पाऊस सगळ्यांना आवडतो. सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो. लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत, गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत, कलावंतांपासून सामान्य माणसापर्यंत सर्वांनाच तो हवा असतो. माणसांनाच काय पण प्राणी, पक्षी, फुलपाखरे, झाडे-झुडपे यांनाही तो हवा असतो.माणसाच्या प्रतिभेला पाऊस स्पर्श करतो आणि तिची वेगवेगळी रूपे तरारून येतात. कवी पावसावर कविता करतात. कथा, कादंबऱ्या, चित्रपट निर्माण होतात. अजरामर पेंटिंग्ज, संगीतातील बंदिशी जन्माला येतात. प्रेमीजनाना पावसात भिजायला आवडते, चित्रपटनिर्मात्यांना ओलेती नायिका दाखवायला आणि प्रेक्षकांना ती पहायला आवडते. पाऊस कधी घननिळा होऊन बरसतो आणि झाडाच्या फांदीतून हिरवा मोरपिसारा अवचित उलगडतो (मंगेश पाडगावकर), कधी मातीच्या सुगंधाशी एकरूप होऊन बरसू लागतो आणि मोकळ्या केसात थेंबांचे मोती गुंफू लागतो (शांता शेळके), कधी तो बेभान होऊन धिंगाणा घालत चंद्रमौळी घराची आणि बागेची नासधूस करतो (इंदिरा संत) तर कधी झाडांच्या पानांना कुरवाळत दु:खाच्या मंद सुरांनी एखाद्या संवेदनशील कवीची (ग्रेस) झोपमोड करतो...कलावंतांना वाटते की पाऊस आपल्या मालकीचा आहे. त्यावर प्रतिक्रिया देण्याचा अधिकार फक्त आपल्यालाच आहे; पण प्रत्यक्षात मुके जीव, निसर्ग आणि सर्वसामान्य माणसेही आपापल्या पद्धतीने पावसावरील प्रेम व्यक्त करीत असतात. त्यांचाही तो हक्कच नाही का? विजांचा कडकडाट आणि म्हातारीचे दळण यातील नाते शोधत गोधडीत गुडूप झोपी जाणारा नातू, भात लावणीसाठी घोंगडीची खोळ डोक्यावर घेऊन समाधी अवस्थेत बैलांच्या मागे सुटलेला नांगर, पावसाच्या पहिल्याच सरीने पालवणारे विशाल छातीचे पहाड, सुदूर माळराने, योगनिद्रेतून जागे होणारे बेडूक, खेकडे, ऐलापैलाच्या भाजीचे सुसाट सुटणारे वेल्हाळ अंकुर, हा सारा सृजनशील प्रतिसाद म्हणजे त्या पावसाला दिलेली टाळी नसते का? मात्र पाऊस जितका उत्फुल्ल आणि कोमल तितकाच तो रौद्र आणि विध्वंसक ! क्षणात तो होत्याचे नव्हते करून टाकतो. तसे पाहता विध्वंस हासुद्धा माणसाच्या जगण्याचाच एक भाग. तो धडा माणसाला शिकवण्याची जबाबदारी पाऊस घेतो. म्हणूनच यशस्वी आणि अनुभवी माणसे आपण किती पावसाळे पाहिले याचा दाखला देतात, उन्हाळे किंवा हिवाळ्यांचा नाही ! काहीही असले तरी पाऊस, सर्वांना हवा असतो. यंदाही तो मनसोक्त कोसळावा एवढीच अपेक्षा. बा पावसा, या वर्षी सर्वांना समान न्याय दे, एखाद्या गावात पडायचे विसरू नकोस, कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही (यशवंत मनोहर) असे म्हणण्याची वेळ कुणावर येऊ देऊ नकोस, एवढीच प्रार्थना...- प्रल्हाद जाधव -
मनाचिये गुंथी - प्रत्येकाचा पाऊस
By admin | Published: June 02, 2017 12:17 AM