- विनय सहस्रबुद्धे भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, राज्यसभा सदस्यपुढच्या बुधवारी, म्हणजेच बरोबर एक आठवड्यानंतर अयोध्येत श्रीरामाच्या भव्य आणि ऐतिहासिक मंदिराच्या उभारणीसाठी भूमिपूजन संपन्न होणार आहे. भारतावर चढाई करून आलेल्या आक्रमक बाबराने काही शतकांपूर्वी उद्ध्वस्त केलेल्या राममंदिराची त्याच जागेवर होत असलेली पुनर्बांधणी म्हणजे भारताच्या राष्ट्रीय आत्मसन्मानाची पुनर्स्थापना होय. हे कार्य याआधीच होण्याची गरज होती; परंतु, सोमनाथ येथील मंदिराच्या पुनर्बांधणीनंतर तत्कालिन राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी त्याच्या उद्घाटनास जाऊ नये, अशी भूमिका त्यावेळच्या मातब्बर नेत्यांनी घेतली होती आणि त्यामागच्या दिग्भ्रमित आणि पराभूत मानसिकतेमुळेच हे कार्य याआधी होऊ शकले नाही. येत्या ५ आॅगस्टला होत असलेले हे बहुप्रतिक्षित भूमिपूजन ऐतिहासिक ठरते ते यामुळेच.
राजस्थान चितौडगढ येथे १४४८ मध्ये राणा कुंभ या पराक्रमी राजाने महम्मद खिलजीचे आक्रमण परतावून लावल्यानंतर स्वत:च्या नावाचा नव्हे, तर भगवान विष्णूला समर्पित केलेला विजयस्तंभ उभारला होता. भारतातील राजे-महाराजे राजकीय सत्तेकडे पाहताना कोणत्या दृष्टिकोनातून विचार करीत; त्याचे हे उदाहरण आहे. एखाद्या माथेफिरू आक्रमकाने नंतर हा विजयस्तंभ उद्ध्वस्त केला असता तर त्याची पुनर्स्थापना जेवढी महत्त्वाची ठरली असती, तशीच राममंदिराची पुनर्बांधणी महत्त्वाची आहे. ‘राम राज्य’ ही भारतीय सुशासनाच्या आदर्शांची संकल्पना आहे. त्यादृष्टीने बघितले तर आध्यात्मिक आणि राजकीय लोकशाही, सामाजिक न्याय व समता, समरसता आणि लोकसहभाग आदी भारतीय मूल्यव्यवस्थेची आपणच आपल्याला आठवण करून देण्याचा हा ऐतिहासिक प्रसंग आहे. त्यासाठीच राममंदिराचे भूमिपूजन हे भारताच्या उज्ज्वल भवितव्याचे भूमिपूजन ठरते आणि तसेच ते ठरायला हवे.पाच आॅगस्टपूर्वी शनिवारी एक आॅगस्टला लोकमान्य टिळकांची स्मृतिशताब्दी साजरी होतेय. शिवाय, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीचीही तीच तारीख आहे. लोकमान्यांनी स्वराज्य संकल्पनेचा एल्गार केला आणि तो करण्यापूर्वी राष्ट्रीय आणि सामाजिक एकात्मतेसाठी गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सर्वांनी सामूहिकतेने साजरे करण्याची परंपरा सुरू केली. सामाजिक ऐक्याच्या आवश्यकतेची लख्ख जाण असलेले लोकमान्य, त्यांच्या सर्वसमावेशी सामाजिक सक्रियतेमुळेच ‘तेल्या तांबोळ्यांचे पुढारी’ म्हणून प्रसिद्ध झाले.
ज्या दिवशी लोकमान्यांचे निधन झाले, त्याचदिवशी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्म झाला. तरुणपणी साम्यवादी विचारांचे अनेकांना असते तसेच आकर्षण अण्णा भाऊंनाही होते; पण पुढे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रभावित झाले. ज्या समाजाने आपल्यावर अन्याय केला, त्याच समाजात खंबीरपणे उभे राहून अन्यायाला जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी त्यांनी आपली प्रतिभासंपन्न लेखणी वापरली. पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटक राहिलेल्या अण्णा भाऊंच्या कामाची २००२ मध्ये वाजपेयी सरकारने योग्य दखल घेतली व त्यांच्या स्मरणार्थ पोस्टाचे एक तिकीटही प्रकाशित केले.
लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्यातील समान दुवा म्हणजे ‘स्व’ची जाणीव विकसित करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न. टिळकांनी ‘स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क असल्याचे’ तर उच्चरवाने सांगितलेच, पण त्यापूर्वी स्वदेशी, स्वभाषा व स्वभूषा जपण्याबाबतही अनेक मार्गांनी जनजागृती केली. स्वराज्य संपादनानंतर भाषावार प्रांतरचना करावी लागेल ही दूरदृष्टी लोकमान्यांकडे होती व तसे त्यांनी लिहिलेही होते. काँग्रेसच्या अधिवेशनातही प्रादेशिक भाषांमधून प्रतिनिधींनी आपले विचार मांडायला हवेत; याबद्दल ते आग्रही होते. ‘गीता रहस्य’ हा ग्रंथ ते इंग्रजीतही लिहू शकले असते; पण त्यांनी तो मराठीत लिहिला. कारण एतद्देशीय भारतीय समाजाला कर्मयोग शिकविणे जास्त आवश्यक आहे, असे त्यांचे ठाम मत होते. अस्मितेच्या जपणुकीची व त्याद्वारे संघटना बांधणीची हीच रणनीती लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी देखील स्वीकारली होती; हे इथे नमूद केले पाहिजे.लोकमान्यांची स्मृतिशताब्दी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी ही अयोध्येत होणाऱ्या भव्य राममंदिराच्या भूमिपूजनामागची पार्श्वभूमी आहे, हा निव्वळ योगायोग नाही; कारण त्यामागे अस्मिता आणि आकांक्षा हे समान घटक आहेत.
अस्मिता ही केवळ अस्मितेसाठीच महत्त्वाची नसते. अस्मितेचा व्यापक संदर्भ ज्यावेळी समाजाच्या समुत्कर्षाच्या आकांक्षेशी जोडला जातो, त्यावेळी अस्मितेचे महत्त्व आणखी वाढते. देशातील अठरापगड जातींची समरसता आणखी मजबूत करून एकरस आणि आकांक्षावान भारताला आता आत्मनिर्भरतेच्या मार्गाने पुढे घेऊन जाणे, हे आपल्या सर्वांसमोरचे सामूहिक आव्हान आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली ते आपण पेलूही; परंतु आत्मनिर्भरतेची आस आकर्षक असली तरी त्यासाठीचे प्रयत्न सोपे नाहीत. ‘आत्मनिर्भर’ होण्यासाठी आधी ‘आत्म’परिचय असावा लागतो. स्वत:च्या क्षमतांची आणि मर्यादांची जाणीव असावी लागते. आव्हानांचा एकत्रित मुकाबला करण्यासाठीची जिद्द मनामनात निर्माण करावी लागते. तिथेही पुन्हा अस्मितेच्या जाणिवेतून फुललेल्या आकांक्षांची गरज असते. अयोध्येत होणारे भूमीपूजन हे भारताच्या भविष्यवेधाचे भूमीपूजन ठरायला हवे ते याचसाठी!