बिल गेट्स. सध्याच्या घडीला जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वांत श्रीमंत व्यक्ती. फोर्ब्जच्या ३५व्या सूचीनुसार सध्या त्यांची संपत्ती आहे, सुमारे १२४ बिलिअन डॉलर्स! सोपं करून सांगायचं तर त्यांची दर सेकंदाची कमाई आहे १२ हजार ५४ रुपये, दिवसाची कमाई आहे १०२ कोटी रुपये! त्यांनी रोज साडेसहा कोटी रुपये खर्च करायचे ठरवले तरी आत्ता आहेत तेवढे पैसे खर्च करायला त्यांना २१८ वर्षं लागतील! जगातील सर्वांत श्रीमंतांच्या पहिल्या क्रमांकावर आहेत जेफ बेझोस, दुसऱ्या स्थानी आहेत एलन मस्क आणि तिसऱ्या स्थानावर आहेत बर्नार्ड अरनॉल्ट. बिल गेट्स हे जगातले पहिले सर्वांत कमी वयाचे अब्जाधीश. वयाच्या ३१ व्या वर्षी ते अब्जाधीश बनले होते. २००८ पर्यंत त्यांचा हा विक्रम अबाधित होता. त्यानंतर २३ वर्षांचे असतानाच फेसबुकचे मार्क झुकरबर्ग अब्जाधीश बनले आणि बिल यांचा विक्रम त्यांनी मोडला. जगातील सर्वाधिक श्रीमंतांमधील एक, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक इत्यादी कारणांनी बिल गेट्स प्रसिद्ध असले तरी जगात ते सर्वाधिक नावाजले जातात, ते त्यांच्या दानशूरपणामुळे. आपल्या ‘बिल ॲण्ड मेलिण्डा गेट्स फाउंडेशन’तर्फे जगभरातील अनेक देशांना, गरजूंना त्यांनी मदत केली आहे. एवढेच नव्हेतर, जगाच्या अस्तित्वालाच धोका पोहोचवू शकतील असे साथीचे रोग, ग्लोबल वॉर्मिंग अशा अनेक समस्यांवर उत्तरे शोधण्यासाठी संशोधकांना प्राेत्साहित करण्यामध्येही बिल गेट्स आघाडीवर आहेत. आपली संपत्ती अशा तऱ्हेने जगाच्या कल्याणासाठी वापरण्याचा प्रयत्न करणारा एक अत्यंत संवेदनशील विचारी उद्योगपती म्हणूनही त्यांची ख्याती आहे.आपल्या तब्बल २७ वर्षांच्या संसारिक आयुष्यानंतर बिल आणि मेलिंडा गेट्स विभक्त होत असल्याच्या बातमीनं अनेकांना धक्का बसला. ६५ वर्षांचे बिल आणि आणि ५६ वर्षांच्या मेलिंडा यांच्यात काही कुरबुर असेल याची पुसटशीही शंका कधी कोणाला आली नाही. अपवाद फक्त एका घटनेचा. गेल्या वर्षी त्यांनी ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि वॉरेन बफे यांच्या ‘बर्कशायर हाथवे’च्या ‘बोर्ड ऑफ डायरेक्टर’पदाचा राजीनामा दिला. आपल्या कुटुंबाला जास्त वेळ देण्यासाठी आपण राजीनामा देत आहोत, असं कारण त्यांनी त्या वेळी सांगितलं होतं. तरीही अनेकांना याबाबत काही शंका आली नव्हती. ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आणि मॅकेन्जी स्कॉट यांच्या ‘महागड्या’ घटस्फोटाशी अनेकांनी बिल आणि मेलिण्डा गेट्सच्या घटस्फोटाची तुलना केली. पण, गेट्स यांच्या घटस्फोटाचा परिणाम केवळ त्यांच्या कुटुंबावर आणि त्यांच्या संपत्तीवरच होणार नाही, तर अख्ख्या जगावर त्याचा प्रभाव पडणार आहे. त्यात भारताचाही समावेश आहे. ‘बिल ॲण्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशन’तर्फे जगभरात आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक कार्यांसाठी अनेक उपक्रम राबविले जातात. या साऱ्याच क्षेत्रातला पैसा आता आटेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. गेट्स यांनी आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून अशा उपक्रमांवर आतापर्यंत ५० अब्ज डॉलर (साडेतीन लाख कोटी रुपये)पेक्षाही अधिक रक्कम खर्च केली आहे. कोरोना लसीच्या संदर्भात तर त्यांचं मोठं योगदान आहेच; पण जगातल्या शंभरपेक्षाही अधिक गरीब देशांसाठी ‘कोवॅक्स’ नावाचा एक आंतरराष्ट्रीय उपक्रम सुरू केला आहे. त्यात त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. या साऱ्याच उपक्रमांवर गेट्स यांच्या घटस्फोटामुळे विपरीत परिणाम होऊ शकतो. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतील पॉलिटिकल सायन्सचे प्रोफेसर रॉब राइख यांच्या मते या घटस्फोटाचा परिणाम अख्ख्या जगावर आणि तिथे सुरू असलेल्या सेवाभावी कार्यांवर पडू शकतो. याआधी २०१० मध्ये बिल गेट्स आणि वॉरेन बफे यांनी ‘गिव्हिंग प्लेज’ नावाचा उपक्रम सुरू केला होता. त्यासाठी जगभरातील श्रीमंतांना सेवाभावी कार्यासाठी मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्या माध्यमातूनही बराच पैसा गोळा झाला होता. बिल गेट्स यांच्या परिवाराकडे आजही अमेरिकेतील सर्वाधिक जमीन आहे. घटस्फोटानंतर आता कोणाच्या वाट्याला किती पैसा येतो, यातही जगातील नागरिकांना प्रचंड रस आहे. बिल आणि मेलिण्डा गेट्स यांनी आपल्या विभक्त होण्याच्या निर्णयाबद्दल फारसं भाष्य केलं नसलं तरी यामागे संपत्ती वाचविण्याचा हेतू असावा असंही काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अमेरिकेत बायडेन प्रशासनानं श्रीमंतांवर अधिक कर लादण्याचं धोरण आखलं आहे. त्यामुळे विवाहित असलेल्या आणि अति प्रचंड कमाई करणाऱ्यांना चार टक्के ‘मॅरेज पेनल्टी टॅक्स’ देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
कर वाचविण्यासाठी घटस्फोट?‘मॅरेज पेनल्टी टॅक्स’पासून वाचण्यासाठी बिल गेट्स यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला असावा, असंही मानलं जात आहे. या तर्काला अनेकांनी दुजोरा दिला आहे. अमेरिकेतील मनी मॅनेजमेण्ट एक्सपर्ट एलविना लो यांच्या मते घटस्फोट ही अत्यंत वैयक्तिक अशी गोष्ट आहे. घटस्फोटाची अनेक कारणं असू शकतात, पण संपत्ती, कर वाचवणं हे जर बिल गेट्स यांच्या घटस्फोटाचं कारण असेल, तर निव्वळ घटस्फोट घेण्याच्या निर्णयामुळे बिल गेट्स चार बिलियन डॉलर्स (सुमारे तीस हजार कोटी रुपये) वाचवू शकतात!