शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
मेल्यावरही फरफट, झोळीतून नेला देह, रस्ताच नसल्याने चार किमी पायपीट, पेणमधील विदारक चित्र
3
"जागतिक महासत्तांच्या यादीत भारत हवा", व्लादिमीर पुतिन यांचं विधान
4
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
5
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
6
"काँग्रेसकडून जाती-जातीत भांडण लावण्याचा खतरनाक खेळ, म्हणूनच 'एक है तो सेफ है"', नरेंद्र मोदी यांचा घणाघात
7
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
8
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
9
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
10
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
11
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
12
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
13
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
14
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
16
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
17
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
18
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
20
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान

तुम्ही पुन्हा परतून का येत नाही, बापू?

By विजय दर्डा | Published: October 03, 2022 9:02 AM

आजच्या पिढीला तुमच्याविषयी फार काही माहिती नाही हा आमचाच दोष आहे, बापू !... तुमची कितीतरी स्वप्ने आजही अधुरी आहेत...!

-  विजय दर्डा चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

प्रिय बापू, माफी मागतो आपली. काल २ ऑक्टोबरला आपला जन्मदिन होता. आपल्या जन्मदिनाच्या दिवशी काही ना काही लिहिण्याची एक परंपराच होऊन गेली आहे. वेगवेगळ्या चौकात आपल्या पुतळ्यांना हार घालून आपले गुणगान गाण्याची परंपरा आहे  आणि  दुसऱ्याच दिवशी सगळे सगळे विसरून जाण्याचीही! 

बापू, माझ्या मनात दिवसभर चलबिचल होत होती. अंतर्मनात प्रश्नांच्या फैरी झडत होत्या. वाटले, आमच्या प्रिय बापूंना शेवटी कोणी केवळ पुतळ्यामध्ये बंद करून टाकले?  बापू, तुम्ही जगातल्या सर्वात मोठ्या साम्राज्यासमोर इतक्या सहजपणे आणि सरळ सरळ उभे ठाकला होता, की सगळे जग पाहतच राहिले.. आणि इतक्यातच आम्ही तुम्हाला विसरलो? शतकांपासून निद्रिस्त असलेल्या जवळपास अशिक्षित देशाला जागे करणे का सोपे होते बापू ! १९१५ मध्ये आपण भारतात आलात सगळ्या देशाचा दौरा केला. १९१७ मध्ये स्वातंत्र्य आंदोलनात उतरलात तेव्हा देशाचा साक्षरता दर सात टक्केसुद्धा नव्हता. इंग्रज आपल्या मुला-मुलींना गुलाम करून समुद्रापलीकडे पाठवत होते. देशाचे मनोबल तुटलेले होते; परंतु बापू, तुम्ही कमाल केलीत. वरवर अगदी साध्या दिसणाऱ्या आपल्या प्रयत्नांनी देशात चैतन्य संचारेल, यावर कोणी विश्वासही ठेवला नसता. 

चंपारणमधले नीळ उत्पादकांचे आंदोलन असो, की मिठाचा सत्याग्रह; १९३०च्या मार्च-एप्रिलमध्ये आपण २४ दिवसांची  दांडी यात्रा काढलीत. भारताचा निद्रिस्त आत्मा जागा केलात तुम्ही.  इंग्रजांच्या नजरेला नजर भिडवून बोलायला या देशाला शिकवलेत. व्हाइसरॉयने आपल्याला दिल्लीला येऊन भेटण्याचा निरोप दिला तेव्हा तुम्ही कळवलेत, ‘हा देश आमचा आहे. आपल्याला भेटायचे आहे तर सेवाग्राममध्ये येऊन भेटा !’ लंडनमध्ये पाचव्या जॉर्जना भेटायला गेलात तुम्ही. ‘इतक्या कमी कपड्यात आपण का आला आहात?’ असे विचारल्यावर तुम्ही म्हणालात, ‘सगळे कपडे तर राजाने अंगावर घातले आहेत.’

बापू, केवळ भारतालाच नव्हे तर ४०हून अधिक देशांना तुम्हीच स्वातंत्र्याची प्रेरणा दिलीत. तुम्हीच वर्णभेदाविरुद्ध आपणच आवाज उठवलात. भारत दौऱ्यावर आलेल्या बराक ओबामा यांनी संसदेत बोलताना म्हटले होते,  ‘गांधीजी नसते तर मी राष्ट्रपती होऊ शकलो नसतो.’ सामान्य माणसाच्या जीवनाच्या मर्माला तुम्ही स्पर्श केलात, बापू! त्या स्पर्शाची जादू विसरले आमचे सगळे नेते. आज संपूर्ण देश ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ मोहिमेच्या मागे लागला आहे. ही शिकवण तुम्हीच तर दिली होती, बापू !  स्त्री शिक्षण आणि महिलांना समान अधिकारांबद्दल तुम्ही बोलत होतात, तेव्हा याबद्दल समाजात कोणी विचारही करत नव्हते. आज सर्वशिक्षा अभियानाचा बोलबाला आहे; पण बापू त्याचेही श्रेयही तुमचेच ! भारतमातेच्या मुली आज एका मागून एक शिखरे जिंकत आहेत, हे तुम्ही जिथे असाल तिथून पाहत  असालच, बापू ! 

