- मुकेश माचकर‘शांत व्हा अण्णा, शांत व्हा... आधी तुम्ही शांत व्हा,’ हे उद्गार कानावर आले आणि अण्णा एकदम खाडकन् जागे झाले.
मंदिरातल्या त्यांच्या पथारीसमोर साक्षात राज्याचे मुख्य साहेब उभे होते आणि ते ‘शांत व्हा’ असं म्हणत होते... अण्णांना काही कळेना...
ते भांबावलेल्या स्वरात म्हणाले, ‘माझे पीए...’
साहेब हसून म्हणाले, ‘ते जरा राज्याच्या गुप्तचर पोलीसप्रमुखांबरोबर बोलतायत, तुमच्याकडे कोण येतं-जातं त्याची माहिती देतायत...’
अण्णा एकदम तडकले, म्हणाले, ‘हे असं तुम्ही कोणालाही काहीही कसं विचारू शकता?’
साहेब पुन्हा हसून म्हणाले, ‘शांत व्हा अण्णा. तुमच्यासाठीच ही विचारपूस करावी लागते.’
साहेबांच्या तोंडून पुन्हा ‘शांत व्हा अण्णा’ असे शब्द ऐकून अण्णांनी विचारलं, ‘तुम्ही असं न सांगता, न कळवता आणि न विचारता आत आलात तेव्हा तर मी गाढ झोपेत होतो... तेव्हा तुम्ही मला शांत व्हायला का सांगत होतात? मी झोपेत काही बोलत किंवा ओरडत होतो का?’
साहेब पुन्हा हसून म्हणाले, ‘नाही हो. तुम्ही अगदी लहान निष्पाप बाळासारखे झोपलेले होतात.’
‘मग तुम्ही मला शांत व्हायला का सांगत होतात?’
‘असंय अण्णा, तुम्ही जागे झालात की अशांत होता आणि मग आंदोलनं वगैरे करता. आता या वयात तुम्हाला ही दगदग करायला लागू नये, म्हणून तुम्ही अशांत होण्याच्या आधीच मी तुम्हाला शांत करत होतो.’
‘असं इथे मला बेसावध गाठून शांत केल्यावर मी शांत होईन असं वाटतंय तुम्हाला?’
‘अलबत,’ साहेब आत्मविश्वासाने म्हणाले, ‘मी तुम्हाला शांत करूनच जाईन याची मला खात्री आहे. मुळात तुम्ही अशांत व्हावं असं काही घडतच नाहीये, हेच तर तुम्हाला सांगायला मी आलोय...’
‘तुम्ही तरूण तडफदार विरोधी पक्षनेते होता, तेव्हापासून ओळखतो मी तुम्हाला. तुमच्यासारख्या सुबुद्ध आणि सुजाण नेत्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. सरकारवर जनतेचा अंकुश असावा, सगळे मंत्री हे जनतेचे सेवक आहेत, याचं त्यांना भान असावं, यासाठी मी एवढा मोठा संघर्ष केला...’
त्यांना हाताने शांत करत साहेब म्हणाले, ‘त्या संघर्षालाच हे गोड फळ आलंय अण्णा. आता कोणी मंत्री नाही, प्रधानमंत्री नाही, मुख्यमंत्री नाही... सगळे सेवक आहेत, प्रधान सेवक, मुख्य सेवक...’
‘साहेब, नुसती नावं बदलून होतं का? जनतेच्या हातात माहितीचा अधिकार होता, तोही तुम्ही काढून घेतलात...’
‘अण्णा, तुमच्या लक्षात येत नाहीये. आधी एका घराण्याला बांधील असलेल्या चोरांचं राज्य होतं, तेव्हा जनतेला या अधिकाराची गरज होती. आता देशाप्रति संपूर्ण सर्वस्व अर्पण केलेल्या फकिरांची सत्ता आहे. फक्त आणि फक्त जनसेवेचं कंकण बांधलंय आम्ही सर्वांनी. आमचा सगळा कारभार लोकाभिमुखच आहे. आता त्या अधिकाराची गरज काय?’
‘असं कसं? सत्ता कोणाचीही असो, जनतेला हवी ती माहिती मिळालीच पाहिजे... सरकारने ती दिलीच पाहिजे...’
