भाजप, काँग्रेस दोघांचा बहुमत मिळण्याचा दावा; लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची सांगता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 06:01 AM2019-05-18T06:01:43+5:302019-05-18T07:05:46+5:30

शेवटच्या टप्प्यात १९ मे रोजी ५९ मतदारसंघांत मतदान होणार आहे.

 BJP, Congress claim to get majority; The election campaign for Lok Sabha elections | भाजप, काँग्रेस दोघांचा बहुमत मिळण्याचा दावा; लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची सांगता

भाजप, काँग्रेस दोघांचा बहुमत मिळण्याचा दावा; लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची सांगता

Next

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार शुक्रवारी संपण्याआधी, पंतप्रधान मोदी व राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदांमध्ये आमचेच सरकार केंद्रात येणार असल्याचा दावा केला. शेवटच्या टप्प्यात १९ मे रोजी ५९ मतदारसंघांत मतदान होणार आहे.

आमचेच दुसऱ्यांदा सरकार येणार - मोदी
नवी दिल्ली : देशात सलग दुस-यांदा भाजपचे सरकार येणार असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केला. मतदानाच्या शेवटच्या टप्प्याचा प्रचार संपण्याआधी भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत मोदी म्हणाले की, आम्ही सलग दुस-यांदा २0१९ साली सरकार स्थापन करणार आहोत. या पत्रकार परिषदेत मोदी यांनी नव्हे, तर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनीच सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.
जनतेचा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. मला भरभरून दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी जनतेचे आभार मानू इच्छितो, असे सांगून मोदी म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी १६ मे रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि १७ मे रोजी सारेच (विरोधक) कोसळून गेले. सट्टा बाजारात काँग्रेस जिंकेल, यावर पैजा लावणाºयांना तेव्हा मोठेच नुकसान सहन करावे लागले होते. तोपर्यंत बराच काळ देशात आघाडीचे सरकार येत होते, पण २0१४ साली भाजपचे संपूर्ण बहुमताचे सरकार आले. आजही १७ मे आहे. त्याच दिवसापासून देशात प्रामाणिकपणाची सुरुवात झाली होते. त्यामुळे मला त्याची आठवण होत आहे.
पंतप्रधान मोदींची पहिली पत्रकार परिषद असल्याने सर्वांमध्ये खूप उत्सुकता होती. ते पत्रकारांची प्रश्नांची उत्तरे कशी देणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. पण त्यांनी एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. त्यामुळे त्याचीच सर्वत्र चर्चा सुरू झाली. पक्षाध्यक्षच प्रश्नांची उत्तरे देतील, असे त्यांनी सांगून टाकले. राफेलविषयीच्या प्रश्नाचे उत्तरही शहा यांनीच दिले. मात्र तो प्रश्न विचारला जाताच मोदी यांनी केवळ हसून त्याला प्रतिसाद दिला. या वेळी अमित शहा यांनी मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामगिरीचा आढावा घेत या निवडणुकीत ३०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा दावा केला.



आयपीएल, रमझान, परीक्षा सारे शांतपणे
याआधीच्या दोन लोकसभा निवडणुकांच्या वेळी आयपीएल क्रिकेटचे सामने होऊ शकले नव्हते. जेव्हा मजबुत सरकार असते, तेव्हा आयपीएलचे सामने होतात, रमझानही साजरा होतो, शाळेच्या परीक्षाही वेळेवर पार पडू शकतात आणि सारे काही शांतपणे पार पडते, असा दावा पंतप्रधानांनी केला.


सत्तास्थापनेसाठी सारे विरोधक एकत्र - राहुल
नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार, संकल्पनांच्या काँग्रेसने ठिकºया उडविल्या, असा दावा करतानाच, आमची बाजू सत्याची आहे आणि नेहमी सत्याचाच विजय होतो व केंद्रात सरकार स्थापनेसाठी विरोधी पक्ष एकवटणार आहेत, असा दावा अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी, तसेच पंतप्रधान मोदी व अमित शहा यांच्या पत्रकार परिषदा दिल्लीत एकाच वेळी सुरू झाल्या. पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच पत्रकार परिषदेला आले होते. त्याचा उल्लेख करून राहुल गांधी म्हणाले की, राफेल विमाने खरेदीमध्ये अनिल अंबानी यांना का मदत केली, याचे उत्तर पंतप्रधानांनी पत्रकार परिषदेत द्यावे. या घोटाळ्यासंदर्भात माझ्याशी जाहीर चर्चा करण्याचे आव्हान मोदींनी स्वीकारले नाही. आपण उघडे पडू, अशी भीती त्यांना वाटत असावी. किमान त्यांनी या प्रश्नाचे उत्तर तरी द्यावे.
महात्मा गांधींचे अहिंसेचे विचार मोदी व अमित शहा यांना मान्य नाहीत. पंतप्रधानांचा हिंसेच्या मार्गावर विश्वास आहे, असे सांगून राहुल गांधी म्हणाले की, नरेंद्र मोदी व भाजपकडे अमाप पैसा आहे. त्याआधारे भाजपने निवडणुकांत मार्केटिंग केले. पण आमची बाजू सत्याची आहे व त्याचाच नेहमी विजय होतो. काँग्रेसने विरोधकाची भूमिका उत्तम बजावली. जीएसटी, नोटाबंदी, शेतकºयांचे प्रश्न, राफेल घोटाळा, बेरोजगारी अशा प्रश्नांवर आम्ही रान उठविले. आता कोणाला विजयी करायचे हे जनताच ठरवेल.
निवडणूक निकालानंतर विरोधी पक्षांची रणनीती काय असेल हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. राहुल म्हणाले की, सप, बसप, टीडीपी भाजपला पाठिंबा देणार नाहीत. मोदींच्या मुलाखतींवरूनही राहुल गांधी यांनी टोला लगावला. ते म्हणाले की, पत्रकार मला कठीण प्रश्न विचारतात. पण पंतप्रधानांना तुम्ही कपडे कुठून आणता? आंबे कसे खाता? असे प्रश्न विचारले जातात.
निवडणुकांत निवडणूक आयोगाची भूमिका पक्षपाती होती. पंतप्रधान मोदींची सोय पाहून आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम ठरवला, अशी टीकाही राहुल यांनी केली.

Web Title:  BJP, Congress claim to get majority; The election campaign for Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.