पुण्यातील हिंजवडी व तळवडे आयटी कंपन्यांतील तरुणींवर हल्ल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे नोकरदार महिला पुण्यात सुरक्षित नाहीत, असा संदेश सर्वत्र जाऊ नये, याची वेळीच पुणे शहर पोलिसांनी खबरदारी घेतली. ‘बडी कॉप’ या अभिनव उपक्रमाचा अवलंब केला. या कामगिरीमुळे पुणे शहर पोलिसांचा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने नुकताच गौरव झाला. या पुरस्काराने पुणे शहर पोलिसांची जबाबदारी आणखी वाढली आहे. केवळ नोकरदारच नव्हे, तर सर्वच महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी ठोस उपाययोजना अवलंबणे अपेक्षित आहे. आयटी पार्क, सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या अंतरा दास, रसिला राजू ओपी या संगणक अभियंता तरुणींचे खून पडले. देशभर खळबळ माजविणाऱ्या या घटनांची पुणे शहर पोलिसांनी गंभीर दखल घेऊन उपाययोजनांचे पाऊल उचलले. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रम राबवून आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या तरुण-तरुणींशी थेट संवाद साधला. कंपनी व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून सुरक्षिततेच्या दृष्टीने दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. एप्रिल २०१७ मध्ये महिला सुरक्षा अभियानांतर्गत ‘बडी कॉप’ ही संकल्पना अंमलात आणली. नोकरदार महिलांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत कशी मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी अथवा कामावरून सुटल्यानंतर रस्त्यात काही संकट ओढवल्यास त्यांनी बडी कॉपच्या माध्यमातून मदत कशी मिळवायची, याची माहिती देऊन साधारण ४० महिलांचा एक अशा पद्धतीने पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने व्हॉट्सअॅप ग्रुप केले आहेत. काही पोलीस ठाण्यांतर्गत हा उपक्रम राबवला. आता त्याची व्याप्ती वाढविण्यात येत आहे. पोलिसांची ही कामगिरी कौतुकास्पद ठरत असताना बाहेरून शहरात येणाऱ्या महिला सुरक्षित नसल्याचा प्रत्यय आणून देणाऱ्या घटनाही शहरात घडल्या आहेत. महिला नोकरदार, गृहिणी असो, की काही दिवसांसाठी शहरात पाहुणी आलेली महिला असो, सर्वच महिलांना सुरक्षितता हवी. महाराष्ट्र पोलीस खात्याने खास महिलांसाठी ‘प्रतिसाद अॅप’ उपलब्ध करून दिले आहे. या अॅपव्यतिरिक्त पुणे शहर पोलिसांनी पुढाकार घेऊन लॉस्ट अॅण्ड फाउण्ड, बीट मार्शल, भाडेकरूंची माहिती, माय कम्प्लेन्ट अशी अॅपही तयार केली आहेत. पोलिसांकडून आता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब होऊ लागला आहे. संपूर्ण शहराच्या सुरक्षिततेसाठी ही यंत्रणा योग्य प्रकारे उपयोगात आणली जावी.
‘ति’च्यासाठी ‘बडी कॉप’
By admin | Published: June 14, 2017 3:42 AM