बाबुराव भसाडे पोलीस शिपाई एवढीच मर्यादित त्यांची ओळख नव्हती. अजस्र, महाकाय लोंबकळलेले पोट... चरबीमध्ये मान लुप्त झाल्यानं मुंडकं हे थेट धडावर चिटकवल्यासारखं... हत्तीरोग झाल्यासारखे जाडजूड पाय अशी बाबुरावांची एकूण शरीराकृती असल्याने त्यांना जाड्या बाबुराव, ढोल्या बाबुराव, हत्ती, मोठेराव अशा असंख्य शेलक्या शब्दांनी हाका मारल्या जायच्या. आपण बाबुरावांना देहयष्टीवरून जी विशेषणे जोडतो त्यामुळे त्यांच्या मनाला किती डागण्या लागत असतील, याची कुणीच पर्वा करीत नसे. बाबुरावला नेहमीच साईड पोस्टिंग दिले जायचे. बंदोबस्त लावला तरी व्हीव्हीआयपी रुटवर न ठेवता आडबाजूला गल्लीबोळात बाबुरावची ड्युटी लावली जायची.बाबुराव इतरांएवढाच आहार घेत असला तरी त्याच्या पानात दोन चपात्या जास्त वाढून किंवा पानावर दोन लाडू एकदम वाढून बाबुराव खा बिनधास्त. एवढ्या मोठ्या पोटात हे कुठल्या कुठं जाईल, असं हिणवलं जायचं. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये बाबुरावचा समावेश करताना एखाद्या चित्ररथावर त्याचे पोट झाकले जाईल, अशा पद्धतीनं केला जायचं. बाहेरचे सोडा अगदी घरचेही बाबुरावला त्याच्या जाडेपणावरून हिणवत. बाबुरावची पत्नी कौसल्या ही काही बारीक नव्हती. पण माळ्यावरून डबा काढायचा तर बाबुरावांना जाऊ द्या, तुम्हाला झेपायचं नाही, असं बोलून त्यांच्या हातून डबा हिसकावून घ्यायची. बाबुरावनं जीम सुरू केली. मात्र वजन फारसे न घटल्याने सहा महिन्यात ट्रेनरने बाबुरावांना टाळायला सुरुवात केली. बाबुरावच्या जीममधील कसरतींची मित्रमंडळींनी खिल्ली उडवली. बाबुरावांनी डाएटिंग सुरू केले. मात्र वेळीअवेळी ड्युट्या आणि तुटपुंजा पगार यामुळे तेही शक्य झाले नाही. निराशेच्या गर्तेत सापडलेल्या बाबुरावांचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यावर अश्लाघ्य प्रतिक्रियांचा अक्षरश: पाऊस पडला. फेसबुकवरील वडिलांच्या सोबत फोटोवर पडणाऱ्या कॉमेंटसनी त्यांच्या मुलीला अक्षरश: रडू कोसळले. सर्वात कडी केली ती एक लेखिकेनी. बाबुरावांच्या फोटोवर ‘हेवी बंदोबस्त इन मुंबई टुडे’, असे टिष्ट्वट तिने केले. दिवसभरात अनेकांनी री टिष्ट्वट केले. बाबुराव, तू तर फेमस झालास, असं म्हणून अनेकांनी दिवसभरात त्याची रेवडी उडवली. हे पोट फाडून, कापून टाकावं, असा विचार मनात आला तोच बाबुरावने इमान अहमदवरील बॅरिएट्रीक सर्जरीची बातमी वाचली. लागलीच बाबुरावने डॉक्टरांना गाठलं. गावाकडील जमिनीचा तुकडा विकून बाबुरावने शस्त्रक्रिया करून घेतली. बाबुरावचे वजन कित्येक किलोनी कमी झाले. जो तो त्याचे कौतुक करू लागला.एक दिवस बाबुरावच्या घराचा दरवाजा वाजला. दरवाजात उभी व्यक्ती वाहिन्यावरील सिरीयलची निर्माती होती. त्यांच्याकडे बाबुरावचा जुना लठ्ठ फोटो होता. बाबुराव किधर है. आम्ही ‘तारक मेहता’मधील हाथीभाईंना घेऊन एक दोनशे एपिसोडची सिरीयल काढणार होतो. पण ते निवर्तले. आम्हाला बाबुरावांना साईन करायचे होते. हा सायनिंग अमाऊंटचा चेक. रक्कम पाहून बाबुरावचे डोळे पांढरे झाले. आपल्या खाली बसलेल्या पोटावर हात फिरवत बाबुराव खट्टू झाले.
(तिरकस)