बऱ्याच वर्षापूर्वी माझ्या एका मित्राने मला लँकेशायर क्रिकेट संघाविषयी एक प्रसंग सांगितला होता. या संघाची यॉर्कशायर संघासोबत नेहमीच चुरस असायची. १९६० साली लँकेशायर काऊन्टी क्रिकेट क्लबचे त्यावेळचे अध्यक्ष, ओल्ड ट्रॅफर्ड मैदानाच्या ड्रेसिंग रूममध्ये गेले आणि त्यांनी तिथे नुकतेच पदार्पण केलेल्या जलदगती गोलंदाजाला विचारले की, त्याचा जन्म कुठला आहे. त्यावर त्याने अपराधीपणाने उत्तर दिले, टॉडमोर्डेन. (यॉर्कशायरच्या सीमेवरचे हे एक खेडे) त्यांचे संभाषण लँकेशायरचा यष्टीरक्षक ऐकत होता. त्याने आपल्या सहकाऱ्याचे ते उत्तर ऐकून ‘मूर्ख विदेशी’ असे उद्गार काढले. त्या यष्टीरक्षकाचे नाव, फारुख माणेकशॉ इंजिनियर! त्याचा जन्म इंग्लंडपासून लक्षावधी मैल दूर असलेल्या मुंबईतील दादर पारसी कॉलनीत झाला होता. पण जे लोक लँकेशायर काऊन्टी क्रिकेट क्लब चालवत होते त्यांना मुंबईहून इंजिनियर आणि गयानातून क्लाईव्ह लॉईड यांना संघात घेतांना आनंद वाटत असे कारण त्या दोघांच्या मदतीने त्यांना ट्रॉफीज जिंकायच्या होत्या. पण शेजारच्या देशातून एखादा खेळाडू घेताना मात्र ते एवढे खूष नसत. मला हा प्रसंग आठवायचे कारण म्हणजे मी दोन आठवडे लंडनमध्ये होतो व त्यावेळी तिथल्या राजकीय वर्तुळात इंग्लंडने युरोपियन युनियन मध्ये राहायचे की नाही या साठी जनमत चाचणी घेण्यावर चर्चा चालू होती. ही जनमत चाचणी घेण्याचे आश्वासन पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी २०१५ साली निवडणूक प्रचाराच्या वेळी दिले होते. त्यावेळी राष्ट्रवादी विचाराच्या युनायटेड किंग्डम इंडिपेन्डन्ट्स पक्षाला मिळणारा जनतेचा पाठिंबा वाढत होता. पण कॅमरून यांच्या कॉन्झर्व्हेटीव्ह पार्टीला युरोपियन युनिअनच्या हेतूंविषयी शंका वाटत होती. युरोपियन युनियन मधून बाहेर पडण्याच्या चळवळीला ब्रेक्सित असे म्हटले जाते. त्यामागे फ्रांसमध्ये मेरी ले पेन यांच्या नॅशनल फ्रंटचा वाढत असणारा प्रभाव, तसाच पोलंडमधील लो एंड जस्टीस पार्टीच्या जरोस्लाव कझन्स्किी यांचा वाढत असणारा प्रभाव आणि अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेतील त्याच भावना यांचा प्रेरणा आहे. हे नेते व त्यांचे पक्ष नेहमीच देशाबाहेरून आलेल्या नागरिकांना दूषणे बहाल करीत असतात. नॅशनल फ्रंटसाठी हे विदेशी म्हणजे मुस्लीम आहेत तर डोनाल्ड ट्रंप यांच्यासाठी ते मुस्लीम आणि मेक्सिकन आहेत. ट्रंप यांची भाषा जशी चिथावणीखोर, शिवराळ व कर्कश असते तशीच ती थोडीफार ब्रेक्सित चळवळीचे नेते बोरिस जॉन्सन यांची सुद्धा आहे. या चळवळीतील मवाळ लोकांच्या मते युरोपिअन युनिअन ब्रिटीश लोकांना त्यांचे स्वत:चे कायदे बनवू देत नाही आणि अर्थव्यवस्था सुद्धा चालवू देत नाही. बोरिस जॉन्सन यांनी अलीकडेच युरोपिअन युनिअनची तुलना नेपोलिअन आणि हिटलरच्या संकल्पनेतील अखिल युरोपियन राज्याशी केली आहे. जॉन्सन हे ब्रिटीश स्वाभिमानाचे पुरस्कर्ते आहेत व स्वत:ला वेलिंग्टन किंवा चर्चिलचे वारसदार म्हणवून घेत असतात. विदेशी लोकांचा वाढता प्रभाव व त्यांचे केले जाणारे स्वागत याला ब्रेक्सित चळवळीचा विरोध आहे. त्यांच्या दृष्टीने असे करणे राष्ट्रीय मूल्यांच्या, राष्ट्रीय स्वाभिमानाच्या आणि राष्ट्राच्या महानतेच्या विरोधात आहे. ले पेन, काझिन्स्की, ट्रंप आणि जॉन्सन हे सर्व आवर्जून स्वत:ला राष्ट्रभक्त म्हणवितात. ते त्यांच्या देशाला अधिक सुखी, प्रबळ आणि पूर्णपणे तृप्त ठेवू इच्छितात. त्यातूनच प्रत्येक वेळी काही वाईट घडले तर त्याचा दोष विदेशी लोकांना देण्याची त्यांची मानसिकता तयार झाली आहे. ते आपल्या समाजातील भेदाभेद आणि दोष समजूनच घेत नाहीत. कदाचित राष्ट्राचे अपयश यातच लपलेले असावे पण दोष मात्र दिला जातो विदेशी लोकांना. मागील आठवड्यात मी जेव्हा लंडनमध्ये होतो तेव्हा काही प्रभावी लोकांनी ब्रेक्सित चळवळीच्या विरोधात वक्तव्ये केली होती. त्यात नाटोचे पाच माजी सचिव होते, त्यांनी असे म्हटले की, युरोपियन युनियन सोडल्याने ब्रिटनची सुरक्षितता आणखी धोक्यात येणार आहे. आॅक्सफर्ड विद्यापीठाच्या कुलगुरूंनी असा इशारा दिला आहे की देशातील प्रमुख महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना युरोपियन आणि जागतिक पातळीवरील विरोधास सामोरे जावे लागेल. युरोपियन युनियन इंग्लंड मधील संशोधन कार्यातल्या अर्थसाहाय्याच्या बाबतीत हात आखडता असे शास्त्रज्ञांना वाटते. बँक आॅफ इंग्लंडच्या गव्हर्नरनीदेखील असा इशारा दिला आहे की युरोपियन युनियन सोडल्यास ब्रिटीश अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसेल आणि पौंडाची किंमत कमालीची घसरेल. पण या सर्व इशाऱ्यांचा ब्रेक्सित चळवळीतील लोकानी उपहास केला आहे. नाटोच्या प्रमुखांचे इशारे ते पूर्वग्रहदूषित मानीत असल्याने धुडकावले गेले आहेत. बँक आॅफ इंग्लंडचा गव्हर्नर कॅनडियन नागरिक असल्याने त्याचे मतदेखील ग्राह्य धरले गेले नाही. प्रत्येक आधुनिक लोकशाही देशाला सतत विश्वबंधुत्व आणि उग्र राष्ट्राभिमान यांच्यातील संघर्षाला सामोरे जावे लागत आहे. जे ब्रिटनमध्ये आहे तेच भारतातसुद्धा. काही राष्ट्रभक्त देशावर प्रेम करतात व जागतिक पातळीवर बंधुत्व ठेवून देशाचे नाव उज्ज्वल करतात. तर काही उग्र राष्ट्रभक्त देशावर प्रेम करतात आणि देशाची संस्कृती शुद्ध ठेवण्यासाठी काहीही करण्याची तयारी ठेवतात. युरोपियन युनियन मधील दोष बाजूला ठेवले तर त्यांनी युरोपला १९व्या आणि २० व्या शतकातील संकुचितपणा, द्वेष आणि विध्वंसक राष्ट्रवादापासून फार पुढे आणून ठेवले. युरोप खंडाने मानवी इतिहासात खूप रक्तरंजित लढाया बघितल्या आहेत. याच खंडात या सर्व लढायांचा इतिहास मागे ठेवून एकेकाळच्या कट्टर शत्रूंशी मैत्री करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. फ्रांस, जर्मनी आणि ब्रिटन यांचे एक सहयोगी राजकीय अस्तित्व निर्माण होऊ शकते असे १७१६ , १८१६ किंवा १९१६ मधील फ्रेंच, जर्मन आणि ब्रिटीश राजकारण्यांना कधी वाटले नसेल. दोन पेक्षा अधिक राष्ट्रांमधील सहकार्याचा हा उत्कृष्ट आणि धाडसी प्रयोग जर थोड्याशा ब्रिटीश नागरिकांच्या असुरिक्षततेच्या भावनेमुळे असफल होत असेल तर याहून दुसरी शोचनीय गोष्ट नसेल. >युरोपियन युनियनमध्येच राहायचे की फुटून बाहेर पडायचे याचा निर्णय करण्यासाठी ब्रिटनमध्ये गेल्या काही दिवसांपासून एक चळवळ सुरु आहे. ‘ब्रेक्सित’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या चळवळीच्या अनुषंगाने तिथे एक जनमत चाचणी घेण्याचा निर्णयही झाला आहे. या चाचणीसाठी येत्या २३ तारखेस मतदान होणार असून एकूणच ब्रेक्सित चळवळ आणि तिची पार्श्वभूमी यांचा ऊहापोह सदर लेखात केला आहे.- रामचन्द्र गुहा(इतिहासकार आणि ज्येष्ठ स्तंभलेखक)
ब्रिटनमधील भूपुत्रवाद आणि परदेशस्थांचा द्वेष
By admin | Published: June 09, 2016 4:56 AM