गेल्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे दहीहंडीवर घातलेली बंदी यावर्षीही कायम ठेवली गेली आहे. या निर्णयाला पाठिंबा आणि विरोध दर्शविणाऱ्या दोन्ही बाजूंकडील लोकांच्या मतमतांतरांचा धुराळा उडाला. दोन्ही बाजूंची मते काहीशी टोकाची व एकांगी आहेत. त्या निमित्ताने गोपाळकाल्याचा परामर्श...
श्रावण महिन्यातील कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा आनंदोत्सव म्हणजे गोपाळकाला किंवा दहीहंडीचा सण. श्रीकृष्णाच्या अनेकविध लीला आपल्या पुराणांतून सांगितल्या गेलेल्या आहेत. कृषक संस्कृती, दूधदुभत्यांची विपुल उपलब्धता आणि समृद्ध पारंपरिक समाजजीवन व संस्कार घडविण्यासाठी या कथा निर्माण झालेल्या आहेत. गोपाळकालासुद्धा त्यातीलच एक गोष्ट.
आपल्या जवळ असलेल्या वस्तू सर्वांबरोबर वाटून, सर्वांना सहभागी करून त्याचा आस्वाद घेणे, आनंद द्विगुणित करणे हा उद्देश. राजा-रंक, गोरा-काळा, पंगू-धडधाकट, श्रीमंत-गरीब, उच्च-नीच, जात-प्रांत-धर्म-भाषा-संस्कृती इत्यादी कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता, ‘आहे-रे’ वर्गाने ‘नाही-रे’ वर्गातील सर्वांना एकत्र करून आपल्या जवळील साधनसंपत्तीचे एकत्रीकरण करून सर्वांना त्याचा लाभ होईल या एकमेव उद्देशाने वाटणे, हा गोपाळकाल्याचा सहज सोपा अर्थ. स्वातंत्र्य, समता, बंधुता या त्रिसूत्रीने समतेची शिकवणूक देणारा विचार.
काही वर्षांपूर्वी हा विचार मराठी शाळांमधून गोपाळकाला उत्सव साजरा करून रुजवला जात होता. मात्र, आता ते होताना दिसत नाही. इतकेच काय तर ‘जय श्रीकृष्ण’ असा सर्व दिवस जयघोष करणाऱ्या समाजाकडून, तसेच प्रत्यक्ष श्रीकृष्णाचे वास्तव्य असणाऱ्या गोकुळ, वृंदावन, मथुरा या ठिकाणच्या गो-कृषक समाजाच्या लोकांकडूनही गोपाळकाल्याची समतेची शिकवणूक विसरली गेली आहे, हे दुर्दैवी वास्तव आहे. याचे आधुनिक रूप म्हणजे व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) किंवा समाजभान. व्यवसायातून नफा कमावणाऱ्या व्यावसायिकांनी तो समाजासाठी खर्च करावा. प्रत्यक्षात किती जण हे जाणीवपूर्वक करतात व किती जण हे व्यावसायिक कर वाचविण्यासाठी दिखावा म्हणून करतात हा अभ्यासाचा विषय आहे, तसेच गोपाळकाल्याचा दुसरा आधुनिक प्रकार म्हणजे समूहनिधी; पण येथेही हा निधी खरोखरच आवश्यक कारणासाठी जमा आणि खर्च होतो का, हाही अभ्यासाचा विषय आहे.
भागवत संप्रदायात सद्विचारांची सांगता करताना सर्वांत शेवटी ‘काल्याचे कीर्तन’ करण्याचा प्रकार आहे. गोपाळकाल्याचे आधुनिक रूप आणि दहीहंडीचे स्थित्यंतर यात जे समतेचे, जे सहकार्याचे, जे बंधुत्वाचे आणि जे व्यवस्थापन कौशल्याचे मर्म आहे ते कृष्णाची परंपरा सांगणाऱ्या समाजाने पुन्हा एकदा स्वतःच समजून घेऊन ते अधिक विकसित व जगासमोर आदर्श उदाहरण म्हणून कसे सादर करता येईल याचा यानिमित्ताने विचार झाला, तर हे गोपाळकाल्याचे कीर्तन सुफळ संपूर्ण झाले असे म्हणता येईल.
