शुद्ध बीजापोटी। फळे रसाळ गोगटी।।- तुकाराम म्हणतात! हे बीज कुठले, तर नवनव्या सृजनाचे! त्याच्या प्रारंभ कुठला तर ओंकाराचा पण ओंकार प्रधान रुप गणेशाचे! मग हा गणपती आला. अकार उकार आणि मकार ह्या तिन्ही रुपांनी शरीरातून आकार घेतलेले रुप हे गणेशाचे ते प्रकट होते बीजातून बीज अंकुरते मातीत आणि माती हाकारते आपल्या रुपाला. मग मातीचाच आपला संबंध, संदर्भ. कधी रागावलो तर म्हणतो ना गेला मातीत! म्हणजे कुठे? म्हणजे धरणीच्या आत खोल खोल. म्हणून ही माती उकरायची! त्याचा एक जीव गोळा बनवायचा, तो कुस्करायचा. मग आपल्याच हातांनी त्याला आकार देऊ पहायचा.प्रथम उभा गोळा. मग त्याला आकार द्यायचा. पोट प्रथम. चेहराही. त्याचा आकार वेगळा. त्याला सोंड जोडली की झाला एक भाव तयार. त्याला एक विशिष्ट संवेदना जोडायची. हात बनवायचा आशिवार्दाचा. कमळाचा, शस्त्राचा. मग मोठमोठे कान, डोळे, मग हळूच पायाखाली उंदीर सरकवायचा. त्याचा गोळा वेग्ळा. त्याचं अस्तित्व वेगळं. विचारायचं नाही एवढा अजस्त्र देह उंदरावर कसा. अलीकडे इतका साधा आकार नाही माणसांचा गणपती माणसांसारखा वागतो. म्हणजे तो झोपाळ्यावर बसतो, नेत्याचे कपडे घालतो, शेतकरी होतो. वेगवेळया वस्तूंमधून रुप घेतो. टाकाऊतून टिकाऊ होतो. लोकांना आचक वाटतो पण हा कसा भांडी, काड्या, वस्तु, धातूंमधून रुप घेतो. तो कागदावरही येतो. एक साधा मुखाचा आकार काढला की त्याच्या शेजारी एक टिंब काढायचे. डोळा होतो. चित्रकारांकडे वटारुन पहातो तो. प्रत्येक चित्रकाराने कधीतरी हा आकार काढून पाहिलाय. कुणी दटावून म्हटलं की गणपतीचा माझा संबंध नाही तर समजावं तो नास्तिक म्हणून मिरवणारा. गणपती ग्रेट. तो आस्तिकांची भावना घेतो आणि नास्तिकांना हस्तांदोलन करतो.एक म्हणाला तुमचा देव तुम्ही शेकड्याने विकता. भाव करता. पाचशे हजार ते लाख किंवा त्याहून जास्त किंमतीत तुम्ही त्याला तोलता! कसला तुमचा देव? आणि पुन्हा त्याची आरती, त्याला प्रसाद, साजशृंगार! कशासाठी हे? त्याला आस्तिक उत्तर देत नाही. छान आरास करुन बाप्पा घरी आला की त्याला आपला माणूस घरात आल्यासारखं वाटतं. तो देव आहे की नाही माहिती नाही पण आपला आहे हे नक्की. हा झगडा शतकानुशतके चालत राहणार! गणपती आणि देव नाकारणारे घोषणा देत राहणार आणि त्याच घोषणांच्या जयजयकारात बाप्पांची प्रतिष्ठापना होणार. माणसांना एकत्र करू पहाता ना? मग एकदा (चुकीची का होईना) म्हणा आरती। खिरापत वाटा. पंचनैवेद्य चाखा. अथर्वशीर्षाच्या रुपाने तो सहस्त्रशीर्ष अभिषेक करतोय.माणूस आहात ना? मग विरोध करणारे कराच! पण नटूनथटून घर उजळत बाप्पाला घरी आणणाऱ्यांसोबत दोन पावलं चलाच! माणूस आणि समूहाचे अर्थ कळतील.-किशोर पाठक
बाप्पा
By admin | Published: September 05, 2016 5:25 AM