भय्युजी महाराज ऊर्फ उदयसिंह देशमुख या संसारी अध्यात्मसाधकाने आपल्या राहत्या घरी कानशिलावर गोळ्या झाडून आत्महत्या करावी ही घटना जेवढी हळहळ वाटायला लावणारी तेवढीच ती तिचे गूढ उलगडण्याची जिज्ञासा जागविणारी आहे. सन्मार्गावर चाललेल्या अनेकांनी त्यांच्या जीवनयात्रा याआधीही स्वेच्छेने संपविल्या आहेत. आ. विनोबांनी प्रायोपवेशन केले. सावरकरांनी व माधवराव कानेटकरांनी त्याच मार्गाने जाऊन जगाचा निरोप घेतला. साने गुरुजींनीही आत्महत्येच्या मार्गाने आपली जीवनयात्रा संपविली. आपले कार्य संपले म्हणून या मार्गाने जाणारे अनेक थोरपुरुष जगाला ठाऊक आहेत. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राने शरयूच्या प्रवाहात शिरून आपली इहलोकीची यात्रा संपविली. ज्ञानेश्वरांनी ती समाधी घेऊन संपुष्टात आणली. भय्युजी महाराजांना त्यांच्याएवढ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे कारण नाही. मात्र जीवनेच्छा संपविण्याच्या मानसिक व अन्य कारणांचा शोध घ्यायचे म्हटले की मोठी नावेही घ्यावी लागतात. भय्युजी महाराज संसारी होते. त्यांचे दुसरे लग्न नुकतेच झाले होते. राजकारण व समाजकारणात त्यांची वट होती. शिष्य परिवार मोठा होता. त्यांना भाजपने राज्यमंत्रिपद देऊ केले व ते त्यांनी नाकारले होते. महाराष्ट्रातील अनेक जुने व नवे नेते त्यांचा आशीर्वाद घ्यायला त्यांच्या दारात रांगा लावताना दिसले. त्यातून त्यांचे वय अवघे ५० वर्षांचे आणि त्यांच्यासमोर कोणतीही ऐहिक वा व्यावहारिक अडचण नसलेली. नाही म्हणायला एका मराठी नियतकालिकाने त्यांचे वाभाडे काढणारा एक लेख काही काळापूर्वी प्रकाशित केला तर दुसऱ्या एका स्त्रीने त्यांच्यावर विपरीत आरोप केल्याच्या कहाण्या प्रसिद्ध झाल्या. मात्र त्या घटनांनी विचलित व्हावे आणि आयुष्याचा शेवट करावा एवढी ती प्रकरणे मोठी नव्हती वा त्यांची चर्चाही नव्हती. दरम्यान मध्य प्रदेशच्या भाजप सरकारने त्यांच्यासोबत पाच महंतांना राज्यमंत्र्याचा दर्जा दिला. तो देताना त्यांनी पुढल्या काळात भाजपसाठी प्रयत्न करावे अशी अपेक्षाही बाळगली असे म्हटले जाते. भय्युजी महाराजांच्या आत्महत्येची कारणे शोधा ही काँग्रेस पक्षाची आताची मागणी व ही चर्चा यांच्यात खरोखरीच काही नाते असेल तर ते मात्र कमालीचे गंभीर मानावे असे आहे. भय्युजी महाराज अंधभक्ती सांगत नव्हते. जुन्या आचार-विचारांचा प्रचार करीत नव्हते. विज्ञानाच्या बाजूने जाणारे व आधुनिक जीवनाची कास धरणारे होते. तरीही त्यांना ताणतणावांनी ग्रासले होते असे जे म्हटले जाते त्याची कारणे शोधली गेली पाहिजे. आत्महत्येचा मार्ग दुबळी माणसेच अनुसरतात असे समजण्याचे कारण नाही. ग्रीकांमधील थोर तत्त्वज्ञ अॅरिस्टॉटल यानेही हेमलॉक हे विष पिऊन आत्महत्या केली. त्याआधी अॅनाक्झीमँडर या तत्त्वज्ञाने ज्वालामुखीच्या विवरात उडी घेऊन आपले आयुष्य संपविले. थेल्स आणि पायथागोरस हे तत्त्वज्ञ स्वत:ला ईश्वर समजणारे होते, तरीही त्यांचा शेवट काहीसा गूढच राहिला. त्यामुळे अध्यात्माचा वा त्यागाचा मार्ग माणसांना बळ देतो ही बाबच संशयास्पद होते. गांधीजींच्या खुनाचे प्रयत्न अनेकवार झाले तरीही आपण १२५ वर्षे जगणार असल्याची श्रद्धा त्यांनी बाळगली होती. फाळणीनंतर दिल्लीतल्या दंगली त्यांच्या प्रयत्नाने थांबल्या तेव्हा तर ‘मी १३१ वर्षे जगणार आणि पाकिस्तानात जाऊन तेथील हिंदूविरोधी दंगली थांबविणार’ असे ते म्हणाले होते. नथुरामने त्यांचा खून करून त्यांची ती आकांक्षा संपविली. मात्र एवढी धकाधक आयुष्यभर करणाºया गांधीजींची जीवनेच्छा एवढी तीव्र दिसली असताना आताच्या या अध्यात्म गुरूला त्याच्या जीवनाचा शेवट करताना पाहावे लागणे हे केवळ दु:खदायकच नाही तर त्याच्या कृत्यामागे जाऊन त्याची ऐहिक व कायदेशीरच नव्हे तर मानसशास्त्रीय चिकित्सा करणेही गरजेचे आहे. आत्महत्या हा दुबळ्यांचा मार्ग ही समर्थमनाची माणसेही जवळ का करतात? जीवनेच्छा संपणे आणि ती संपविण्याची गरज वाटणे यातला फरकही या निमित्ताने साºयांना कळावा असा आहे. विदर्भ व महाराष्ट्रात भय्युजी महाराजांचे अनेक भक्त व चाहते होते. त्या साºयांमध्ये त्यांच्या अनाकलनीय आत्महत्येने दु:खाची अवकळा आली आहे. त्याही साºयांना या आत्महत्येचे खरे कारण कळणे गरजेचे आहे.
भय्युजी महाराजांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:32 AM