व्यवस्थापन आणि प्रशासकीय कौशल्याची शिकवण
खरंतर दहीहंडी हा उत्तम खेळ आहे. निश्चित केलेले ध्येय साध्य करण्यासाठी जे कौशल्य लागते ते व्यवस्थापन आणि प्रशासकीय कौशल्य शिकविणारा. ठराविक उंचीवरील निश्चित केलेल्या लक्ष्याला प्राप्त करण्यासाठी सगळ्या सवंगड्यांना एकत्र करून, सांघिक भावनेतून एकावर एक मानवी थर रचून तोल, एकाग्रता आणि शारीरिक क्षमता याची कसोटी लावून निर्धारित ध्येयाला, लक्ष्याला साध्य करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. बऱ्याचवेळा पहिल्या प्रयत्नात ते साध्य झाले नाही तर पराभूत मानसिकता न ठेवता पुन्हा पुन्हा प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपले अंतिम ध्येय साध्य करणे, आत्मविश्वास कमावणे व ते केल्यानंतर पुन्हा नवीन उंचीवरील ध्येयाला गवसणी घालण्याची जिद्द बाळगणे असा हा थरारक खेळ. शारीरिक क्षमता, बुद्धिचातुर्य, नियोजन, नियंत्रण, सहकार्य, आत्मविश्वास, जिद्द या सगळ्या गुणांची जोपासणी करणारा. खरंतर याची तुलना मल्लखांब किंवा स्पेनमधील मानवी ‘पिरॅमिड’ बनविण्याच्या खेळाबरोबर होऊ शकते.
प्रत्यक्षात मात्र जास्तीत जास्त पैशाचे आमिष दाखवून जास्तीत जास्त मानवी थराच्या उंचीची जीवघेणी स्पर्धा. त्या स्पर्धात्मक खेळाला ‘इव्हेंट’चे हिडीस स्वरूप देऊन दहीहंडी फोडण्यासाठी कृष्णाचे सवंगडी न जाता एखादी लुटारू टोळीच जात आहे असा पुरता बाजार करून टाकलेला आहे. सर्वत्र लाऊडस्पीकर भोंग्यांवरून वाजणारी सवंग गाणी, डोक्याला पट्टी, दारू पिऊन तारवटलेले डोळे, झिंगलेले शरीर, तोंडात गुटखा किंवा तंबाखू... असे अनेक गोविंदा दहीहंडीच्या टोळीमध्ये दिसून येतात. हे दुर्दैवी वास्तव.
केवळ एक दिवसाचा इव्हेंट नव्हे!
सण, संस्कृती, खेळ हे नेहमीच सकारात्मक ऊर्जा देणारे म्हणून आवश्यक आहे. त्या दृष्टीने खेळ म्हणून दहीहंडी या प्रकाराकडे जाणीवपूर्वक बघितले गेले पाहिजे, तसेच मल्लखांब या खेळाला जसे भारतीय परंपरेतला खेळ म्हणून वेगळी ओळख मिळाली आहे, त्याचप्रमाणे दहीहंडी या खेळाला नवी ओळख मिळाली पाहिजे. सध्या केवळ काही जिल्ह्यांत दहीहंडी गोविंदा पथके/मंडळे आहेत. त्या सर्वांना एका समान स्तरावर एकत्र करून योग्य प्रशिक्षण व चालना देऊन संपूर्ण महाराष्ट्रात हा खेळ कसा वाढविता येईल यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत.
जसे स्पेनमध्ये मानवी मनोरे उभे करणारे संघ आहेत, त्याचप्रमाणे येथे दहीहंडी संघ निर्माण झाले पाहिजेत. मुले, विद्यार्थी, युवक, पुरुष, महिला यांच्यामधून हे संघ तयार करून वेळ, उंची, वय, कौशल्य या आधारावर त्यांच्यामध्ये स्पर्धा आयोजित केल्या गेल्या पाहिजे. शारीरिक क्षमता आणि आत्मविश्वास वाढविणाऱ्या या खेळाला केवळ एक दिवसाचा इव्हेंट बनवून पैसा कमवायचा व उधळायचा प्रकार न समजता एक कौशल्य विकसित करणारा एक पर्याय म्हणून समोर आणले पाहिजे.
- प्रसाद पाठक(लेखक जाहिरात क्षेत्रात कार्यरत आहेत.)