‘अण्णा, मुळात जनतेला माहिती हवी आहे, या गैरसमजातून बाहेर या आधी. जरा आसपास पाहा. जनता माहितीला कंटाळली आहे, वैतागली आहे. अहो हे माहितीच्या महाविस्फोटाचं युग आहे. जनता सकाळी जागी होते आणि व्हॉट्सअॅप चेक करते. तिथे दात लिंबाच्या काडीने का घासावेत, गाय उच्छ्वासातून ऑक्सिजन बाहेर टाकते, गटारी नावाचा सणच नाही, दिव्यांची अमावस्या साजरी करा, अशी तरतऱ्हेची माहिती देणाऱ्या संदेशांची भरमार असते. जनतेवर माहितीचा भडिमार होतो आहे. जनता म्हणते, क्रिकेट मॅच दाखवा, भाभीजी घर पर है दाखवा, क्राइम पेट्रोल दाखवा, गाणी दाखवा, नटनट्यांचे दिनक्रम दाखवा, मनोरंजन करा, पण माहिती आवरा. आधीच आमचे मेंदू छोटे. त्यात आधीपासूनच इतकी बिनकामाची माहिती भरलेली आहे. आता आणखी माहिती काय करायची आहे?’
‘असं जनतेच्या नावावर तुम्ही काहीही कसं सांगू शकता...’
‘काहीही कसं अण्णा? अहो, देशाला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इतके लोकप्रिय आणि भरभक्कम पंतप्रधान लाभलेले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेवर मजबूत पकड असलेले, दोन्हीचा गळा एका हाताने आवळण्याची क्षमता असलेले गृहमंत्री लाभलेले आहेत... आता जे काही माहिती असणं आवश्यक आहे, ते हे दोघे माहिती करून घेतीलच की. जनतेने कशाला डोक्याला त्रास करून घ्यायला हवा. या सक्षम चौकीदारांना आपण नेमलंय कशासाठी?’
डोक्यावर टोपी चढवत अण्णा म्हणाले, ‘तुमची स्वामीभक्ती मला समजू शकते. पण, मी फक्त त्या योगेश्वराचंच स्वामित्व मानतो. तुम्ही जे बोलताय ते मला समजतंय, पण पटत नाही. जे पटत नाही, त्याविरोधात मी संघर्ष करतो...’
‘आता संघर्ष करण्याचं तुमचं वय आहे का अण्णा?’
‘मी संघर्ष करणार म्हणजे काय करणार? उपोषण करणार. आत्मक्लेश करणार. बापूंच्या मार्गाने जाणार...’
एकदम डोळे मोठ्ठे करून साहेब उद्गारले, ‘बापूंच्या मार्गाने ‘जाणार?’ मग जीभ चावून म्हणाले, ‘अण्णा, तुम्ही ते आंदोलन केलं, तेव्हा त्यात कोण होतं, त्यामागे कोण होतं, ते देशभरात गाजत राहावं, चर्चेत राहावं, यासाठी कोणी चक्रं फिरवली, हे सगळं अजूनही कळलं नाही का तुम्हाला? त्या सगळ्या यंत्रणा नसत्या तर मीडियामध्ये ‘दुसरे गांधी’ जन्माला आले नसते...’
अण्णा म्हणाले, ‘जे काही झालं, त्यात माझा काय आणि कसा वापर करून घेतला गेला, हे मला समजून चुकलं आहे. मी काही त्या हेतूने उपोषण करत नव्हतो, हे बाकी कुणाला माहिती असेल नसेल, त्या योगेश्वराला नक्कीच माहिती आहे. तेव्हाच्या सरकारला थोडी चाड होती, त्यांना माझ्याशी चर्चा करावीशी वाटत होती, हेही मला माहिती आहे. तुम्हा सेवक मंडळींना देशातलं सगळं काही ताब्यात घेण्याची इतकी घाई झाली आहे की तुम्ही या उपोषणाची दखलही घेणार नाही, याचीही मला कल्पना आहे. कोणी येवो ना येवो, कोणी दखल घेवो ना घेवो, प्रसिद्धी मिळो ना मिळो- उपोषण करण्याचा, आत्मक्लेशाचा माझा अधिकार तर तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही. ते मी निश्चितच करीन.’
साहेब हताश चेहऱ्याने म्हणाले, ‘ठीक आहे अण्णा. जशी तुमची मर्जी. तुमच्या आंदोलनाचं काय होणार आहे, हे माहिती असताना तुम्ही त्या वाटेने चालणार असाल, तर तुम्हाला अडवणारा मी कोण? फक्त उद्या नव्या कायद्यानुसार दहशतवादी म्हणून तुम्हाला तुरुंगात डांबायचे आदेश निघाले, तर मी ऐनवेळी काहीही करू शकणार नाही, म्हणून आधीच तुम्हाला शांत करण्यासाठी मी आलो होतो... येतो मी.’
साहेब गेले, अण्णा अवाक् झाले, त्यांनी मंदिरातील मूर्तीकडे पाहिलं... योगेश्वरानेही सरळ पायांवर ताठ उभं राहून अशांतता माजवणारी बासरी ओठांवरून काढून लाठीसारखी हातात धरली होती...