एकदा शाळेत पाऊल टाकले की सामना होतो तो अभ्यास, परीक्षा अन् निकालाशी. अपेक्षित निकाल लागला की आनंद गगनात मावेनासा होतो. यश काहीसे हुकले की हिरमोडही होतो. नुकतेच सीबीएसईचे दहावी, बारावीचे निकाल लागले. त्यापाठोपाठ स्टेट बोर्डाचा निकालही आला. नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारत स्त्री शिक्षणाचा झेंडा उंचावला. मुलांनीही चांगली कामगिरी केली. सर्वच गुणवंत अभिनंदनास अन् कौतुकास पात्र आहेत. करिअरच्या दृष्टीने दहावी ही पहिली तर बारावी ही दुसरी महत्त्वाची पायरी मानली जाते. त्यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये एक एक गुण मिळविण्यासाठी स्पर्धा लागलेली असते. त्यासाठी दिवसाची रात्र करून परिश्रमही घेतले जातात. पाया मजबूत झाला की पुढची करिअरची इमारतही मजबूत होते, असे मानतात. ते बहुतांशी बरोबरही आहे. मात्र, या स्पर्धेत विद्यार्थ्यांमध्ये अनेक मानसिक बदल होत असतात. या मानसिक बदलाचे पुढे गंभीर परिणामही विद्यार्थ्याच्या वैयक्तिक व सामाजिक जीवनावर होऊ शकतात. त्यामुळे पालकांनी या दृष्टीने मुलांबाबत विचार करण्याची गरज आहे. आपलं जीवन ही देखील एक परीक्षाच आहे. जीवनाच्या प्रवासात अनेकदा आपली कसोटी लागते. पदोपदी कौटुंबिक, मानसिक, भावनिक परीक्षांना सामोरे जावे लागते. अभ्यासाच्या परीक्षांप्रमाणे या परीक्षांचे कुठलेही सिलॅबस नसते. हे प्रश्न कसे सोडवायचे याचा कुठेही परीपाठ नसतो. आपल्या अनुभवातून मिळालेल्या प्रगल्भतेच्या आधारे स्वत:च स्वत:चा गाईड बनून, या प्रश्नांची समर्पक उत्तरे आपल्यालाच शोधायची असतात. अभ्यासातील, शालेय परीक्षेतील यश हे नक्कीच महत्त्वाचे आहे. मात्र, तेवढेतच महत्त्वाचे आहे की तुम्ही जीवनात एक चांगले व्यक्ती म्हणून किती यशस्वी होता. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर येणाऱ्या जबाबदाºया तुम्ही किती यशस्वीपणे पार पाडता. कुणाच्या मदतीसाठी तुम्ही कसे धावून जाता. त्यामुळे एकीकडे करिअरचे ध्येय गाठण्यासाठी धडपड होत असताना दुसरीकडे ही भावनिक गुंतागुंत कशी सोडवायची याचे मार्ग शोधण्यासाठी आतापासूनच कुटुंबात, समाजात रममान व्हा. सर्वांना आपलसं मानून त्यांना आपलसं करण्यासाठी वेळ द्या. कोणत्याही परीक्षेचा निकाल मनासारखा लागला की तो आनंद देणाराच असतो. असाच आनंद सदैव जीवनाच्या परीक्षेतही मिळायला हवा. चांगला निकाल, एक चांगला व्यक्ती घडवतो, पण चांगले व्यक्तिमत्त्व घडले की कित्येक निकालही त्याच्या पोठोपाठ चालून येतात.
जीवनातही यशस्वी व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 5:36 AM