- नंदकिशोर पाटीलआदरणीय साहेब, साष्टांग नमस्कार.परवा आम्ही बारामतीला येऊन गेलो. सध्याच्या राजकीय हवामानावर आपला अंदाज जाणून घेण्याची इच्छा होती; पण आपण अचानक दिल्लीला गेल्याचे कळले. आम्ही हिरमुसलो नाही. उलट आम्हाला आनंदच झाला. कारण आपण असे अचानक दिल्लीला जाता तेव्हा आमच्यासारख्या अनेकांच्या आशा पल्लवीत होतात. साहेब, मराठी माणसाला दिल्ली मानवत नाही, असे म्हणतात. पण आपणास ती चांगलीच मानवलेली दिसते. दिल्लीतील आपली ‘ऊठबस’ ही आता नॅशनल न्यूज होऊ लागली आहे. आजवर आपण सेव्हन रेसकोर्सवरचे अनेक उंबरठे झिजवले असतील. पण आता दिल्लीतील अनेक रस्ते आपल्या बंगल्यापाशी येऊन थांबतात. कालाय् तस्मे नम:!साहेब, आजवर अनेकांना आपण बोट धरून राजकारणात आणले. काहींनी त्याची जाणीव ठेवली. काहीजण विसरले. पण आपण त्यांना कधीच विसरत नाहीत. हा आपला मोठेपणा. तसा तुमचा गोतावळा खूप मोठा. साहित्य, संगीत, नाट्य, क्रीडा, शिक्षण, कृषी, उद्योग अशा नानाविध क्षेत्रात आपले चाहते आहेत. या सगळ्यांसाठी तुम्ही वेळ कसा काढता?साहेब, भारतीय हवामान खाते आपल्या प्रभावाखाली आहे, असे आमचे ठाम मत बनले आहे. आपल्या धोरणांचा, विचारांचा आणि कृतीचा जसा अंदाज लागत नाही, तसा हवामान खात्याचाही लागत नाही. यंदा पाऊसकाळ चांगला असल्याचे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. त्यानुसार आम्ही पेरणीची तयारी केली. पण चाड्यावर मूठ धरताच ढगांनी दगा दिला आणि पाऊस गायब झाला. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात मान्सून संपल्याची घोषणा झाली तरी जानेवारीपर्यंत पाणी पडत होते! हल्ली आपलाही अंदाज लागेनासा झाला आहे. काल परवापर्यंत तुम्हीच विरोधकांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतलेला. आपले स्वयंघोषित शिष्यमोत्तम मोदींजीवर तमाम जनता नाराज असल्याचे आपण वारंवार सांगितलेत. नोटाबंदीमुळे शेतकरी, व्यापारी आणि उद्योजकांचे कंबरडे मोडले, हिंदुत्ववादी शक्तींमुळे देशात जातीय तणाव वाढू लागला असून लोकशाही धोक्यात आल्याचे आपण सांगत आला आहात. आपल्या पक्षाच्या वर्धापनदिनी बोलताना आपण देशात राजकीय परिवर्तनाची लाट असल्याचे विधान केले होते. ते ऐकून आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते ‘कामाला’ लागले होते. राष्टÑीय पातळीवरदेखील विरोधकांची जमवाजमव होऊ लागली होती. कुमारस्वामींच्या शपथविधीला राज्यपातळीवरील ‘राष्टÑीय’ नेत्यांचा हात उंचावलेला फोटो वर्तमानपत्रात पाहून आमची छाती रुंदावली होती. त्या फोटोत आम्हाला उद्याच्या भविष्याचे सुचिन्ह दिसू लागले होते. ‘अब दिल्ली दूर नही’ असे वाटून आम्ही मनोमन खूप आनंदून गेलो होतो. वातावरण देशभर तापलेले असताना आपण परवा केलेल्या एका विधानाने आम्ही पार बुचकळ्यात पडलो. ‘विरोधकांची एकजूट म्हणजे बिरबलाची खिचडी. कितपत पकेल माहीत नाही’ असे आपण म्हणालात यावर आमचा विश्वास बसत नाही. मीडियाने ‘ध’ चा ‘मा’ केला की, आपणच खडा टाकून पाहिलात?खरं काय ते सांगून टाका बरं.उत्तराच्या प्रतीक्षेत...(तिरकस)
बिरबलाची खिचडी अन्...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 4:36 AM