पुलवामा येथील भीषण दहशतवादी हल्ल्याचे उट्टे काढण्यासाठी भारताने पाकिस्तानातील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी प्रशिक्षण तळावर चढविलेल्या हवाई हल्ल्याचे कवित्व आणखी काही दिवस तरी सुरूच राहील असे दिसते. त्यामध्ये काहीही वावगे नाही; मात्र दुर्दैवाने काही लोकांनी हवाई हल्ल्याच्या वस्तुस्थितीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणे सुरू केले आहे. हवाई हल्ला केला असेल तर त्याचे पुरावे द्या, नेमके किती दहशतवादी ठार झाले याची माहिती द्या, अशा प्रकारची मागणी हे लोक करीत आहेत. गुरुवारी पाकिस्तानच्या एका मंत्र्यानेच त्यांच्या संसदेच्या संयुक्त अधिवेशनात भारतीय वायुदलाने पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळावर हल्ला केल्याची कबुली दिली. गुरुवारी सायंकाळी भारताच्या तिन्ही सेनादलांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, बालकोट येथील दहशतवादी तळावर केलेला हल्ला पूर्णपणे यशस्वी झाल्याची आणि तसे पुरावेदेखील असल्याची माहिती दिली; मात्र तरीदेखील काही भारतीयांचाच भारतीय वायुदलाने गौरवशाली कामगिरी पार पाडल्यावर विश्वास बसत नाही असे दिसते.आतापर्यंत उठसूठ अण्वस्त्रांची दर्पोक्ती करणारा पाकिस्तान बालाकोट येथील हल्ल्यानंतर जमिनीवर आला आहे. चुकून पाकिस्तानी प्रदेशात पोहचलेल्या किंवा युद्धादरम्यान पकडलेल्या भारतीय जवानांना ठार करण्याचा इतिहास असलेला पाकिस्तान यावेळी मात्र दोनच दिवसात विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना भारताच्या स्वाधीन करण्यास तयार झाला. हे एक प्रकारे बालाकोट हवाई हल्ल्याचे यशच नव्हे का? गत अनेक वर्षांपासून पाकिस्तानने पोसलेले दहशतवादी भारतात कुठेही दहशतवादी कृत्य, बॉम्बस्फोट घडवून आणत होते आणि आपण मात्र आंतरराष्ट्रीय सीमा तर सोडाच; पण प्रत्यक्ष नियंत्रण रेखाही न ओलांडण्याचे पथ्य पाळत होतो! पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले चढविण्याची मागणी यापूर्वी अनेकदा झाली; मात्र भारतीय राजकीय नेतृत्वाने यापूर्वी कधीही तशी परवानगी दिली नाही. तसे धाडस केल्यास पाकिस्तान प्रत्युत्तर देईल आणि मग तणाव वाढून अण्वस्त्रांच्या वापरापर्यंतही मजल जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मानण्यात येत होते. बालाकोट येथील हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानची त्या स्तरापर्यंत जाण्याची तयारी नसल्याचे स्पष्ट झाले. नाही म्हणायला बालाकोट येथील हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय वायुक्षेत्राचे उल्लंघन करून काही पाकिस्तानी लढाऊ विमानांनी भारतीय प्रदेशात काही बॉम्ब टाकले खरे; मात्र त्यामागे बालाकोटचा सूड उगविण्यापेक्षा, आपणही भारतावर हल्ले चढवू शकतो हे दाखवून पाकिस्तानी जनतेची समजूत काढण्याचा प्रयत्न अधिक होता! पाकिस्तानी विमानांनी भारताच्या वायुसीमेत घुसखोरी करून बॉम्ब टाकले. त्यांना हुसकावून लावताना भारताचे एक विमान क्षतीग्रस्त होऊन आपला एक पायलटही पाकिस्तानच्या हाती लागला. ही वस्तुस्थिती पाकिस्तानचा युद्धोन्माद आणखी वाढवेल आणि भारताला थोडी नरमाईची भूमिका घ्यावी लागेल, असे वाटत होते; मात्र पाकिस्ताननेच नरमाईची भूमिका घेतली!