- विनायक पात्रुडकर
सुमारे ३४ वर्षांपूर्वी म्हणजेच २, ३ डिसेंबर १९८४ रोजी मध्य प्रदेश येथील भोपाळमध्ये वायु गळती झाली होती. या वायुगळतीत हजारोंचा बळी गेला. हजारोंना कायमचे व्यंगत्त्व दिले. ही घटना भारताला नव्हे, तर संपूर्ण जगाला हादरा देणारी होती. आजही या घटनेच्या जखमा कायम आहेत. या घटनेची आठवण व्हावी, अशीच एक घटना गेल्या आठवड्यात रायगड येथे घडली.
येथील रासायनिक कंपनीत वायु गळती झाली. या वायुगळतीने प्राणी व पक्षांचे बळी घेतले. या कंपनीतील निदर्यी अधिकाऱ्यांनी मृत प्राणी व पक्षांचे मृतदेह पुरून पुरावे नष्ट केले. ही बाब नक्कीच निंदनीय आहे. येथील जागरुक गावकऱ्यांनी ही घटना उजेडात आणली. याची दखल घेत लोकमतने या घटनेला सर्वप्रथम प्रसिद्धी दिली. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. कारवाई सुरू झाली. लोकमतमुळे इतर माध्यमांनाही या वृत्ताची दखल घ्यावी लागली. कारवाईचा वेग प्रचंड असल्याने प्राणी व पक्षांचे मृतदेह पुरणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला. पुढे दोषींवर खटला चालून त्यांना शिक्षा होईल. ही शिक्षा तुरळक असेल, कारण वायुगळतीने प्राणी व पक्षांचा बळी जाणे, अशा घटनेला गंभीर शिक्षा देणारे कलम नाही. या घटनेत काही कामगारांनाही बाधा झाली. ही बाधा किरकोळ आहे.
त्याआधारावरही अधिकाधिक शिक्षेची मागणी करता येणार नाही. त्यातूनही विरळातील विरळ घटना म्हणून आरोपींना गंभीर शिक्षा द्यावी, अशी मागणी करता येणे शक्य आहे. कारण प्राणी व पक्षी हे अधिक संवेदनशील असतात. वायुगळतीचा परिणाम सर्वप्रथम त्यांच्यावर होतो. हा परिणाम जाणवल्यानेच प्राणी व पक्ष्यांचा बळी गेला. तेथील अधिकाऱ्यांना या घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ पुरावे नष्ट करण्याचे काम केले.
ही वायुगळती अजून काही वेळ सुरू राहिली असती तर बळी जाणाऱ्यांची संख्या मोठी असती. त्याचा आधार घेत गंभीर शिक्षेची मागणी करता येईल. हा कायदेशीर भाग असला तरी महाराष्ट्रातील भोपाळ अशा नावाने ही घटना ओळखली गेली असती. याचे परिणाम अनेक वर्षे येथील भूमीला व नागरिकांना भोगावे लागले असते. तेव्हा या घटनेकडे भविष्यातील गंभीर धोका, या दृष्टीनेच प्रशासनासह सर्वांनाची बघायला हवे. आज अनेक रासायनिक प्रकल्प महाराष्ट्रात ठिकठिकाणी सुरू आहेत. त्याने नद्या दुषित होत आहेत. वायुचे प्रदुषण होत आहे. पर्यावरणाची हानी होत आहे. मात्र, आपल्या दफ्तरी कारभाराला समाधी लागली आहे. जनता काही प्रमाणात जागरुक असल्याने डाऊ सारखे प्रकल्प प्रस्तावित असतानाच हद्दपार झाले. तरीही अनेक रासायनिक प्रकल्प हे जीवघेणे असतानाही सुरू आहेत. अशा प्रकल्पांना निर्बंध घालणे आवश्यक आहे. किमान या घटनेनंतर तरी या दृष्टीने विचार करायला हवा. तरच भविष्यातील अशा घटनांना आळा बसेल.