- विजय दर्डाभारत आणि पाकिस्तानमधील तणावाची स्थिती पाहता जग चिंतेत असताना दोन्ही देशांमधील इलेक्ट्रॉनिक मीडिया मात्र प्रचंड उन्मादावस्थेत असून आग ओकत आहे. भारत सरकार संयमपूर्ण परिस्थिती हाताळत असताना सारे विरोधी पक्षही समजूतदारपणे वागत आहेत. याचवेळी आपला इलेक्ट्रॉनिक मीडिया आंधळ्या देशभक्तीच्या समुद्रात बुड्या मारत आहे. निवेदक अशा आवेशात बोलत आहेत की ते आताच सीमेवर पोहोचतील आणि युद्धाला सुरुवात करतील. एका भारतीय वाहिनीने तर वॉर रूमपण तयार केली. असं वाटू लागलं की, बस आता लढाईला सुरुवातच होईल. दुसऱ्या वाहिनीचा निवेदक एखाद्या रॅलीत सहभागी झाल्याप्रमाणे ‘भारतमाता की जय’च्या घोषणा देऊ लागला. भारतमाता की जय तर संपूर्ण देश बोलत आहे. राष्ट्रभक्ती साऱ्या देशाच्या मनात आहे, पण ती व्यक्त करण्याचा काही मार्ग असला पाहिजे.ज्या दिवशी भारताने हवाई हल्ला केला त्या दिवशी काही वाहिन्यांचे निवेदक सीमेवर पोहोचले होते. ही बाब वेगळी आहे की ते सीमेपासून खूप दूर होते. पण अशी पोझ देत होते की जसे ते नियंत्रण रेषेवरच उभे आहेत. काही निवेदकांनी तर लष्कराचे गणवेशही परिधान केले होते. कॉम्प्युटर ग्राफिक्सच्या मदतीने हे सांगितलं जात होतं की पाकिस्तानमधील या या ठिकाणांवर मिसाईल टाकले जातील. पाकिस्तान उद्ध्वस्त केला जाऊ शकतो. या वाहिन्यांनी आक्रोश आणि उन्मादाचं एक विचित्र वातावरण तयार केलं होतं. ही स्थिती केवळ भारतातच होती असं नाही. पाकिस्तानी वाहिन्या तर दोन पावलं आणखी पुढे गेल्या होत्या. त्यांचे निवेदक सांगत होते की, पाकिस्तानने अणुबॉम्ब केवळ टेबल सजवण्यासाठी ठेवलेले नाहीत. अणुबॉम्ब पडला तर दिल्ली कशी उद्ध्वस्त होईल याची ग्राफिक्स ते दाखवू लागले. पाकिस्तानचे काही निवेदक तर मिमिक्री करीत होते. समा टीव्हीचा एक निवेदक तर एकाच बुलेटिनमध्ये शेकडो वेळा ‘तोबा तोबा’ म्हणाला. पाकिस्तानच्या काही वाहिन्यांचे निवेदक तर जणू उड्याच मारत होते.अशा उड्या तर आपल्याही वाहिन्या मारत होत्या आणि अजूनही मारत आहेत. ते हे सांगत आहेत की भारतीय फौज अशा तºहेने पाकिस्तानात घुसेल आणि या पद्धतीने हवाई हल्ले केले जातील आणि नौदल अशा तºहेने कराचीला घेरेल. सगळ्यात आश्चर्यजनक बाब ही वाटली की लष्कराचे अनेक निवृत्त अधिकारी या वाहिन्यांवर येत आहेत आणि तेही या उन्मादात सामील होत आहेत. कोणीही निवेदकांना हे सांगितलं नाही की, या पद्धतीने नकाशे आपल्याला दाखवता कामा नयेत. भारतीय हवाई दलाचं कोणतं लढाऊ विमान काय करू शकतं आणि कसं करू शकतं? वाहिन्यांना आणि तेथे बसलेल्या लष्करी अधिकाऱ्यांना आपली चाल कशी असेल याबाबत शत्रूला चाहूल लागू देता कामा नये, हे लक्षात आलं नाही का?वास्तविक दोन्ही देशांच्या मीडियाने जी कामगिरी केली ती आगीत तेल ओतण्यासारखी आहे. आतापर्यंत सरकारने भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले हे घोषित केलेलं नाही. लष्कराने जी पत्रकार परिषद घेतली त्यात या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही. मात्र मीडियाने ३00 ते ३५0 चा आकडा कुठून काढला, हे माहीत नाही. हे मी अशासाठी म्हणतोय की मीही मीडियाशी संबंधित व्यक्ती आहे आणि आम्ही हे शिकलोय की जोपर्यंत पुरावा मिळत नाही तोपर्यंत कोणती बातमी प्रसारित केली जाता कामा नये. निश्चितच सूत्रांवर विश्वास ठेवला जाऊ शकतो. मात्र कुठेतरी आधार तर असला पाहिजे. बातमीच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुलवामा हल्ल्यानंतर सर्वात सुरक्षित राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटकं आली कुठून याच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला का? जेथे नाक्यानाक्यावर वाहनांची कसून तपासणी केली जाते तेथे एक दहशतवादी इतकी स्फोटकं घेऊन सीआरपीएफच्या जवानांपर्यंत पोहोचतो कसा?प्रत्यक्षात यानंतर मीडियाचं लक्ष हवाई हल्ल्याकडे वेधलं गेलं आणि पुलवामा मागे पडलं. पुढे राहण्याची ईर्ष्या अशी भिनली आहे की घडून गेलेल्या घटनांकडे लक्ष देण्याची गरजच इलेक्ट्रॉनिक मीडियाला जाणवत नाही. धांदल इतकी की हाती लागेल ते फूटेज प्रसारित केलं जातं. कित्येक खोटे व्हिडीओ आपल्या मीडियाने दाखवले आणि पाकिस्तानी मीडियानेही. तणाव दूर करण्यासाठी इम्रान खान यांनी विंग कमांडर अभिनंदन यांना भारताकडे सोपवण्याचा उल्लेख केला तेव्हा मीडियाने आरडाओरड सुरू केली की इम्रान घाबरले. मीडियाचं हे रूप योग्य होतं का, याचा विचार केला पाहिजे.सोशल मीडियाचं तर मी बोलतच नाही. कारण तेथे तर पूर्ण अराजकता माजली आहे. बातम्या कुठून येतात तेच कळत नाही. इतक्या खोट्या बातम्या पसरवल्या जातात की खºया बातम्या आपलं स्थान हरवून बसतात. प्रिंट मीडियामुळे मला आनंद वाटतो की बहुतेक वृत्तपत्रांनी आपली भूमिका जबाबदारपणे पार पाडली. वास्तविक मीडियाच्या प्रत्येक अंगाला हे समजण्याची गरज आहे की सारा देश त्यांच्यावर विश्वास ठेवतो. ही विश्वसनीयता संपुष्टात येईल, अशा हरकती टाळायला हव्यात. आपल्याला आठवेल की ९/११ नंतर अमेरिकन मीडियाने पूर्ण जबाबदारी पार पाडत उन्मादाचं प्रदर्शन केलं नाही, कारण उन्माद समस्येचं उत्तर नाही.(चेअरमन, एडिटोरिअल बोर्ड, लोकमत समूह)
देशभक्ती असणं ठीक, पण उन्माद नको
By विजय दर्डा | Published: March 04, 2019 5:28 AM