अंदमान-निकोबार बेटांचा समूह नितांत सुंदर असून, पर्यटकांचे हे आवडते स्थळ आहे. परंतु त्यातील सर्वांत सुंदर बेटावर कुणीच जात नाही. अमेरिकेहून भारतात आलेला एक पर्यटक नुकताच या बेटावर गेला होता; मात्र परत आला नाही. या बेटावरच्या आदिवासी जमातीच्या लोकांनी त्याची हत्या केली, असे सांगितले जाते. या सुंदर परंतु धोकादायक बेटाचे नाव आहे सेंटिनेल. या बेटावर राहणाऱ्या जमातीला ‘सेंटिनेलिस’ नावाने ओळखले जाते. मृत्युमुखी पडलेल्या अमेरिकी नागरिकाची ओळख पटली असून, जॉन अॅलन चाऊ असे त्याचे नाव आहे. सेंटिनल बेटाच्या उत्तर भागात त्याचा मृतदेह सापडला. स्थानिक मच्छीमारांनी पोलिसांना खबर दिली आणि पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून सात जणांना अटक केली.
नॉर्थ सेंटिनल बेटावर प्रवेश करण्यास मनाई का आहे, हे अनेकांना कळत नाही. या बेटावर पर्यटकच नव्हे तर सरकारी अधिकारी आणि पोलीससुद्धा कधी जात नाहीत. ‘किंग काँग’ चित्रपटातील ‘स्कल आयलंड’सारखे हे बेट आहे. जगापासून पूर्णपणे अलिप्त असलेल्या या बेटावर कुणी गेल्यास तो परत येणे अशक्य आहे. आतापर्यंत आकाशातून हे बेट अनेकांनी पाहिले असून, इतर बेटांप्रमाणेच ते शांत, हिरवेगर्द आणि सुंदर दिसते. परंतु तरीही तिथे असे काहीतरी आहे, ज्यामुळे पर्यटकच नव्हे तर मच्छीमारही त्या दिशेला फिरकण्याची हिंमत करीत नाहीत. या रहस्यमय बेटावर आदिम जमात राहते. आधुनिक काळाशी या जमातीचा काहीही संबंध नाही. ही माणसे बाह्य जगातील लोकांशी कधीच कसलाही संपर्क ठेवत नाहीत आणि कुणी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास ते हिंसक होऊन संबंधितावर हल्लाच करतात.
२00६ मध्ये काही मच्छीमार चुकून या बेटावर पोहोचले होते. परंतु काही कळायच्या आतच त्यांना मृत्यूचा सामना करावा लागला. पेटविलेले बाण धनुष्यातून सोडण्यात या बेटावरील जमातीचे लोक वाकबगार आहेत. त्यांच्या क्षेत्रावरून (टेरेटरी) उडणारे विमानसुद्धा जर प्रमाणापेक्षा कमी उंचीवरून उडत असेल, तर ते आगीचे गोळे बाणांच्या साह्याने विमानावर डागतात. बंगालच्या उपसागरातील हे बेट भारताच्या हद्दीत येत असले, तरी प्रशासनाचा या बेटाशी काडीचा संबंध नाही. या बेटावर राहणारी जमात ६0 हजार वर्षांपेक्षा अधिक काळ तिथे वास्तव्य करते, असे मानले जाते. सद्य:स्थितीत या जमातीतील लोकांची संख्या किती आहे, हेही कुणाला ठाऊक नाही. एका अंदाजानुसार या बेटावर जास्तीत जास्त शे-दोनशे लोकच राहत असावेत.
कोणत्याही प्रकारचा बाह्य हस्तक्षेप खपवून न घेणारे हे लोक कसे जगतात, त्यांचे रीतिरिवाज काय आहेत, त्यांची भाषा आणि राहणीमान कसे आहे, हेही कुणाला माहीत नाही. २00४ मध्ये आलेल्या प्रचंड सुनामीमुळे अंदमान द्वीपसमूहातील बेटे उद्ध्वस्त झाली होती. हे बेटही अंदमान द्वीपसमूहात आहे; मात्र सुनामीमुळे या बेटाची किती हानी झाली, किती लोक मृत्युमुखी पडले, याचीही माहिती आजतागायत कुणाकडे नाही. भारतीय तटरक्षक दलाने सुनामीनंतर या बेटावर जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, बेटावरील आदिवासींनी हेलिकॉप्टरवर आगीचे गोळे बाणाद्वारे सोडण्यास सुरु वात केली. त्यानंतर तेथे पोहोचण्याचे प्रयत्न थांबविण्यात आले.
या बेटावरील जमात पाषाणयुगातील आहे, असे वारंवार सांगितले जाते. कारण त्या काळातील राहणीमान पाहता आजतागायत या बेटावरील लोकांच्या राहणीमानात काहीच बदल झालेला नाही. त्यामुळेच या लोकांमध्ये ग्रहणशीलताच विकसित झाली नसावी आणि म्हणूनच बाह्य जगाशी संबंध न ठेवण्याचा स्वभाव कायम राहिला असावा, असे मानले जाते. ही जमात जगातील सर्वात खतरनाक आणि सर्वात एकलकोंडी मानली जाते. एवढेच नव्हे, तर ही एकमेव अशी जमात आहे, ज्यांच्या अंतर्गत बाबींमध्ये भारत सरकारही हस्तक्षेप करीत नाही. या जमातीतील लोकांच्या हितासाठी काही कामे करता यावीत, त्यांचे जीवनमान उंचवावे, असा प्रयत्न भारत सरकारने अनेकदा केला. आदिवासी जमातींसाठी काम करणाºया सर्व्हाइव्हल इंटरनॅशनल नावाच्या संस्थेच्या मते, नॉर्थ सेंटिनल बेटावर राहणारी जमात या ग्रहावरील सर्वात कमकुवत मानवप्रजाती आहे. या जमातीतील लोकांमध्ये रोगप्रतिकार क्षमता जवळजवळ नाहीच. किरकोळ आजारामुळेही या लोकांचा मृत्यू होऊ शकतो. बाह्य जगापासून पूर्णपणे दूर असल्यामुळे जगाशी त्यांचा संबंध पूर्णपणे तुटलेला आहे. अर्थातच, एखाद्या रोगाची साथ आल्यास संपूर्ण जमात नष्ट होण्याचा धोकाही संभवतो. अंदमान आणि निकोबार प्रशासनाने २00५ मध्ये असे म्हटले होते की, सेंटिनेलिस जमातीच्या जीवनशैलीत हस्तक्षेप करण्याचा प्रशासनाचा अजिबात विचार नाही. त्यांच्याशी संपर्क साधण्यास किंवा तिथे कायदा राबविण्यास प्रशासन बिलकूल उत्सुक नाही.
आजही जगाशी कोणताच संबंध ठेवू न इच्छिणाºया टोळ्या अस्तित्वात आहेत आणि बाह्य जगातील लोकांबरोबरच तेथील कायद्याशीही त्यांचा सुतराम संबंध नाही. त्यामुळे त्यांच्या स्वतंत्र जगात प्रवेश करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणेच होय!
- कॅप्टन नीलेश गायकवाड (अंदमान-निकोबार बेटांचे अभ्यासक)