बालनाट्य चळवळ हे मराठी रंंगभूमीवरील महत्त्वाचे पान आहे आणि रंगभूमीच्या समृद्धतेत बालरंगभूमीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. केवळ बालनाट्यासाठी आयुष्य वेचलेल्या काही ज्येष्ठ व श्रेष्ठ नाट्यकर्मींमध्ये सुधा करमरकर यांचे नाव अग्रस्थानी आहे. अनेक दशके फक्त बालनाट्यांसाठी त्यांनी वाहून घेतले आणि या चळवळीला सकस खतपाणी घालून मोठ्या प्रेमाने तिची जोपासना केली. सुधातार्इंनी बालरंगभूमी तर गाजवलीच; परंतु त्याचबरोबर व्यावसायिक नाटकांतही त्यांनी अनेक भूमिका केल्या. मास्टर दत्ताराम, मामा पेंडसे, चित्तरंजन कोल्हटकर, शंकर घाणेकर, काशीनाथ घाणेकर अशा श्रेष्ठ नटांसोबत त्यांना रंगभूमीवर काम करण्याचे भाग्य लाभले. पण केवळ व्यावसायिक अभिनयक्षेत्रापुरतीच त्यांची नाट्यचळवळ मर्यादित राहिली नाही. त्यांना बालरंगभूमी सतत खुणावत होती. त्यासाठी विशेष शिक्षण घेण्यासाठी सुधा करमरकर परदेशात गेल्या. अमेरिकेत जाऊन त्यांनी ‘बालरंगभूमी’ या संकल्पनेचा अभ्यास केला आणि बालरंगभूमीची संकल्पना त्यांच्या मनात आकार घेऊ लागली. तोपर्यंत बालरंगभूमीवर बालनाट्याचा ठराविक असा साचा ठरला होता. त्यात आमूलाग्र बदल करण्याचा ‘पण’ त्यांनी केला. मुलांच्या मानसिकतेचा विचार करून सकस अशी बालनाट्ये व्हायला हवीत, अशी संकल्पना त्यांच्या मनात फेर धरू लागली. यातूनच ‘बालरंगभूमी-लिटिल थिएटर’चा उदय झाला. मुलांचे नाटक कसे असायला हवे, याचे वेगळे परिमाण त्यांनी निश्चित केले. त्यासाठी त्यांनी मुलांसाठी खास नाटके लिहून घेतली आणि त्यांचे प्रयोग सादर केले. बालरंगभूमीसाठी हे एक महत्त्वाचे वळण ठरले. बालनाट्य हे मुलांच्या करमणुकीसाठी असावे, हा उद्देश पक्का करून सुधा करमरकर यांनी बालरंगभूमीकडे पाहण्याचा तत्कालीन दृष्टिकोन बदलून टाकला. याचा परिणाम थेट मुलांना रंगभूमीकडे वळवण्याकडे झाला. त्याआधीही काही जण बालनाट्य करत होतेच; परंतु लहान मुलांची मानसिकता लक्षात घेऊन, त्यांना नाटकातून निखळ आनंद मिळावा, या हेतूने सुधा करमरकर यांनी विशेष परिश्रम घेतले. अनेक दशके त्यांनी बालरंगभूमीवर कार्य करत, बालनाट्यांना वेगळा आयाम प्राप्त करून दिला. त्यांच्या समकालीन रंगकर्मींची साथ त्यांना या चळवळीत मिळाली. त्यांच्या हाताखालून गेलेले अनेक रंगकर्मी सध्या नाट्यसृष्टीत पाय रोवून उभे आहेत. मराठी रंगभूमीचा इतिहास लिहायचा झाला, तर सुधातार्इंनी बालनाट्यासाठी दिलेले योगदान हे त्यातील महत्त्वाचे पान असेल. बालरंगभूमीच्या चळवळीत जी मंडळी शेवटपर्यंत कार्यरत होती; त्यापैकी सुलभा देशपांडे या अलीकडेच सर्वांना सोडून गेल्या आणि त्यांच्यानंतर बालनाट्यासाठी आयुष्य वाहून घेणाºया सुधाताईही आता काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. ‘लिटिल थिएटर’चे याहून अधिक नुकसान ते काय असू शकेल...?
‘लिटिल थिएटर’चा आधारस्तंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 12:26 AM