- किरण अग्रवाल
अलीकडील काळात कौटुंबिक कलहांचे प्रमाण वाढले असून, नातेसंबंधांमधील वाद विकोपाला जाताना दिसत आहेत. याच कारणातून होणाऱ्या आत्महत्यांचे प्रमाणही मोठे आहे, म्हणूनच माणुसकीच्या व नात्यांच्या जपणुकीची बुद्धी द्यावी, अशी विनवणी बाप्पा गणरायाकडे करू या.
नातेसंबंधांना जपणं हे आजकाल खूप जिकिरीचं झालं आहे, कारण प्रत्येकाचंच मी व माझ्यातलं अडकलेपण वाढलं आहे. स्वार्थात नाती तोलली जाऊ लागल्यानं ती तुटण्याचं किंवा डागाळली जाण्याचंही भान बाळगलं जात नाही. परिणामी, समाजमनाला सुन्न करून जाणाऱ्या काही अप्रिय घटना रक्ताच्या नातेसंबंधात घडून येताना दिसतात. अलीकडे स्वार्थांधता वाढल्याने या घटनाही वाढल्या असून, नात्यांच्या जपणुकीसाठी बाप्पा गणरायालाच साकडे घालण्याची वेळ आली आहे.
नातेसंबंधांबाबत प्रश्न उपस्थित व्हावेत अशा घटना अलीकडे वाढल्या आहेत. शेती नावावर करून देण्याच्या कारणावरून दोन दिवसांपूर्वी मुलानेच आईला विष पाजल्याचा प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात घडला. अवघ्या साडेतीन वर्षांच्या पोटच्या मुलीवर तिच्याच पित्याने लैंगिक अत्याचार केल्याची लज्जास्पद घटना नागपुरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्यात नोंदली गेली. अनैतिक संबंधातून जन्मास आलेल्या पोटच्या गोळ्याला कचराकुंडीत फेकून देण्याच्या घटनाही अधूनमधून समोर येत असतात. अशा अन्यही अनेक घटनांची यादी वाढवता येईल, ज्यातून नातेसंबंधातील आदर, विश्वास व मर्यादांचाही गळाच घोटलेला दिसून येईल. का होत चालले आहे हे अधःपतन, असा प्रश्न त्यामुळेच निर्माण होतो.
सोशल मीडियाच्या वाढत्या वापरातून माणूस सोशल होतो आहे, असे मारे उच्चरवाने सांगितले जाते. पण, तसे होताना संस्काराचे घडे का पालथे होताना दिसतात? माणसाने माणसाशी माणुसकीनेच वागायला हवे. मात्र, कधी कधी तो कुटुंबातच नातेसंबंधातील आप्तांशीही पशुत्वाने वागताना दिसतो; त्यामुळेच ‘नरेची केला किती हीन नर’ असा प्रश्न उपस्थित होऊन जातो. म्हणायला अशी उदाहरणे ही अपवादात्मकच घडतात, परंतु संपूर्ण समाज मनाला ती अस्वस्थ करून सोडतात आणि तितकेच नव्हेतर, परस्परातील नात्यांना नख लावणारीही ठरतात.
दुसऱ्यांकडून होणारी अवहेलना किंवा छळवणूक एकवेळ सहन केली जाऊ शकते; पण स्वकीयांकडून तसे घडले तर तो घाव अधिक वेदना देऊन जातो. दुर्दैवाने अशा वेदना जेव्हा वाट्यास येतात तेव्हा व्यक्ती कोलमडून पडल्याखेरीज राहत नाही. हे कोलमडलेपण व्यक्तीला निराशेच्या गर्तेत तर ढकलतेच; शिवाय आत्महत्येच्या अविवेकी विचारापर्यंतही पोहोचविते. राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोने देशातील आत्महत्यांची जी आकडेवारी व त्याची कारणे दिली आहेत त्यात सर्वाधिक म्हणजे ३३.२ टक्के आत्महत्या कौटुंबिक समस्येतून घडून आल्याचे म्हटले आहे, यावरूनही नातेसंबंधातील नाराजी व दुराव्याचे वाढते प्रमाण किती भयग्रस्त होत चालले आहे हे लक्षात यावे.
गणरायाच्या आगमनाने सध्या सारे वातावरण भारावले आहे. चैतन्याचा व मांगल्याचा उत्सव सुरू आहे. बुद्धिदाता देवता म्हणून गणरायांना पूजले जाते. संकट, विघ्न, दुःखाचे हरण करून सुख-समृद्धीची प्रार्थना विनायकाकडे केली जात आहे. ती करतानाच माणुसकीची परीक्षा पाहणाऱ्या व नात्यांना नख लावणाऱ्यांना सुबुद्धी दे बाप्पा, अशीही प्रार्थना करू या; इतकेच यानिमित्ताने.