अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचार विरोधी अभियान जर त्याला अपवाद ठरु शकले नाही तर मग त्यापुढे भूमाता ब्रिगेडची काय कथा? तसाही महाराष्ट्राचा या बाबतीतला लौकीक थोरच आहे. विविध कारणांसाठी संघटना उभारायच्या आणि उभारलेल्या संघटनांमध्ये मतभेद निर्माण होऊन एक तर त्या निर्जीव बनायच्या किंवा त्यांच्या चिरफळ्या उडायच्या. भूमाता ब्रिगेड ही संघटनाही याच वळणावर गेल्याचे दिसून येते. मुळात अशी काही संघटना आहे याचा राज्याला तेव्हांच तपास लागला जेव्हां तिने शनिशिंगणापूर येथील शनीच्या चौथऱ्यावर महिलाना असलेल्या बंदीच्या विरोधात उठाव करण्याचा निर्णय घेतला. प्रजासत्ताकदिनाचा मुहूर्त पाहून संघटनेने आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह चौथऱ्यावर जाण्याचा निर्धार केला खरा पण पोलिसांनी तो हाणून पाडला. त्यानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्याना मध्यस्थी करण्याचे आवाहन केले. या संपूर्ण काळात संघटनेच्या अध्यक्ष तृप्ती देसाई हाच संघटनेचा एकमेव चेहरा लोकांसमोर म्हणजेच माध्यमांसमोर येत राहिला. कदाचित त्यातून निर्माण झालेल्या असूयेमधूनच संघटनेच्या उपाध्यक्षासह तीन महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी संघटनेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला असावा. त्यांनी याबाबत आपले मन खुले केले नसले तरी संघटनेच्या कामकाजाबाबत तात्त्विक मतभेद निर्माण झाल्याचे मोघम कारण त्यांनी पुढे केले आहे. संघटनेला दुसरा कोणताही कर्तबगार चेहरा नको होता असा मोघम आरोप करणाऱ्या एका पदाधिकाऱ्याने आता आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांसारख्या महत्वाच्या समस्येवर लक्ष केन्द्रीत करणार असल्याचे म्हटले आहे. वस्तुत: मुळातच भूमाता ब्रिगेडने हाती घेतलेला लढा तसा सोपा नाही. पुरुषी समाजाचा त्यांच्या लढ्याला कधीच पाठिंबा नव्हता आणि तो मिळेल याची शक्यताही कमीच असताना काही महिलादेखील परंपरांचे पालन करण्याच्या मताच्या आहेत. अशा स्थितीत विशिष्ट मागणी घेऊन उभ्या राहिलेल्या लढाऊ संघटनेत मतभेद निर्माण होणे सरकारच्या दृष्टीने नेहमीच सोयीचे असते.
‘भूमाते’ला तडा?
By admin | Published: February 10, 2016 4:28 AM