बृहन्मुंबईतील बेस्टची बससेवा ही एकेकाळी देशभरात नावलौकिक टिकवून होती. राजधानी दिल्लीत खटारा बसगाड्यांमुळे सार्वजनिक वाहतुकीच्या नावाने बोंब होती, त्या वेळी मुंबईकर बेस्ट सेवेमुळे आपली कॉलर टाइट करून फिरायचे. कालांतराने दिल्लीत मेट्रो रेल्वे सुरू झाली व पाहता पाहता तिचे जाळे विस्तारले. त्याच वेळी मुंबईतील बेस्ट सेवेला उतरती कळा लागली. बेस्ट कामगारांनी बोनसच्या मागणीसाठी भाऊबीजेच्या दिवशी संपाचा इशारा दिला होता. पण महापौरांकडे वाटाघाटी होऊन साडेपाच हजार रुपये कामगारांच्या हातावर टेकवण्याचा निर्णय झाला आणि मुंबईकरांची संपाच्या जाचातून सुटका झाली. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी ज्या मोजक्या चांगल्या गोष्टी आपल्यासाठी मागे सोडल्या, त्यात बेस्टचा समावेश आहे. बेस्टचा कारभार एखाद्या खासगी कंपनीप्रमाणे चालत होता. परिवहन सेवेत तोटा, पण वीज वितरणात नफा या सूत्रावर चालणाºया बेस्टला पहिला फटका बसला तो विजेच्या नफ्यातून परिवहनची तूट भरून काढण्यास वीज नियामक मंडळाने विरोध केल्याने. एकेकाळी बेस्टच्या कामगारांना वेतनवाढ व बोनस देण्याकरिता संघर्ष करावा लागत नव्हता. मात्र निवडणुका आणि लोकानुनयी राजकारण यांचा घट्ट संबंध असल्याने सत्ताधारी शिवसेनेने मुंबईकरांचा रोष टाळण्यासाठी बेस्टचे भाडे कालसुसंगत वाढवण्यास परवानगी दिली नाही. वर्षानुवर्षे भाडेवाढ न केल्यास तूट वाढत जाते व ती भरून काढण्यासाठी अचानक मोठी भाडेवाढ केल्यास जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागते. मात्र राजकारणासाठी बेस्टसारख्या संस्थांच्या गळ्याला नख लागले तरी त्याचे राजकीय पक्षांना सोयरसुतक नसते. त्यातच अनेक भागांत रिक्षा व टॅक्सी यांच्या पॉइंट टु पॉइंट सर्व्हिसला आणि शेअर सेवेला परवानगी दिल्याने प्रवाशांचा कल त्याकडे वळला. शेजारील नवी मुंबई, ठाणे वगैरे महापालिकेतील बसना मुंबईत येण्यास परवानगी दिली गेल्याने बेस्टचे कंबरडे पारच मोडले. आता तर ओला, उबर वगैरे टॅक्सी सेवांनी सर्वच महापालिकांच्या परिवहन सेवांपुढे आव्हान उभे केले आहे. वातानुकूलित बसगाड्या हा तर बेस्टसाठी पांढरा हत्ती ठरला. बेस्टच्या सर्वसाधारण भाड्याच्या तुलनेत वातानुकूलित बसचे भाडे तिप्पट असल्याने प्रवाशांनी त्याकडे पाठ फिरवली. याखेरीज बसगाड्यांचे सुटे भाग, टायर खरेदीतील भ्रष्टाचार हेही बेस्ट पंक्चर होण्याचे एक कारण आहेच. गेल्या काही वर्षांत ब्रिटिशांचे सार्वजनिक वाहतुकीचे मॉडेल मोडीत काढून खासगी मोटारींचे अमेरिकन मॉडेल मुंबईकरांनी जवळ केले आहे. परिणामी मुंबईकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत वेळीच बेस्टसारखी संस्था आर्थिक अरिष्टातून बाहेर काढली नाही, तर पंधरा-वीस वर्षांपूर्वी दिल्लीत जी स्थिती होती ती मुंबईत अनुभवास येईल.
बेस्ट जगवा, मुंबई वाचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 12:35 AM