- किरण अग्रवाल
द्वेषाने, हिंसेच्या राजकारणाने देश जोडला जाऊ शकत नाही, त्यासाठी परस्परांबद्दल प्रेम व सद्भाव असणे गरजेचे आहे, त्यासाठी ‘नफरत छोडो, भारत जोडो’चा नारा देत निघालेल्या राहुल गांधी यांच्या यात्रेला लाभलेले सामान्यांचे समर्थन या पुढील काळात टिकवून ठेवणे हेच खरे कसोटीचे आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात व त्यातही विदर्भात मिळालेला प्रतिसाद त्यांच्या पक्षाचा उत्साह वाढविणाराच असून, विरोधकांनी या यात्रेची घेतलेली दखल हीच त्याची पावती आहे. अर्थात यापुढील काळात हा उत्साह टिकवून ठेवणे हेच खरे काँग्रेससाठी आव्हानाचे आहे.
राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढली आहे, तिचा प्रवास महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमधून झाला त्यात वाशिम, अकोला व बुलढाणा हे तीन जिल्हे विदर्भातील आहेत. कोणे एके काळी विदर्भातील काँग्रेसची स्थिती अतिशय मजबूत होती, परंतु आता त्या स्थितीला घरघर लागली आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणारी नाही. अशा स्थितीत महाराष्ट्रात आलेल्या भारत जोडो यात्रेने काँग्रेसमध्ये चैतन्य आणले हे नक्की.
विशेष म्हणजे या यात्रेच्या निमित्ताने स्थानिक पातळीवरील विविध गटातटांचे सर्व नेते एकत्र झालेले पाहावयास मिळालेच; परंतु या यात्रेला जनसामान्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला दिसून आला. भल्या पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत व दुपारच्या उन्हातही हजारो नागरिकांनी, आबालवृद्धांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून राहुल गांधी यांचे स्वागत केले. त्यांना जवळून पाहण्यासाठी, त्यांच्यासोबत दोन पावले चालण्यासाठी सर्वांचीच धडपड दिसून आली. लोकांनी रस्त्यावर रांगोळ्या काढल्या, फुलांचा सडा टाकला, अतिशय हृदयपूर्वक त्यांचे स्वागत झाले. संत नगरी शेगावमधील यात्रा तर ऐतिहासिक झाली. तेथील गर्दीचे विक्रम त्या सभेने मोडले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दलची ही सर्वसामान्यांची स्वीकारार्हता आता यापुढील काळात कशी टिकवून ठेवता येईल याचा विचार होणे गरजेचे आहे.
विदर्भातील ज्या वाशिम व अकोला जिल्ह्यातून ही यात्रा गेली व आज ती बुलढाणा जिल्ह्यातील शेवटच्या चरणात आहे, या तीनही जिल्ह्यांतील काँग्रेसची खस्ता हालत लपून राहिलेली नाही. १५ पैकी अवघे २ आमदार काँग्रेसचे आहेत. अकोला जिल्ह्यात १९९० नंतर काँग्रेसचा एकही खासदार-आमदार निवडून आलेला नाही. अपवाद फक्त १९९९ मध्ये बाळापूरमधून निवडून आलेल्या लक्ष्मणराव तायडेंचा. अकोला जिल्ह्यात हा पक्ष सध्या शेवटची घटिका मोजत आहे. येथे अनेक गट आहेत, त्यातूनच हा पक्ष रसातळाला गेला. वाशिममध्ये माजी खासदार व दोन गट काँग्रेससमाेरचे आव्हान हाेते. रिसोड मतदारसंघात या दोन्ही गटांचा राजकीय संघर्ष नेहमीच असायचा. मात्र, अमित झनक यांनी त्यांचा बालेकिल्ला कायम ठेवत काँग्रेसचा झेंडा फडकत ठेवला. आता बाकी दाेन्ही विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसला विजयासाठी चाचपडत राहावे लागत आहे. बुलढाण्यात गेल्या विधानसभेत काँग्रेसला मोठा पराभव सहन करावा लागला. मलकापूर हा नवा मतदारसंघ मिळवताना जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघ त्यांना गमवावे लागले. वऱ्हाडच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बुलढाण्यात काँग्रेसचे संघटन मजबूत आहे, राहुल बोंद्रे यांच्यासारखे सक्षम नेतृत्व आहे; पण गटबाजीमुळे येथेही एकसंघ ताकद उभी राहत नाही व विराेधकांना संधी मिळते.
भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने मात्र सर्व ठिकाणचे, सर्व गटांचे नेते हातात हात घालून एकत्र आल्याचे चित्र बघावयास मिळाले. अर्थात राहुल गांधी यांच्या निमित्ताने, त्यांच्या समोर दिसलेले हे चित्र यापुढील काळात तसेच कायम दिसणे अवघड असले तरी अशक्य नक्कीच नाही. त्यासाठी आजपर्यंत अनेक संधी घेतलेल्यांना मनाचा मोठेपणा दाखवून दोन पावले मागे यावे लागेल व नवोदितांना पुढे जाण्यासाठी संधी द्यावी लागेल. जमेल का हे, हाच खरा प्रश्न आहे.