भाजपाला धरवत नाही आणि त्या पार्टीला सोडताही येत नाही अशी अवस्था जे पक्ष व पुढारी सध्या अनुभवत आहेत त्यात शिवसेना, अकाली दल, पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी व अण्णाद्रमुक या पक्षांसारखेच शत्रुघ्न सिन्हा, यशवंत सिन्हा, नितीशकुमार, अरुण शौरी, जेठमलानी व रामदास आठवले हे पुढारीही आहेत. त्यांना भाजपावाले फारसे मोजत नाहीत आणि त्यांना त्यांचे पूर्वायुष्यातील राजवैभव वा सामाजिक सन्मान विसरता येत नाही. त्यामुळे ते भाजपाजवळ आहेत आणि नाहीतही. जेवढे टोचता येईल तेवढे टोचून बघायचे आणि नंतर गप्प बसायचे अशी त्यांची सध्याची केविलवाणी स्थिती आहे. पक्ष सोडला वा बाजू सोडली तर निष्ठेचा प्रश्न येतो न सोडली तर सध्याची फरफट अनुभवावी लागते. एकेकाळी ही माणसे आणि हे पक्ष केवढ्या जोरात होते. त्यांचे शब्द झेलायला सरकार, प्रशासन व माध्यमे केवढी उत्सुक असत. आता त्यांची रया गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना, पक्षाच्या खासदारांना, पुढाऱ्यांना आणि संघालाच जेथे मोजत नाहीत तेथे या वळचणीला आलेल्या वा ती सोडू न शकणाºया दयनीयांना कितीसे महत्त्व देतील. यशवंत सिन्हा कधी काळी देशाचे अर्थमंत्री होते, परराष्ट्र खातेही त्यांनी सांभाळले होते. प्रशासनाचा अनुभव पाठीशी असल्याने त्यांच्या सल्ल्याला वाजपेयींच्या कारकीर्दीत केवढा मान होता. डॉ. मनमोहनसिंग यांचे सरकार काँग्रेसचे होते तरी तेही यशवंत सिन्हांच्या शब्दाचा आदर करीत. अरुण शौरी हे तर एकेकाळी केवळ पुढारी म्हणूनच नाहीत तर विश्वसनीय पत्रपंडित म्हणून भाजपासकट सर्वत्र गौरविले जात. आता संबित पात्राही त्यांची खिल्ली उडविताना व त्यांचे मोल मोजताना दिसतात. नितीशकुमार कधीकाळी मोदींचे प्रतिस्पर्धी म्हणून गणले जात. आता त्यांची मोदींच्या गोठ्यातील गाय झाली आहे. शत्रुघ्न सिन्हा नट होते. काही काळ ते देशाचे आरोग्यमंत्रीही होते. आता ते मंत्री नाहीत आणि नट म्हणूनही त्यांना फारशी कामे मिळत नाहीत. त्यांना मोदींनी कशाला विचारायचे? रामदास आठवले हे तर विचारात घ्यावे असेही पुढारी नाहीत. त्यांचा पक्ष कुठे, ते कुठे, त्यांचे अनुयायी कुठे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून आता ते किती अंतरावर गेले आहेत? शिवसेना प. महाराष्टÑात प्रबळ आहे. पण तिची ताकद कमी करण्याचे व आम्ही तिला फारशी किंमत देत नाही हे दाखविण्याचेच धोरण महाराष्टÑातील फडणवीस सरकारने आखले आहे. एकेकाळी प्रमोद महाजन व मुंडे सेनेला सांभाळत. आता कुणी दुय्यम दर्जाचे मंत्री तिला सांभाळतात. सेना ‘स्वबळाची’ भाषा अधूनमधून बोलते. पण त्या भाषेचा अर्थ आपले वजन जोखून पाहण्याखेरीज व जमलेच तर त्याचा जास्तीचा मोबदला पदरात पाडून घेण्याखेरीज दुसरा नसतो हे सारेच समजून आहेत. सेनेची अनेक माणसे आमच्यात यायला तयार आहेत असे भाजपाचे पुढारी त्याखेरीज बोलत नाहीत. अकाली दलाचा पंजाबातील भाव ओसरला आहे. त्या दलासोबतच भाजपाचा पराभव काँग्रेसच्या कॅ. अमरिंदरसिंगांनी एकहाती केला आहे. काश्मिरात भाजपाला दुसरा मित्र नाही आणि होता तो मित्रही त्याच्यापासून दुरावला आहे. भाजपाचीही अडचण ही की धर्मवादी पक्षांखेरीज दुसरे त्यांच्यासोबत येत नाहीत आणि स्वत:ला धर्मवादी म्हणवून घेणे बहुतेक पक्षांना व पुढाºयांना परवडणारे नाही. परिणामी आहे त्या स्थितीत आहोत तसे राहायचे. अधूनमधून आपले अस्तित्व सिद्ध करायला मोदींच्या सरकारवर टीका करायची आणि मग गप्प बसायचे. ज्यांना संघटनेत स्थान नाही आणि बाहेर भाव नाही त्या पुढाºयांची आणि पक्षांची स्थिती अशीच होणार. कारण त्यांना आजच्याहून वेगळे पवित्रे घेता येत नाहीत हे त्यांना समजले आहे व लोकही ते समजून आहेत. माणसे मोठी आहेत, चांगलीही आहेत. पण त्यांच्या दुबळेपणावर इलाज तरी कोणता असतो ? अशी माणसे मग दुर्लक्षित व उपेक्षित राहतात आणि आपल्या उपेक्षेवर चिडण्यापलीकडे त्यांच्या हाती दुसरे काही उरतही नाही.
‘बिचारे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 3:25 AM