- सचिन जवळकोटे
राजकीय नेत्यांनी सार्वजनिक जीवनात कसं वागावं, यावर लोकांचं बारीक लक्ष असतं. कदाचित ही जनअपेक्षाही समजण्याजोगी; मात्र नेत्यांच्या खाजगी जीवनातील पेहरावाचाही जोरदार गाजावाजा सोशल मीडिया करू लागतो, तेव्हा मात्र प्रकटतं आश्चर्य. हाच विषय बनतो ‘लगाव बत्ती’च्या वाचकांसाठी चर्चेचा.
‘नानांची टांग’ हा सोलापुरी भाषेतला अस्सल झणझणीत शब्द. समोरच्याला पुरतं अपमानित करणारं गावरान वाक्य. मात्र ‘नानांची पॅन्ट’ गाजू लागते, तेव्हा दिसते पंढरपूरच्या इरसाल राजकारणाची झलक. होय...चार-पाच दिवसांपूर्वी पंढरपूरकरांच्या मोबाईल स्क्रिनवर एकच फोटो झळकलेला. शर्ट अन् पॅन्टीतल्या ‘भारतनानां’चा चेहरा हजारो डोळ्यांनी कौतुकाश्चर्यानं न्याहाळलेला.
कुणी म्हणालं, नानांचा हा लंडनमधला ड्रेस. कुणाला वाटलं, नेहमीच्या कलकत्ता टूरमधला वेश. या साºया कॉमेंटस् पाहून नानांची जवळची माणसं हबकली. अनेकांना वाईट वाटलं. ‘आपल्या नेत्यानं पर्सनल लाईफमध्ये कोणता ड्रेस घालावा, याची सार्वजनिक चर्चा करणारी गरजच काय?’ असा उद्विग्न सवाल त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केला गेला.
खरंतर, नानांनी नेहमीची गांधी टोपी अन् पांढरीशुभ्र खादी सोडून असले कपडे का परिधान केले हे खूप कमी लोकांना ठाऊक. बंद कारखाना सुरू व्हावा म्हणून त्यांनी अलीकडं मुंबई-दिल्लीत संपर्क वाढवलेला. त्याचीच एक बैठक दिल्लीत ठेवलेली. त्या अगोदर त्यांचा वाढदिवसही आलेला. स्वत:च्या वाढदिनी पंढरीत कधीच न थांबणाºया नानांनी यंदाही तीन-चार दिवसांची जम्मू-बिम्मूची टूर काढलेली. तिथं थंडी प्रचंड म्हणून त्यांनी असे गरम कपडे पुण्यात घेतलेले.
मात्र त्यांच्यासोबत असलेले ‘टेंभुर्णीचे कोकाटे’ भलतेच हौशी. त्यांनी काढला सेल्फी अन् टाकला फेसबुकवर...अन् सुरू झाला तिथूनच नानांच्या पॅन्टीचा गवगवा. म्हटलं तर हे धक्कादायकच. मात्र यातही ‘नानां’च्या राजकीय स्ट्रॅटेजीचा वाटा मोठा. आजपर्यंत ‘नानां’नी प्रत्येक निवडणुकीत पक्ष बदललेला. चिन्ह बदललेलं; मात्र हे करताना अगोदर लोकांमध्ये चर्चा घडवून आणलेली. नंतर ‘कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर’ हे अधिकृत लेबल लावून बंगल्यावरच्या पार्टीची पाटी बदललेली. त्यामुळं ‘ड्रेस स्टाईल’ बदलतानाही ‘नानां’नी आपल्याला विश्वासात घ्यायला हवं होतं, असाही गोड गैरसमज काही लोकांचा झालेला. त्यातूनच म्हणे एवढा सारा धुरळा उडालेला.खरंतर ग्रामीण भागातील नेतेमंडळी मोठ्या शहरात गेल्यानंतर कशी वागतात, हे पूर्वीच्याकाळी फार माहीत नसायचं. काही वर्षांपूर्वी ‘डान्सबार’चा धुमाकूळ सुरू असताना कोण बर्म्युड्यावर अन् कोण टी-शर्टवर ‘मुंबईची नाईटलाईफ’ एन्जॉय करायचं, याची फक्त खाजगी कुजबूज व्हायची. सोलापूरचे एक माजी आमदार तर हैदराबादमध्ये गेल्यानंतर सुटाबुटात कसे फिरायचे याचेही किस्से खुसखुशीतपणे सांगितले जायचे; मात्र आता सोशल मीडिया सुपरफास्ट झाल्यापासून प्रत्येकजण सावध झालाय. ‘नानां’चा ड्रेस तर भलताच गडबडून गेलाय.
