लोकसभेच्या ‘नाजूक’ जागांमुळे भाजपला चिंता!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 09:35 AM2023-01-12T09:35:55+5:302023-01-12T09:40:02+5:30

पंतप्रधान मोदींचा वाढता करिश्मा, भाजपची संघटित निवडणूक युद्धयंत्रणा, मोठे आर्थिक पाठबळ यामुळे प्रादेशिक पक्षांचेही धाबे दणाणले.

BJP is worried about the 'fragile' Lok Sabha seats! | लोकसभेच्या ‘नाजूक’ जागांमुळे भाजपला चिंता!

लोकसभेच्या ‘नाजूक’ जागांमुळे भाजपला चिंता!

Next

- हरीश गुप्ता

भाजप नेते लोकांसमोर लंब्याचवड्या बाता काहीही मारोत, अंतर्गत सर्वेक्षणांचे निष्कर्ष नेतृत्वाला काहीसे चिंतेत टाकत आहेत. पक्षाच्या मुख्यालयात अलीकडेच एक महत्त्वाची बैठक झाली. आतापर्यंत लोकसभेच्या १४४ जागा नाजूक वाटत होत्या; त्या वाढून १७० पर्यंत पोहोचल्याचा मुद्दा या बैठकीत चर्चिला गेला. या बैठकीनंतरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि इतरांनी ज्या राज्यात डागडुजी गरजेची आहे त्यांचे दौरे सुरू केले. विरोधी पक्ष किमान ३५० जागांवर भाजपविरुद्ध एकच उमेदवार देण्याच्या प्रयत्नात पुढे सरकत असल्याचे चित्र आहे.  त्यामुळे नाजूक जागांची संख्या १७० पर्यंत पोहोचली. 

पंतप्रधान मोदींचा वाढता करिश्मा, भाजपची संघटित निवडणूक युद्धयंत्रणा, मोठे आर्थिक पाठबळ यामुळे प्रादेशिक पक्षांचेही धाबे दणाणले. बहुतेक राज्यांत भाजपविरुद्ध एकच उमेदवार देण्याची  कल्पना उचलून धरण्याचा प्रयत्न त्यांनी त्यामुळे चालविला आहे. लोकसभेतले सध्याचे संख्याबळ शाबूत ठेवण्यासाठी दक्षिणेकडील राज्यांव्यतिरिक्त राजस्थान, बिहार, महाराष्ट्रसह अनेक राज्यांत भारतीय जनता पक्ष आपल्या धोरणात फेरबदल करत आहे. सरकारचे संपूर्ण अनुदान मिळालेल्या योजनांचे लाभार्थी कोण कोण आहेत त्याची तपशीलवार यादी करायला पंतप्रधानांनी विविध मंत्रालये आणि भाजपशासित राज्यांना सांगितले आहे. मे २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपचे कार्यकर्ते मग घरोघर जातील.

शिवराजसिंह चौहान यांना दिलासा

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना जीवदान मिळण्याची चिन्हे आहेत. त्यांची गच्छंती होऊ शकते, अशा बातम्या होत्या. चौहान चौथ्यांदा मुख्यमंत्रिपद उपभोगत असल्याने त्यांच्या विरोधात तयार झालेले वातावरण लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठी नवा चेहरा शोधत होते. २०१८च्या विधानसभा निवडणुकीतही भाजप काँग्रेसकडून पराभूत झाला होता; परंतु, ज्योतिरादित्य शिंदे २२ आमदारांसह भाजपमध्ये आल्यामुळे पक्षाकडे पुन्हा सत्ता आली. राज्यात नवा चेहरा देण्याची शक्यता आजमावून पक्षाने शोधही सुरू केला होता; पण तो थंड्या बस्त्यात गेल्यासारखा आहे. कारण, चौहान इतर मागासवर्गीय समाजातून आले आहेत आणि या वर्गातून दुसरा नेता सापडणे कठीण. म्हणून केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना विष्णू शर्मा यांच्या जागी मध्य प्रदेश भाजपचे अध्यक्ष करण्याचे घाटत आहे. शर्मा तोमर यांच्या गोटातले आहेत. तोमर अनुभवी असून राज्यात त्यांना पुष्कळ मान, वजन आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप विजयी झाला तरच ही खांदेपालट होईल.

