गजानन जानभोर
या लेखातील छायाचित्रात एक गतिमंद मुलगा आपल्या आईच्या प्रेताजवळ बसलेला दिसतो आहे. काही दिवसांपूर्वी या मुलाची आई भुकेने तडफडून मरण पावली. दोन-चार दिवस माध्यमांनी उसासे टाकले, समाजाने हळहळ व्यक्त केली. नंतर ही बातमी मंत्री, प्रशासनाच्या आश्वासनात विरुन गेली. हृदय पिळवटून टाकणारे असेच एक छायाचित्र काही वर्षांपूर्वी ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झाले होते. भुकेने व्याकुळ, मरणासन्न असलेल्या एका चिमुकलीच्या मृत्यूची गिधाड वाट पाहत असल्याचे ते छायाचित्र होते. त्या छायाचित्राने दक्षिण सुदानमधील दारिद्र्याच्या प्रश्नाची तीव्रता साऱ्या जगाच्या लक्षात आणून दिली. त्या छायाचित्राला जगप्रसिद्ध ‘पुलित्झर’ पुरस्कारही मिळाला. परंतु त्या भुकेल्या मुलीला आपण मदत करू शकलो नाही ही बोच घेऊन छायाचित्रकार केव्हीन कार्टर यांनी एके दिवशी आत्महत्त्या केली. या लेखातील हे छायाचित्र आणि त्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर आपणही काही क्षणासाठी अस्वस्थ झालो आणि नंतर ही घटना विसरूनही गेलो. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील जगजीवनराम वॉर्डात राहणारी ललिता रंगारी ही दलित महिला भुकेशी झगडत व अन्नासाठी तडफडत मरण पावली. दोन वर्षांपूर्वी तिचा पती गेला. घरकाम करून ती आपल्या गतिमंद मुलाला सांभाळायची. एके दिवशी ती आजारी पडली, आजार वाढत गेला, काम सुटले. उपचारासाठी पैसे नाहीत, घरात अन्नाचा कण नाही. दिवसेंदिवस ती खंगत गेली. शेजाऱ्यांना दया यायची. तिला खायला आणून द्यायचे. आपली भूकसुद्धा धड सांगू न शकणाऱ्या मुलाला ती खाऊ घालायची. सरकारच्या योजना गरीबांपर्यंत कधीच पोहोचत नाहीत, हे दाहक वास्तव तिच्याही वाट्याला आले. निराधार योजनेचे पैसे तिला सात महिन्यांपासून मिळाले नव्हते. या पैशांमुळे तिच्या दारिद्र्याचे दशावतार संपले नसते पण किमान आपले मरण दोन दिवस पुढे ढकलता आले असते. ती गेल्यानंतर ‘खळबळजनक’ बातमी म्हणून माध्यमांनी तिची नोंद घेतली. चार दिवस हा विषय लावून धरला. ती निपचित असेपर्यंत ढिम्म असलेले प्रशासन ती गेल्यानंतर जागे झाले. सामाजिक न्यायाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्र्यांनी घरी भेट दिली. तिच्या दोन्ही मुलांच्या ‘सरकारी’ पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. प्रशासनाने उर्वरित सोपस्कार पार पाडले, मंत्र्यांनी फोटो काढून घेतले. नव्या सनसनाटी बातम्यांच्या शोधात असलेल्या माध्यमांना नंतर या विषयात रस उरला नाही. आता सर्वत्र शांतता आहे. राहिला प्रश्न वाचकांचा! तो कधीचाच ‘ग्राहक’ झाला आहे. त्याच्या चोखंदळ वृत्तीला अशा बातम्या नकारात्मक वाटण्याचीच शक्यता अधिक आहे. थोडक्यात काय तर ही घटना हळूहळू साऱ्यांच्याच विस्मरणात जाणार आहे. घरातील बाळ रडले तरी अस्वस्थ होणारी माणसे आपण. दारात भीक मागायला आलेल्या गरीबाला ताटातली चतकोर देणारेही आपणच. पण ही दलित महिला अन्नाच्या एकेक कणासाठी तडफडत होती तेव्हा कुठल्याही सरकारी योजनेला तिच्या मदतीसाठी धावून जावेसे वाटले नाही. तिच्या गतिमंद मुलाची अवस्था बघून सरकारचा ‘सामाजिक न्याय’ जागा झाला नाही! एरवी जातीपातीच्या नावावर कंठशोष करणारे समाजभूषण त्यावेळी कुठे गेले होते? ती गेल्यानंतरही सामाजिक संघटनांना तिच्यासाठी का लढावेसे वाटले नाही? पेटून उठण्यासाठी त्यांना नेमकी कोणती कारणे हवी असतात? भूकबळी हे कारण आता क्षुल्लक ठरले आहे का? शोषणाची नवी वर्गवारी या संघटनांनी ठरविलेली आहे का? मेंदूला झिणझिण्या आणणारे असे असंख्य प्रश्न ललिता रंगारी मागे सोडून गेली आहे. दलितांच्या दारिद्र्याचा, शिक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा की आमदारकी, खासदारकी? या संभ्रमात सापडलेल्या दलित नेतृत्वाला तिच्या मृत्यूचा आक्रोश म्हणूनच करावासा वाटत नसेल. तिच्या निष्प्राण देहाजवळ बराच वेळ बसून असलेल्या गतिमंद मुलाला अजूनही काहीच कळलेले नाही. जन्म आणि मरण यांच्यातील एका श्वासाचे अंतर ओळखण्याइतपत दुर्दैवाने निसर्गाने त्याला क्षमता दिलेली नाही. समाज म्हणून आपलीही अवस्था तशीच झालेली आहे.