टीप : ‘नानांची पॅन्ट’ प्रकरणाचे दिग्दर्शक निर्माते ‘संजूबाबा टेंभुर्णीकर’ हे अलीकडच्या काळात ‘नानां’सोबत फिरू लागलेत. याचं कारण म्हणे ते दोघेही ‘महाविकास आघाडी’तले. म्हणजे निवडणुकीपूर्वी चुकून तिकडून इकडं आलेले. काहीही असो. ‘बबनदादा’ अन् ‘संजयमामा’ही याच ‘आघाडी’तले- मग या बंधूंशी कोकाटे कसं जुळूवून घेणार ?
दोन देशमुख...एक पाटील !
सत्ता गेली तरीही एकमेकांची उरली-सुरली जिरविण्यात मग्न असणाºया ‘दोन देशमुखां’ची कहाणी आता सोलापूरकरांनाच कंटाळवाणी वाटू लागलीय. बाकीचे पक्ष आतापासूनच ‘महापालिके’च्या तयारीला लागलेत. हे दोघे मात्र झेडपीतच एकमेकांना संपविण्यासाठी दुश्मनांच्या गळाभेटी घेऊ लागलेत. आता हे कमी पडलं की काय म्हणून ‘कोल्हापूरचे चंदूदादा’ अर्थात ‘कोथरूडचे पाटील’ सोलापुरात एकेक माणूस जोडत चाललेत. पार्टीतल्या नाराजांना जवळ करू लागलेत. मग तुळजापूर वेशीतले जग्गूदादा असो की मड्डीवस्तीतले वल्याळ...अशा अनेकांना भेटून नवी समीकरणं जुळवू लागलेत.तुम्ही म्हणाल, ‘आता यात काय विशेष ? प्रदेशाध्यक्ष म्हणून ते त्यांचे कर्तव्यच की.’ पण तसं नाही. या साºयांची मोट बांधून नवी टीम तयार करण्याची ही मोहीम आखली जातेय, ती केवळ ‘दोन्ही देशमुखां’नाच बाजूला ठेवून. आलं का लक्षात ? लगाव बत्ती...
गलगले म्हणाले, ‘सावंत पुन्हा बोलले !’
सोलापुरात नुकताच ‘सही रे सही’चा नवा प्रयोग झालेला. यातल्या भरत जाधवांच्या तोंडी ‘गलगले म्हणालेऽऽ’ हा डायलॉग अख्ख्या नाटकभर फिरत राहिलेला. यातली बाकीची पात्रं नेमकी काय करत असतात हे ‘गलगले’ प्रेक्षकांना सतत सांगत असतात. जर प्रत्यक्षात सोलापुरी राजकारणात असते तर गेल्या आठवड्यात हे गलगले नक्कीच म्हणाले असते, ‘सावंत बोललेऽऽ पुन्हा पुन्हा बोललेऽऽ’खरंतर गेल्या एक महिन्यापासून ‘तानाजी’ तोंड बंद करून गप्प होते. कुणाचाही कॉल उचलण्याची त्यांची तयारी नव्हती. ‘कुणी परत मोबाईल रेकॉर्डिंग ‘मातोश्री’वर पाठविलं तर काय घ्या ?’ अशीही भीती त्यांना म्हणे वाटू लागलेली. मात्र नेहमीच्या सवयीप्रमाणं ते परंड्यात बोलले. पुन्हा गाजावाजा झाला. सोलापूरच्या सेनेतले बाकीचे ‘गलगले’ खूश झाले. ‘आता सुंठीवाचूनच खोकला चाललाय’ या अविर्भावात जुना पुणे नाक्यावर एकमेकांना टाळ्या देऊ लागले; मात्र ‘सावंतां’वर आजही निष्ठा ठेवून असणाºया ‘लक्ष्मीकांतां’चे गलगले अक्षरश: गलबलून गेले. लगाव बत्ती...
( लेखक हे 'लोकमत' सोलापूर आवृत्तीचे निवासी संपादक आहेत.)