- डॉ. गोविंद काळेजटाधारी, दाढीधारी, सहा फूट उंच, डोळ्यात विलक्षण चमक असणारा कोणी एक साधुपुरुष गावात आला़ तो कोणाशी बोलत नसे़ पिंपळाच्या वृक्षाखाली तासन्तास बसून राही़ सात-आठ महिन्यानंतर तो दिसेनासा झाला़ कोणी म्हणे जंगलात जाताना पाहिला़ एकदा आमच्या शाळेची सहल जंगलातील शंकराच्या मंदिराकडे काढण्यात आली़ मुले जंगलात फिरत होती़ कोणी गुंजेचा पाला तोडत होते तर कोणी वानरांना फुटाणे घालत होते़ थोराड मुले धबधब्याचे पाणी अंगावर घेण्यात रंगून गेली होती़ एवढ्यात त्या साधुपुरुषाचे आगमन झाले़ समोरच्या प्रचंड शिळेला बघून तो मोठ्याने ओरडला ‘सापडले! सापडले!’ आनंदाने बेहोश होऊन नाचू लागला़ त्याच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद दिसत होता़ महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून नोकरी संसारात मी रमून गेलो़ चाळीस एक वर्षानंतर सहलीचे ठिकाण म्हणून सौभाग्यवती व नातवंडांना घेऊन श्रीशंकराच्या दर्शनाला गेलो़ देवळात गर्दी नव्हती़ आजूबाजूच्या वानरसेनेलाही उतरती कळा लागली होती़ पुजाऱ्याला सहज विचारले, आजकाल कोणी फारसे फिरकत नाही वाटते? लोक येतात त्या प्रचंड महाकाय मूर्तीच्या दर्शनासाठी गर्दी करतात़ अहो ! वानरसेनासुद्धा तिकडेच जास्त. मोठ्या कुतूहलाने मीही तिकडेच गेलो़ चाळीस वर्षांपूर्वीची प्रचंड शिळा नाहीशी होऊन तेथे हनुमंताची महाकाय मूर्ती विराजमान झाली होती़ पाय जमिनीवर; परंतु मस्तक आकाशाशी स्पर्धा करीत होते़ हनुमंताचे भव्य दर्शन नेत्रात मावेना झाले़ मूर्तीच्या शेजारी असलेल्या कातळावर एक श्लोक कोरलेला होता़ ‘मनोजवं मारुतततुल्यवेगं जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठंवातात्मजं वानरयुथ मुख्यम् श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये’ खाली बारीक अक्षरात कोरले होते़ ‘अनामिक’ मला त्या सहा फूट उंचीच्या जटाधारी साधुपुरुषाची आठवण झाली़ तेवढ्यात समोरून जाणाऱ्या गुराख्याला विचारले ही मूर्ती कोणी घडवली? काय बी ठावुक नाय? पण एक म्हातारा सात-आठ वर्षे छिन्नी हातोडा घेऊन उन्हातान्हात काम करत होता़ देहभान हरपलेले होते़ कवा कवा मीच त्याला गाई-म्हशीचे दूध काढून प्यायला देई़ तो कधीच बोलला नाही़ मूर्तीचे काम पूर्ण झाले त्या दिवसानंतर तो काही जंगलात दिसला नाही़ लक्षात आले ‘अनामिक’ म्हणजे तोच तो साधुपुरुष अशी मनाने ग्वाही दिली़ चराचर सृष्टीचा निर्माता ही देवाची ओळख़ सृष्टीकर्त्यांचे सुंदर दर्शन घडवितो तो मात्र कलाकार. त्याचे मूल्य करता येत नाही़ विचारचक्रात दंग झालेल्या मला नातीने जागे केले़ आजोबा ! मूर्ती जर दगडात होती तर दिसत का नव्हती? मूर्ती दिसण्यासाठी दगडातील नको तो भाग टाकीचे घाव घालून काढून टाकावा लागतो तेव्हाच दर्शन होते़ त्यासाठी दृष्टी पाहिजे, कला पाहिजे, साधना पाहिजे.
मनाचिये गुंथी : निर्मिती
By admin | Published: March 08, 2017 2:50 AM