मिलिंद कुलकर्णीभाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ जावळे यांची महाराष्टÑ कृषी व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करुन राज्य शासनाने शेती आणि मातीशी प्रामाणिक राहणाऱ्या एका नेत्याचा गौरव केला आहे. दोनवेळा खासदार, दोन वेळा आमदार राहिलेल्या जावळे यांना कधी गर्व, अहंकाराने स्पर्श केला नाही. पक्षसंघटनेच्या शिस्तीत राहून त्यांनी पक्ष जो आदेश देईल, त्याचे पालन केले. आणि बहुदा निष्ठावंत, शिस्तबध्द नेता म्हणून त्यांना कॅबिनेट दर्जाचे पद देऊन रास्त न्याय दिला आहे. विधानसभेचा कालावधी संपण्याच्या मार्गावर असताना ही नियुक्ती झाल्याने जावळे यांना इच्छा असूनही फार काही करता येईल, असे नाही. तीन वर्षांसाठी ही नियुक्ती असली तरी दोन महिन्यानंतरच्या निवडणुकीनंतर कोणत्या पक्षाची सत्ता येते त्यावर या परिषदेच्या उपाध्यक्षपदाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशा नियुक्तया का होतात, हे न उलगडणारे कोडे आहे. काँग्रेस-राष्टÑवादी असो की, भाजप-शिवसेना , प्रत्येकाने असे निर्णय घेतलेले आहेत. शिवसेना-भाजपच्या पहिल्या युती सरकारच्या काळात नुकतेच दिवंगत झालेले जिल्हाप्रमुख स्व.गणेश राणा यांना असेच शेवटच्या टप्प्यात राज्य साक्षरता आयोगाचे अध्यक्षपद दिले गेले. निष्ठावंत शिवसैनिकाला मिळालेल्या पहिल्या लाल दिव्याच्या गाडीचे मोठे अप्रुप तेव्हा होते. पण पुढे सत्तांतर झाल्याने राणा यांना अधिक काही करता आले नाही.जावळे यांच्या नियुक्तीने पक्षांतर्गत सत्तासंतुलन राखले गेले आहे. जळगाव जिल्ह्यातील निम्म्या भागात लेवा समाजाचे मोठे प्राबल्य आहे. एक खासदार आणि तीन आमदार या समाजाकडून भाजपच्या तिकीटावर निवडून आले आहेत. ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे या समाजाचा चेहरा आहेत. तीन वर्षांपासून ते मंत्रिमंडळाबाहेर आहेत. त्यामुळे समाजात नाराजीची भावना असणे स्वाभाविक आहे. ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पक्षश्रेष्ठींकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. खडसे मंत्रिमंडळात नसले तरी त्यांच्या कुटुंबातील सून रक्षा खडसे यांना दुसऱ्यांदा खासदारकीचे तिकीट, पत्नी मंदाकिनी यांना महानंद आणि जिल्हा दूध संघाचे अध्यक्षपद, कन्या रोहिणी यांना जिल्हा बँकेचे अध्यक्षपद ही पदे कायम आहेत. समाजातील दुसरे आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा यांना जळगावचे महापौरपद दिले गेले आणि हरिभाऊ जावळे यांना कृषी परिषदेचे उपाध्यक्षपद देण्यात आले. लेवा समाजाला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संदेश या निमित्ताने भाजपने दिला आहे.लेवा समाजात एकनाथराव खडसे यांना मोठा मान आहे. त्यांच्या शब्दाला किंमत आहे. त्यामुळे त्यांची आणि समाजाची नाराजी राहू नये, असा प्रयत्न सत्तासंतुलनाचा माध्यमातून केला जात आहे. रावेर येथे गेल्या पंधरवड्यात झालेल्या भाजप मेळाव्यातील दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत. भाजपने तिकीट नाकारले तरी मी पक्षाचे काम करीत राहणार असे खडसे यांनी केलेल्या विधानातून तर्कवितर्काला जागा करुन दिली आहे. खडसे यांना राज्यपालपद किंवा राज्यसभेचे सदस्यत्व देऊन कन्या रोहिणी यांना मुक्ताईनगर मतदारसंघाची उमेदवारी देण्यात येणार असल्याची पक्षांतर्गत चर्चेच्या पार्श्वभूमीवर या विधानाला महत्त्व प्राप्त होते. दुसरे विधान म्हणजे, रावेर मतदारसंघात उपºयांना स्थान नाही, हरिभाऊ जावळे हेच भाजपचे उमेदवार राहतील, असा स्पष्ट निर्वाळा खडसे यांनी दिला. खडसे यांचा अंगुलीनिर्देश अनिल चौधरी यांच्याकडे होता. गेल्या वर्षभरापासून ते रावेरमध्ये सक्रीय आहेत. अमळनेरची पुनरावृत्ती रावेरमध्ये करण्याचा त्यांचा मानस दिसतोय. चौधरी हे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचे निकटवर्तीय आहेत, त्याचसोबत भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांचे बंधू आहेत. हरिभाऊ जावळे यांना पाठिंबा देऊन खडसे यांनी महाजन यांच्या कथित प्रयत्नांना विरोध आणि जावळे यांच्या उमेदवारीचे सुतोवाच करीत समाजाला महत्त्व देण्याची कृती केली आहे. असाच एक मुद्दा अलिकडे पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत जळगाव मतदारसंघात उपस्थित झाला होता. खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर रेल्वेत नृत्य करुन आनंदोत्सव साजरा करणाºयाला तुम्ही मते देणार का, असा संदेश व्हायरल झाला होता. समाजातील अस्वस्थता वाढविण्याच्या प्रयत्नाचा हा भाग असला तरी पक्षश्रेष्ठींनी अचूक वेळी निर्णय घेऊन जावळेंना संधी दिली आणि सत्तासंतुलन राखले.
हरिभाऊंच्या नियुक्तीने सत्तासंतुलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 1:22 PM