पाकिस्तानने तणाव कमी करण्याची इच्छा व्यक्त करणे, विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना तातडीने भारताच्या स्वाधीन करण्यास तयार होणे, या संपूर्ण घटनाक्रमामागे भारताची वाढलेली शक्ती, आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला एकटे पाडण्यात भारताला लाभलेले यश आणि पाकिस्तानची अत्यंत नाजूक आर्थिक परिस्थिती या बाबी कारणीभूत आहेत. पुलवामा येथील भीषण दहशतवादी हल्ला आणि बालाकोट येथे प्रत्त्युत्तरादाखल भारताने केलेल्या कारवाईनंतर जगातील सर्व प्रमुख देश भारताच्या पाठीशी उभे झाले. अगदी सौदी अरेबिया आणि चीन या पाकिस्तानच्या तारणहतर््या देशांनीही पाकिस्तानची साथ दिली नाही. आता तर अशी बातमी पाझरत आहे, की भूतकाळात सातत्याने नकाराधिकार वापरून मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत सादर झालेला प्रस्ताव हाणून पाडणारा चीन ताज्या प्रस्तावावरील मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहणार आहे. मध्यपूर्व आशियातील पाकिस्तानचा सर्वात घनिष्ट मित्र असलेल्या सौदी अरेबियानेही दहशतवादाला थारा देण्याच्या मुद्यावरून पाकिस्तानला कानपिचक्या दिल्याचे वृत्त आहे.भारताने बालाकोट येथे केलेल्या कारवाईला प्रत्त्युत्तर म्हणून पाकिस्तानने युद्ध छेडले असते, तर कटोरा घेऊन जगभर भीक मागत फिरत असलेल्या पाकिस्तानचा फार काळ निभाव लागू शकला नसता, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. भारताने ही संधी साधून पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतला तर चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपेक) प्रकल्पामध्ये केलेल्या अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीचे काय होईल, ही चिंता चीनला नक्कीच सतावत असेल. भारताची अडवणूक करण्याची संधीच शोधत असलेल्या चीनने नक्की त्या चिंतेपोटीच पाकिस्तानची साथ दिली नाही. सौदी अरेबियाला दुबईप्रमाणेच खनिज तेलावरील अवलंबित्व कमी करायचे आहे. त्याचा एक भाग म्हणून तो देश जगात सर्वात वेगाने आर्थिक प्रगती करीत असलेल्या भारताकडे मैत्रीचा हात पुढे करीत आहे. अलीकडेच सौदी अरेबियाच्या युवराजांनी भारत भेटीदरम्यान भारताला मोठे तेल साठवणूक केंद्र बनविण्याचे सुतोवाच केले. त्यामुळे त्या देशालाही भारत व पाकिस्तानदरम्यान युद्ध पेटायला नको होते. पी-५ या नावाने ओळखल्या जात असलेल्या पाच जागतिक महासत्तांपैकी रशिया भारताचा जुना मित्र आहे, तर अमेरिका, फ्रांस व ग्रेट ब्रिटन दहशतवादाच्या मुद्यावर पूर्णपणे भारताच्या बाजूचे आहेत. एकट्या चीनकडूनच काय ती पाकिस्तानला अपेक्षा होती; मात्र त्या देशानेही पाकिस्तानची साथ दिली नाही.या संपूर्ण घटनाक्रमावरून एक बाब स्पष्ट झाली आहे आणि ती म्हणजे पाकिस्तानच्या अण्वस्त्र वापरण्याच्या धमक्यांना भीक घालण्याची गरज नाही. पाकिस्तानला ठोशास ठोसा हीच भाषा समजते आणि ती वापरली की तो नरमतो. याचा अर्थ यापुढे पाकिस्तान आगळीक करणारच नाही किंवा दहशतवादाला प्रोत्साहन देणार नाही, असा अजिबात नाही. केवळ भारताच्या विरोधातून त्या देशाचा जन्म झाला आहे. स्वाभाविकच भारत विरोध हाच त्या देशाच्या अस्तित्वाचा कणा आहे. तो कणाच मोडला तर तो देश उभाच राहू शकणार नाही. त्यामुळे भारताच्या विरोधात राहणे, भारत विरोधी कारवाया करणे ही पाकिस्तानी नेतृत्वाची मजबुरी आहे, मग सत्तेत कोणताही पक्ष असो वा लष्करशहा असो! आपण ही वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे आणि त्या दृष्टीने सतत चौकस व तयारीत असले पाहिजे. ते भारताचे प्राक्तन आहे.- रवी टाले
ravi.tale@lokmat.com