पाकिस्तान आणि भारताच्या पंतप्रधानांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी सोमवारी परस्परांशी चर्चा करुन दोन्ही देशांदरम्यानच्या नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्याचे मान्य केल्याचे वृत्त पाकिस्तानातील जिओ टीव्हीने अधिकृतपणे दिले असले तरी त्यावर विश्वास ठेवायचा का असा प्रश्न कोणत्याही भारतीयाच्या मनात उभा राहू शकतो. पाकी पंतप्रधानांचे सल्लागार नासीर खान जंजुआ यांनी अजित डोवाल यांच्याशी संपर्क साधला आणि तणाव दूर करण्याचा प्रस्ताव त्यांच्या पुढ्यात ठेवला. तो डोवाल यांनी स्वीकारल्याचे पाकिस्तानी पंतप्रधानांचे परराष्ट्र धोरणविषयक सल्लागार सरताज अझीझ यांनीही यी वृत्तास दुजोरा दिल्याचे सदर वृत्तात म्हटले आहे. नियंत्रण रेषेवर अधूनमधून चकमकी होतच असतात. पण गेल्या तीन आठवड्यांपासून तिथे फार मोठा तणाव निर्माण झाला आहे. उरी येथील भारताच्या लष्करी तळावर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेला हल्ला आणि त्याला भारतीय सैन्याने दिलेले चोख उत्तर यामुळे तणावात आणखीनच वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर नासीर खान आणि डोवाल यांच्यात चर्चा झाली. पाकने बळकावलेल्या काश्मीरात घुसून भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईनंतर नजीकच्या काळात आणखी अशी कोणतीही कारवाई करण्याचा भारताचा इरादा नसल्याचे खुद्द भारतीय लष्करानेच जाहीर केले होते. अप्रत्यक्षरीत्या ते तणाव दूर करण्याचे एकतर्फी अभिवचनच होते. परंतु रविवारी रात्री उशिरा जम्मू-काश्मीरातील बारामुल्ला येथील भारताच्या लष्करी छावणीवर दोन अतिरेक्यांनी हल्ला केला. त्यात ते दोघे ठार मारले गेले, हे वेगळे. पण भारतात घुसखोरी करणारे दहशतवादी आणि आत्मघातकी अतिरेकी पाकिस्ताननाचे पुरस्कृत केलेले असतात हे स्वच्छ असल्याने अजित डोवाल यांच्या पुढ्यात ठेवण्यात आलेल्या तणावमुक्तीच्या देकाराबाबत शंका निर्माण होणे अनाठायी ठरत नाही. उभय देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये झालेल्या मतैक्याच्या वृत्तास दुजोरा देतानाच सरताज अझीझ यांनी भारतावर आरोप करताना, नियंत्रण रेषेवर तणाव असू नये अशी पाकिस्तानची आंतरिक इच्छा असली तरी भारत मात्र तिथे सतत तणाव निर्माण करीत असल्याचा आरोप केला आहे. नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करणे आणि काश्मीरवर सारे लक्ष केन्द्रीत करणे हा पाकचा इरादा असल्याचेही अझीझ यांनी म्हटले आहे. पण त्याहीपुढे जाऊन आणि आपल्या पंतप्रधानांचा हवाला देऊन ते म्हणतात की, जोवर काश्मीरचा प्रश्न सुटत नाही तोवर नियंत्रण रेषेवरील तणाव तसाच कायम राहील याची स्पष्ट कल्पना नवाझ शरीफ यांनी जागतिक नेत्यांना दिली आहे. हे जर खरे असेल आणि काश्मीरशी पाकचा काहीही संबंध नसताना तो प्रश्न सुटेपर्यंत तणाव कमी होणार नाही याची खुद्द शरीफ यांनाच खात्री वाटत असताना नासीर खान किंवा सरताज अझीझ काय म्हणतात व काय मान्य करतात याला काहीही महत्व उरत नाही.