शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

 बच्चन हा ‘बच्चन’ आहे, कारण ‘बच्चन’च!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 09:06 IST

अमिताभच्या परिपूर्ण नसण्यात एक मजा आहे. असा ‘अपरिपूर्ण महानायक’ भारतातच होऊ शकतो. उर्वरित जगाच्या नशिबी असा महानायक होणे नाही!

- अमोल उदगीरकर, चित्रपट अभ्यासक‘लक बाय चान्स’ या सुंदर सिनेमात ॲक्टिंग स्कूलमध्ये अभिनय शिकविणारा प्रशिक्षक विद्यार्थ्यांना सांगतो, ‘हॉलिवूड फिल्ममध्ये हिरो बनणं सोपं असतं, पण बॉलिवूडचा हिरो बनणं फार अवघड! तो फक्त अभिनय करत नाही, गाणं म्हणतो, डान्स करतो, कॉमेडी आणि ॲक्शनही करतो. बॉलिवूडचा हिरो बनायला तुमच्याकडे खूप काही असावं लागतं. हे  झालं सर्वसामान्य हिरोबद्दल.

भारतीय सिनेमातला महानायक बनण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागत असेल, याची यादी तर न संपणारी आहे. प्रेक्षकांच्या अवास्तव अपेक्षा खांद्यावर वाहून न्याव्या लागतात, आपली चूक नसली तरी मूग गिळून लोकांच्या शिव्या खाव्या लागतात, ऑफ स्क्रीन पण आपल्या हातून काही चुकीचं होत नाही नं याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागतं... अजून अजून काय काय करावं लागतं. हे परफेक्शनचं ओझं सतत खांद्यावर वाहत राहणं खूप थकवून टाकणारं असतं. स्वतःमध्ये अनेक दोष असणाऱ्या सर्वसामान्य माणसाला आपला महानायक  परिपूर्ण असावा, असं वाटणं हा एक खास भारतीय विरोधाभास. त्यासाठी महानायकाला मोठी किंमत चुकवावी लागते. महानायकावर प्रेम करणारे लाखो लोक, पण त्याच्या खऱ्या आयुष्यातले गुण-दोष आणि त्याचं परफेक्ट नसणं समजून घेणारे खूप तुरळक लोक असतात किंवा नसतात. महानायक असणं ही खूप एकटं करून जाणारी गोष्ट आहे. अमिताभ बच्चन नावाचा महानायक ही एकाकी भूमिका भारतासारख्या खंडप्राय देशाच्या मंचावर गेल्या काही दशकांपासून निभावत आहे. 

बॉलिवूडच्या नायकांच्या  देखणेपणाच्या पारंपरिक व्याख्येत न बसणारा, त्याकाळातल्या निर्मात्यांच्याच भाषेत सांगायचं तर घोड्यासारखा चेहरा असणारा, लंबुटांग, हवा आली की  ‘झुल्फे’ न उडणारा अमिताभ बच्चन इथं महानायक सोडा; साधा हिरो होईल, असंही कुणाला वाटलं नसेल. पण बच्चन आला, टिकला आणि बघता बघता त्याच्या महानायकत्वाने अक्राळविक्राळ स्वरूप घेतलं. त्याचे समकालीन नायक त्याच्यासमोर पिग्मी वाटायला लागले. बच्चनचं महानायक असणं फक्त बॉक्स ऑफिसवरच्या दणदणीत गल्ल्यापुरतं संकुचित नव्हतं. त्याच्या सुपरस्टारडमला  तत्कालीन सामाजिक संदर्भ होते. पहिल्यांदाच प्रेक्षक स्वतःला पडद्यावरच्या नायकात बघत होता. यात सलीम जावेदच्या लिखाणाइतकाच बच्चनच्या इंटेन्स अभिनयाचा पण वाटा होता. सत्तरच्या दशकात बच्चन आभाळाइतका मोठा झाला. त्या काळात स्वातंत्र्यानंतरचा रोमँटिसिझम जवळपास लयाला गेला होता. 

भ्रष्टाचार आणि लायसन्सराजमुळे जनतेत साचलेल्या असंतोषाची वाफ बाहेर काढण्याचं काम बच्चनच्या ‘अँग्री यंग मॅन’ने केलं. गुंडांशी लढणारा, नेत्यांना जाब विचारणारा, सरकारी बाबूंचं बखोट पकडणारा नायक व्यवस्थेनं गांजलेल्या सर्वसामान्य प्रेक्षकांना अपील झाला नसता तर नवलच. भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढण्याची सर्वसामान्य माणसाची उर्मी बच्चनने थिएटरच्या अंधारात पूर्ण केली. बच्चनचा महानायक एकाचवेळेस ‘असंतोषाची खिडकी’ होता आणि एकाचवेळेला ‘ग्लॅडिएटर’ होता. तो नेमका कोण होता, हे तुम्ही कुठल्या चष्म्यातून बघताय, यावर अवलंबून होतं.

दरम्यान, व्यवस्थेला आव्हान देणारा नायक साकारणारा बच्चन स्वतःच एक व्यवस्था बनत गेला. राजीव गांधींच्या आग्रहामुळे राजकारणात उतरला. खासदार बनला. बच्चनचं हे स्वतःच व्यवस्था बनत जाणं प्रेक्षकांना फारसं रुचलं नसावं. बच्चनचे सिनेमे चालण्याचं प्रमाण हळूहळू कमी होत गेलं. कोरी पाटी असणाऱ्या नायकांची एक पिढी विंगेत दबा धरून उभी होतीच. याच काळात बोफोर्स प्रकरणात बच्चनचं नाव आलं. चारी बाजूंनी आरोपांचे शिंतोडे उडायला लागले. पडद्यावर अनेक गुंडांना अंगावर घेणारा महानायक प्रत्यक्ष आयुष्यात असहाय्य दिसायला लागला. बच्चन नावाचा नायक स्वतःच्या अधःपाताला कारणीभूत होता. मग बेअब्रू होऊन राजकारणातून बाहेर पडलेल्या बच्चनने पुन्हा सिनेमात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, स्वतःची ‘एबीसीएल’ नावाची कंपनी सुरू करून चित्रपट निर्मिती आणि इतर क्षेत्रात हातपाय मारण्याची सुरुवात केली; पण बच्चनला इथं पण दणदणीत अपयश मिळालं. बच्चन गळ्यापर्यंत कर्जात बुडाला.  माध्यम आणि तज्ज्ञ लोक बच्चनचा मृत्यूनामा लिहून मोकळी झाली. बच्चन संपला आहे, असं फक्त एका माणसाला वाटत नव्हतं : खुद्द बच्चन! यशस्वी माणूस स्वतःला काळाप्रमाणे बदलतो. मोठ्या पडद्यावर राज्य करणारा बच्चन काळाची पावलं ओळखून तोवर घराघरात पोहोचलेल्या टेलिव्हीजनकडे वळला : ‘कौन बनेगा करोडपती’ ! घराघरात ‘केबीसी’ बघण्यासाठी लोक टीव्हीसमोर गर्दी करायला लागले. सुपरहिरो हरलाय असं वाटत असताना अशक्यप्राय परिस्थितीतून कमबॅक करतो, बच्चनने तेच केलं. मोठ्या पडद्यावर मुख्य नायक बनण्याचा अट्टाहास सोडून त्याने दुय्यम चरित्र भूमिका स्वीकारायला सुरुवात केली. नवीन दमाच्या दिग्दर्शकांसोबत काम करायला सुरुवात केली. बच्चनकडून शिकण्यासारखा सगळ्यात मोठा गुण म्हणजे त्याची लवचिकता! ‘पिकू’, ‘पिंक’, ‘खाकी’, ‘ब्लॅक’, ‘पा’ आणि इतर अनेक भूमिकांनी सजलेली सेकंड इनिंग खरं त्याच्या सुपरस्टार इनिंगपेक्षा जास्त लोभसवाणी आहे. आज वयाच्या  ऐंशीव्या वर्षात ‘ब्रह्मास्त्र’सारख्या सुपरहिट सिनेमाच्या निमित्ताने बच्चनच पुन्हा बॉलिवूडच्या मदतीला धावून आला.

‘अँग्री यंग मॅन’ ते ‘ग्रँड ओल्ड मॅन’पर्यंतचा एका महानायकाचा हा प्रवास! हा कुठंतरी आपल्यासारखाच गुणदोषांचा समुच्चय असणारा माणूस आहे, असं बच्चनबद्दल वाटणं हे त्याला वेगळं बनवतं. त्याच्यावरचे अनेक आरोप, त्याच्यातले दोष बच्चनला मर्त्य पातळीवर आणून ठेवतात, हे फार लोभसवाणं आहे. त्याच्या परिपूर्ण नसण्यात एक मजा आहे. बच्चन नावाचा हा अपरिपूर्ण महानायक फक्त भारतात होऊ शकतो. उर्वरित जगाच्या नशिबी असा महानायक होणे नाही! amoludgirkar@gmail.com

टॅग्स :Amitabh Bachchanअमिताभ बच्चन