महिलांसाठी एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्याची चर्चा होते; पण तुम्ही तर हे खूप आधीच सांगितले होते, की महिलांना समान राजकीय  अधिकार असले पाहिजेत ! तुमची आठवण आली की अभिमानाने ऊर भरून येतो. या देशात मोहनदास करमचंद गांधी नावाचा एक असा महात्मा झाला, ज्याने मानवतेच्या कल्याणाचा विचार केला. चूल पेटवण्यासाठी फुंकून फुंकून फुप्फुसे जखमी करून घेणाऱ्या असहाय्य महिलांचा त्रास सहन न होऊन तुम्ही वैज्ञानिक मगनभाई यांना सेवाग्रामला बोलावून घेतले होते, आठवते? स्त्रियांना या त्रासापासून सुटका मिळेल, अशा ‘मगन चुली’चा जन्म झाला. उघड्यावर शौचास जाण्याची प्रथा आज संपत आली आहे. त्याचे श्रेयही तुमचेच बापू ! तुम्ही  खड्डा खोदून मानवी मल गाडून टाकण्याची कल्पना मांडली होती, म्हणजे त्या मलाचे खत होईल. डोक्यावर मैला वाहण्यापासून माणसाला मुक्ती मिळाली पाहिजे, हा तुमचा आग्रह होता.

या देशाला तुम्ही खऱ्या अर्थाने समजून घेतले आणि त्याच्या कलाने प्रश्नांची उत्तरे शोधलीत. निसर्गोपचाराचा पुरस्कार केलात. पशुधनापासून मातीचे मोल शिकवलेत. राजीव गांधी यांनी गावातल्या शेवटच्या माणसापर्यंत सत्तेची फळे पोहोचवायची होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या दिशेने वेगाने प्रयत्न करत आहेत; पण ग्रामविकासाच्या या शिकवणीचे जनक तर तुम्हीच आहात, बापू !

तरुणांची ताकद तुम्ही जाणलीत. महिलांची शक्ती ओळखलीत. अस्पृश्यता संपवण्याची सुरुवातही केलीत. दलितांसाठी मंदिराची दारे उघडून दिलीत. जाती, धर्म आणि पंथांमध्ये वाटल्या गेलेल्या देशाला एकत्र आणण्यासाठी मानवता हा सर्वात मोठा धर्म असल्याचे तुम्हीच सांगितलेत. तुम्ही रामराज्याचा पुरस्कार केला तेव्हा तुम्हाला धार्मिक भेद अभिप्रेत नव्हता. सर्वांसाठी समानता हवी होती तुम्हाला. हिंसेच्या प्रदीर्घ कालखंडाने इतिहास रक्तरंजित होत असताना तुम्ही सत्य आणि अहिंसेचा मार्ग प्रशस्त केला, ही किती कमालीची गोष्ट आहे. ‘रघुपति राघव राजाराम, पतित पावन सीताराम. ईश्वराला तेरो नाम, सबको सन्मती दे भगवान...’ हे तुमचे प्रिय भजन होते !  क्षमा, अहिंसा, उपवास, मैत्री, बंधुभाव यावर तुमचा विश्वास ठेवत होता, तुमच्या अंत:करणात भगवान महावीर आणि भगवान बुद्ध यांचा वास होता, बापू! 

विज्ञानाचा लाभ गावांनाही झाला पाहिजे, असे तुम्हाला वाटत होते. म्हणून तर महान वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्याशी तुमची मैत्री झाली. तुमच्याबद्दल बोलताना ते म्हणाले होते, ‘खरोखरच हाडामासाची अशी कोणी व्यक्ती या पृथ्वीतलावर आली होती, यावर विश्वास ठेवणे भविष्यातील पिढ्यांना कठीण जाईल!’

...आज परिस्थिती तशीच तर आहे. आजच्या पिढीला तुमच्याविषयी फार काही माहिती नाही, हा आमचाच दोष आहे, बापू. या भारतभूमीवर आपण पुन्हा एकदा का येत नाही? तुमची कितीतरी स्वप्ने आजही अधुरी आहेत... 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी