प्रबोधनकार सत्यपाल महाराजांवर मुंबईत झालेल्या प्राणघातक हल्ल्याने चळवळीतील कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. सत्यपाल महाराज चार दशकांपासून प्रबोधनाचे कार्य अव्याहतपणे करीत आहेत. ते धर्मविरोधी नाहीत, ईश्वरावर टीका करीत नाहीत. धर्मात मागाहून शिरलेल्या अनिष्ट प्रथांवर महाराज हल्ला करतात आणि कीर्तनाला जमलेल्या बायाबापड्यांच्या डोळ्यात अंजन घालतात. त्यांच्या कृती आणि उक्तीत विसंगती नसते, त्यामुळे खेड्यापाड्यातील माणसे त्यांना आत्मसात करतात. महाराजांच्या प्रवचनातून प्रेरणा घेऊन गावखेड्यातील तरुण आंतरजातीय विवाह करतात. आपल्या घरातील अंधश्रद्धेला मूठमाती देतात. लातूरनजीकच्या गावात सत्यपाल महाराजांच्या कीर्तनात बंदोबस्तावर असलेला पोलीस त्यांचे प्रबोधन ऐकून एका क्षणात दारू सोडतो. लग्न, तेरवीत अवाजवी खर्च न करण्याचा संकल्प हजारो माणसे घेतात. हे अद्भुत कीर्तनातून घडविणाऱ्या या प्रबोधनकारावर हल्ला करणाऱ्या त्या माथेफिरूचा नेमका हेतू काय, हा प्रश्न कार्यकर्त्यांसारखाच महाराजांनाही म्हणूनच अस्वस्थ करीत आहे.महाराजांवरील हल्ल्यामागे धर्मांध हिंदुत्ववादी संघटना असल्याचे काही अतिउत्साही पुरोगाम्यांना वाटते. तसा निषेधाचा स्वर तातडीने आळवल्याही गेला. खरे तर या हल्ल्यामागील मनसुबे उघड झाल्याशिवाय अशा प्रतिक्रिया व्यक्त करणे पुरोगामी चळवळीसाठीच मारक ठरत असते. महाराजांवर हल्ला करणारा धर्मांध किंवा हिंदुत्ववादी असेल तर त्याचा निषेध व्हायलाच हवा. पण, तो तसा नसेल तर मग कुणाचा निषेध करायचा, या प्रश्नाचे उत्तर पुरोगामी मंडळींकडे नाही. या हल्ल्यामागे आणखी एक कारण असू शकते, महाराजांच्या व्यसनमुक्तीच्या प्रवचनामुळे हा माथेफिरू, दारूड्या दुखावला व त्यातून त्याने महाराजांवर हल्ला केला. एखाद्या दारूविक्रेत्याने त्याला तशी सुपारी दिली असावी. अहमदनगरचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भापकर गुरुजींवर अलीकडे दारूविक्रेत्यांनी केलेला हल्ला इथे दुर्लक्षित करता येत नाही. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर बिथरलेल्या दारूविके्रत्यांनी आंदोलनातील कार्यकर्त्यांवर हल्ले केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे महामार्गावरील दारूची दुकाने बंद झाली आहेत. त्यामुळे दारूविक्रेते या आंदोलनातील कार्यकर्त्यांच्या जिवावर उठले आहेत. सत्यपाल महाराजांवरील हल्ल्यामागे ही माणसे तर नाहीत ना, याचाही शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. या घटनेमागे धर्मांध शक्तींचा हात नसल्याचे उद्या स्पष्ट झाले तर आज निषेध व्यक्त करणारे पुरोगामी उद्या महाराजांच्या सोबत राहतील का? अकोल्यात भजन सत्याग्रह करीत असलेले गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते महाराजांसोबत नक्कीच राहतील. मात्र नागपुरातील विचारवंतांचा या प्रकरणातील रस नंतर संपून जाईल. सत्यपाल महाराजांचे प्रबोधन त्या कार्यकर्त्यांसाठी ‘साध्य’ आहे पण या विचारवंतांसाठी ते ‘साधन’ आहे. महाराज सिरसोलीत गरिबांचे लग्न लावून देतात, अनाथ मुलांना शिक्षणासाठी मदत करतात त्यावेळी तिथे हे विचारवंत कधीच दिसत नाहीत. कार्यकर्ते आणि विचारवंतांमध्ये हाच मूलभूत फरक असतो. महाराज कीर्तनातून उपेक्षित समाजाचे प्राक्तन मांडतात. शेवटच्या माणसाचे दु:ख समजून घेतात आणि त्याच्या निराकरणाचा मार्ग समाजाच्या अज्ञानात शोधतात. ते कधी थकत नाहीत, कंटाळत नाहीत. त्यांना निवृत्ती घ्यावीशीही वाटत नाही. त्यामुळे परवा झालेला हल्ला त्यांना विचलित करू शकत नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबांचे विचार त्यांच्या जीवनधर्माच्या मुळाशी आहेत. पोथ्यांची पारायणे करण्यापेक्षा राज्यघटनेचे पारायण करा, असे पोटतिडकीने सांगणाऱ्या महाराजांवर किशोर जाधव या माथेफिरूने केलेला हल्ला समाज म्हणून आपण साऱ्यांनाच अस्वस्थ करणारा आहे. महाराजांच्या कीर्तनाने दलित-बहुजनांना जागवले आहे. मग त्यातीलच एक असलेल्या किशोर जाधवला त्यांना संपवावे का वाटते? समाजाला आपलेच कल्याण जाचक का वाटत असते? प्रबोधनाची लढाई कधीही संपत नाही. ती सदैव सुरूच राहिलेली आहे. त्यामुळे या दुर्दैवी घटनेनंतर सत्यपाल महाराजांची जबाबदारी आणखी वाढलेली आहे.- गजानन जानभोर
प्रबोधनाची लढाई सुरूच राहील
By admin | Published: May 23, 2017 6:52 AM