शनार्थ्यांत खांद्यावर भगवे झेंडे घेतलेली माणसे दिसली तेव्हा तो अनेकांसारखा बाबासाहेबांनाही चमत्कारच वाटला असणार. पूर्वी यशवंतरावांच्या कारकिर्दीत भीमशक्ती आणि शिवशक्ती यांच्या एकत्रीकरणाचे नारे उठले. त्या काळात त्या निळ्या झेंडेकऱ्यांमध्ये काँग्रेसचे झेंडेकरीही दिसू लागले. यशवंतराव दिल्लीला गेले आणि तो प्रकार थांबला. त्यानंतरच्या काळात स्वत:ला बाबासाहेबांचे म्हणविणारे अनेकजण वेगवेगळ्या पक्षांच्या पारंब्यांना लोंबळकताना दिसले. त्यांच्यातल्या काहींनी त्यांचे निळे झेेंडेही त्या पक्षांच्या झेंड्यांना बांधलेले आढळले. मात्र त्यातल्या कोणाही सोबत राहून आपल्याला सत्तेच्या अडणीवर बसता आले नाही हे लक्षात येताच जो पक्ष सत्तेच्या जवळ असेल वा सत्तेची खुर्ची देऊ शकत असेल त्याच्या दिशेने सरकणे हाच त्यांनी आपला मुत्सद्दीपणा मानला. त्यातून रिपब्लिकन हा प्रादेशिक पक्ष असल्याने व महाराष्ट्राबाहेर त्याला अस्तित्व नसल्याने त्याच्या कोलांट्यांनाही मर्यादा होती. त्यांना सोबत घेऊ इच्छिणाऱ्यांनाही ती चांगली ठाऊक होती. मग आठवले काँग्रेस व राष्ट्रवादी असा प्रवास करून भाजपाच्या वळचणीला गेले. प्रकाश आंबेडकर आत असले वा बाहेर राहिले तरी त्यांना त्यांची ताकद एका छोट्या प्रादेशिक मर्यादेपर्यंतच वाढविता येते शिवाय त्यांना स्वबळावर आपली माणसे निवडूनही आणता येत नाहीत हेही इतरांना कळतच होते. भाजपाची हुशार माणसे ती मर्यादा ओळखत असल्याने त्यांनी यांचे दैवतच डोक्यावर घेण्याचे ठरविले. तसे करताना आपली आंबेडकरभक्ती तुमच्याहून श्रीमंत व जास्तीची राष्ट्रीय असल्याचे दाखविणेही त्यांना शक्य होते. मग काँग्रेससोबत राहून प्रथम कुलगुरु व नंतर योजना आयोगाचे सभासदत्व मिळविणारे ज्ञानी लोकही भाजपासोबत नीती आयोगावर गेले आणि ‘हेडगेवार व आंबेडकर यांच्यातला सेतू बनण्याची’ कविता लोकांना ऐकवू लागले. पुढे इंदू मिल आली आणि मोदी दीक्षाभूमीवर गेले. त्यांची आंबेडकरी श्रद्धा खोटी आहे असे कोण म्हणेल? आंबेडकर हे काही एका समाजाचे वा पक्षाचे नेते नव्हते. ते गांधीजींसारखे साऱ्या देशाचेच मार्गदर्शक पुढारी होते. भाजपावाल्यांच्या आताच्या आंबेडकरी निष्ठेला फारतर नवी व ताजी म्हणता येईल, खोटी म्हणता येणार नाही. शिवाय जे ताजे असते ते जरा जास्तीचे आकर्षकही असतेच. परिणामी आपले लोक नेमके कोण, आपले पुढारी खरे कोणते आणि आपण कुणासोबत जायचे असे प्रश्न आंबेडकरांच्या नव्या अनुयायांना पडत असतील तर ती त्यांची चूकही नव्हे. काँग्रेसविरोध हा त्यांचा धोरणाचा एक महत्त्वाचा मुद्दा असल्याने तिरंग्याकडे फिरकायचे नाही आणि तांबडे आपले नव्हेत हे आंबेडकरांनीच सांगितलेले. हिरव्यांजवळ जायचेच नव्हते मग उरले कोण? भगवे. यातले साऱ्यांचे नाइलाज, सर्वांच्या मर्यादा, काहींचे सामर्थ्य व काहींचा जबर नाट्यधर्म कळणारा आहे. यातला खरा प्रश्न लाभाचा वा तोट्याचा नाही. आपली माणसे कधीतरी सत्तेवर यावी असे बाबासाहेबांनाही वाटत होते. फक्त तसे जाण्यासाठी त्यांनी आपला विचार, भूमिका व आपला स्वाभिमान सोडावा असे मात्र त्यांना कधी वाटले नाही. पण बाबासाहेबांना जाऊन आता सत्तर वर्षे झाली. त्यांचा ‘क्राउड’ तसाच एकनिष्ठ असला तरी त्याचे पुढारी वर्तमानात जगणारे व राजकारणात सत्ताकांक्षी नसले तरी पदाकांक्षी झालेले. त्यांनी तसे होणे यात गैर काही नाही. मग त्यांच्यातून सुरू झाले ते मेंढ्यांचे राजकारण. पुढच्या मेंढ्या ज्या मार्गाने जातात त्यावरूनच मग मागचा कळपही जाऊ लागतो. त्यातली काही हुशार कोकरे वेगळ्या मार्गांचाही विचार करतात. पण कळपाच्या भक्तीमार्गाहून त्यांचा एकला मार्ग नेहमी नगण्य ठरतो. बाबासाहेबांच्या पश्चात त्यांच्या तोलाचा नेता त्यांच्या संघटनेला व वर्गाला सापडू नये हे त्यांचे व देशाचेही सामाजिक दुर्दैव आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या वर्गाची सुरू असलेली होलपट अशी आणि त्यावर आपले राजकारण उभे करू पाहणारे पक्ष असे आहेत. या स्पर्धेत बलवंतांची सरशी होणार हे उघड आहे. फक्त त्यांच्या सामर्थ्याचे आकर्षण आपल्याला आंबेडकरांपासून किती दूर नेते हाच यासंदर्भात सर्वसंबंधितांच्या काळजीचा असा विषय.
बाबासाहेबांचे नवे यात्रेकरू
By admin | Published: April 18, 2017 1:19 AM