काँग्रेसलाही बरीच चिंता

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप नेतृत्व कंबर कसत असतानाच काँग्रेस पक्षालाही अनेक राज्यांत पानिपत होण्याची भीती वाटते आहे. 
आपली हिंदू मतपेढी शाबूत ठेवून मुस्लिमांची मते कशी मिळवता येतील, यावर भाजप भर देत आहे; त्याच धर्तीवर काँग्रेस आपली मुस्लीम मतपेढी शाबूत राखून हिंदूंची मते कशी मिळतील हे पाहण्याच्या प्रयत्नात आहे. राहुल  गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे थोडाफार कौतुकाचा वर्षाव झाला असेल; पण दिल्ली अजून खूपच लांब आहे. काँग्रेस पक्षाची हिंदू मतपेढी इंदिरा गांधी यांनी शाबूत ठेवली होती. त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी ती घालवली. उत्तर प्रदेशपासून सुरुवात होऊन राज्यामागून राज्यात पक्ष मुस्लीम मतपेढी घालवून बसल्यावर खरे संकट उभे राहिले. आधी इंडियन मुस्लीम लीग केरळपुरती आणि ‘एआयएमआयएम’ हैदराबादपुरता मर्यादित पक्ष होता; परंतु, पुढे मुस्लिमांच्या हितरक्षणाचे आश्वासन देणारे आणि अनेक पक्ष पुढे आले. आसामात बदरुद्दीन अजमल यांची  आययूडीएफ उभी राहिली आणि असदुद्दीन ओवेसी यांनी हैदराबादच्या बाहेर पंख पसरले.

महाराष्ट्र, बिहार आणि इतर राज्यांत त्यांनी शिरकाव केला. जणू हेही पुरेसे नव्हते म्हणून कर्नाटक सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचा उदय झाला. हा पक्ष मुस्लिमांचे हितरक्षण करण्याचा दावा करतो. म्हणून राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा उद्देश बहुसंख्याक लोक पक्षाकडे वळावेत आणि मुस्लीमही यावेत असा होता. अनेक मंदिरांना त्यांनी यात्रेच्या  काळात भेटी दिल्या. राम मंदिराचे विश्वस्त आणि महंत यांनीही त्यांचे कौतुक केले. राहुल यांचा पुनर्जन्म, ‘तपस्वी’ म्हणून पुढे येणे, आपण रामायण, महाभारत, वेद आणि पुराणे वाचली आहेत असे सांगणे, यामागे आपण हिंदुत्वनिष्ठ आहोत असा संदेश त्यांना द्यायचा आहे. कुरुक्षेत्रात त्यांनी आध्यात्मिक सूर लावला, त्यामुळे अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेतेही सुखावले.

ते लटपटले, धडपडले...  

कन्याकुमारी ते काश्मीर ३,००० किलोमीटरचे अंतर दीडशे  दिवसांत चालू शकतील असे १२० यात्री निवडताना राहुल गांधी यांच्या टीमची चांगलीच दमछाक झाली. पक्षाशी निष्ठा एवढ्याच निकषावर त्यांना निवडले गेले नाही, तर खडतर असा प्रवास त्यांना शारीरिकदृष्ट्या झेपेल हेही पाहिले गेले. बळी तो कान पिळी या परीक्षेत तरीही काहीजण नापास झाले आणि अनेक ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांचे चेहरे केविलवाणे झाले. कारण, ते राहुल गांधी यांच्या गतीने चालू शकले नाहीत. काही तर धडपडले. महाराष्ट्राचे नितीन राऊत, हरियाणा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष उदेभान, किरण चौधरी यांना प्रकृतीमुळे यात्रा सोडावी लागली. अशोक गहलोत, भूपिंदरसिंह हुडा, सिद्धरामय्या, कमलनाथ, जयराम रमेश, बाळासाहेब थोरात यांच्यासारखे नेते थोडा वेळ चालू शकले. त्यांना माघारी जावे लागले; पण राजस्थान आणि हरियाणातला यात्रेचा टप्पा अत्यंत चांगला आखला गेला, याबद्दल राहुल खूपच खुश आहेत.

Web Title: BJP is worried about the 'fragile' Lok Sabha seats!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.