भाजपाला 'मविआ' ची भीती वाटते हे खरे; पण...

By यदू जोशी | Published: March 31, 2023 08:48 AM2023-03-31T08:48:59+5:302023-03-31T08:49:34+5:30

उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती, शरद पवारांचा मजबूत एकखांबी तंबू आणि घट्ट पाळामुळांची काँग्रेस ही महाविकास आघाडीची बलस्थाने! - पण तेवढे पुरेल?

BJP must be worried about what will happen if they face the Lok Sabha and Assembly elections. | भाजपाला 'मविआ' ची भीती वाटते हे खरे; पण...

भाजपाला 'मविआ' ची भीती वाटते हे खरे; पण...

googlenewsNext

महाविकास आघाडीची जाहीर सभा येत्या २ एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे. ही आघाडी एकत्रितपणे स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा व विधानसभा निवडणुकीला सामोरी गेली तर काय अशी धास्ती भाजपला नक्कीच वाटत असणार. या आघाडीची त्सुनामी आली तर आपण टिकणार नाही असा भाजपचा फीडबॅक आहे म्हणतात. भाजपचे काँग्रेससारखे नसते. तहान लागल्यावर ते विहीर खोदत नाहीत. वेगवेगळ्या पद्धतीचे नियोजन हा त्यांच्या नियमित कामाचा भाग असतो. थोडी काही ढिलाई झाली की वरून शहा नहुांचा डंडा पडतो. विधानसभा निवडणुकीला दीड वर्ष बाकी असताना भाजपने खासगी कंपनीला काम देऊन सध्याच्या १०५ आमदारांच्या मतदारसंघात सर्वेक्षण करविले.

महाविकास आघाडी निवडणुकीला एकत्रितपणे सामोरी गेली तर सध्याचे किती आमदार निवडून येऊ शकतील यासाठी मुख्यत्वे हे सर्वेक्षण होते. ज्या मतदारसंघांत भाजपचे आमदार नाहीत तिथेही सर्वेक्षण होणार आहे. महाविकास आघाडीची मूठ एकत्र राहिली तर कोणती सामाजिक समीकरणे कशी जुळवायची आणि शह कसा द्यायचा यावर भाजपची थिंक टैंक सध्या काम करत आहे. भाजपच्या दिमतीला संघाची भक्कम फळी असते. महाविकास आघाडीचा विचार केला तर एकत्रित शिवसेनेकडे पूर्वी शिवसैनिकांची अशी फळी होती. पण आता तीदेखील तेवढी राहिलेली नाही.

भाजपा काय करु शकेल?

छत्रपती संभाजीनगरच्या सभेच्या निमित्ताने आघाडीतील दिग्गज नेते एकत्र येत आहेत. नेत्यांची तोंडे एकमेकांच्या दिशेला वळली आहेत, ती पुढेही तशीच राहिली, तरच भाजपला आव्हान मिळेल. ही वज्रमूठ राहू नये यासाठी भाजप डावपेच आखेल. आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांना भाजपच्या गळाला लावण्याचे काम केले जाईल. ज्यांना भाजपमध्ये जायचे नाही त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा पर्याय आहेच. वैचारिक निष्ठा असलेल्या पक्षातील लोकांना फोडणे जरा कठीण असते. जिथे पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्तिनिष्ठेचे स्तोम आहे असा पक्ष, त्यातील नेत्यांना फोडणे तुलनेने सोपे असते. म्हणूनच काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीच्या नेत्यांहाती कमळ देणे अधिक सोपे आहे असे भाजपला वाटते. राष्ट्रवादीतील एकेका नेत्याला उचलून आणायची आणि काँग्रेसला एकाचवेळी मोठे धक्के द्यायचे अशी भाजपची रणनीती असू शकते. त्यादृष्टीने काँग्रेसमधील काही भक्कम नेत्यांशी भाजपचे नेते संपर्कात आहेत म्हणतात.

पुढच्या वर्षी मोठे ऑपरेशन केले जाऊ शकते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही आमदार भाजपच्या नेत्यांना भेटून "आम्ही पुढच्यावेळी तुमच्याच सोबत राहू, पण आता आम्हाला काही ताकद द्या, मतदारसंघासाठी निधी द्या." असे बार्गेनिंग करत आहेत. ते उद्या भाजपमध्ये जातील वा जाणारही नाहीत, पण पक्षापेक्षा निधी महत्त्वाचा हे आतापासूनच त्यांच्या डोक्यात असणे ही काँग्रेस राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा आहे. अपहरण करून खंडणी मागितली जाते. इथे अपहरणासाठी निधीची खंडणी दिली जाऊ शकते, असे आमदार कच्चे दुवे आहेत, भाजपकडून त्यांना बरोबर गोंजारले जाईल. आज महाविकास आघाडीमध्ये एकीचे स्पिरिट दिसते. ते वरवरचे की आतूनही खूप घट्ट आहे हे लोकसभा निवडणूक जवळ येताच स्पष्ट होईल. एकत्र राहणे ही तिघांचीही अपरिहार्यता; त्यातूनच ठाकरे गटाच्या आमदारांना राहुल गांधींबद्दल विधानसभेत नाराजी व्यक्त करता येत नाही आणि राहुल गांधींना सावरकरांचा मुद्दा सोडून द्यावा लागतो.

राज्यात भाजपचे सरकार असणे, मोदी-शहांची रणनीती, त्याला शिंदे-फडणवीसांची जोड, केंद्र व राज्यांच्या तपास यंत्रणांचा ससेमिरा या सगळ्यांतून सुटून तन-मन-धनाने कोणते नेते भाजपला शेवटपर्यंत हेडऑन घेतील हे महत्त्वाचे असेल. काही लोक स्वतः थकतील किंवा काहींना सर्व प्रयत्न करून थकविले जाईल. तिघांची व्होटबँक एकत्र राहिली तर चमत्कार होऊ शकतो, पण ते वाटते तितके सोपे नाही. तीन पक्षांची मते एकमेकांना ट्रान्सफर होणे महत्त्वाचे आहे. पुण्याच्या कसब्यामध्ये ती झाली म्हणजे राज्यात सगळीकडे होतील असे गणित मांडणे चुकीचे आहे. राज्याचे काय घेऊन बसलात, दिवंगत नेते गिरीश बापट यांच्या सुनेला उद्या भाजपने उमेदवारी दिली की, कालच्या निवडणुकीत होती त्यापेक्षा वेगळीच समीकरणे कसब्यात दिसतील.

काँग्रेस, राष्ट्रवादीची मते एकमेकांकडे ट्रान्सफर होणे कठीण नाही. कारण ते जुने भागीदार आहेत. प्रश्न ठाकरेंना मानणाऱ्या आणि वर्षानुवर्षे भाजपचे बोट धरून चालण्याची सवय असलेल्या मातोश्रीनिष्ठ मतदारांचा आहे. शिवसेनेतील फुटीमुळे या मतदारांचे विभाजन झाले असले तरी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेबद्दल कमालीचा राग असलेल्या मुस्लीम मतदारांमध्ये आश्चर्यकारकरीत्या प्रवेश केल्याचे दिसते. भाजप-मोदी नकोच असे वाटणारे मुस्लीम मतदार मोठ्या संख्येने आहेत. ते काँग्रेस-राष्ट्रवादीचे मतदार! उद्धव ठाकरे याच दोन पक्षांबरोबर असल्याने त्यांना जवळ करण्याकडे मुस्लीम मतदारांचा कल असू शकतो. फुटीमुळे वा मवाळ हिंदुत्वाच्या आरोपामुळे ठाकरेंच्या हातून एक विशिष्ट व्होटबँक गेली तरी त्याची भरपाई अशा पद्धतीने होऊ शकते.

शेर का मुकाबला ड्रॅगन से

भाजपविरोधातील पक्ष देशपातळीवर एका छताखाली नाहीत. ते भाजपच्या पथ्यावर पडते. महाराष्ट्रात मात्र उलटे चित्र आहे. इथले तिन्ही प्रमुख विरोधी पक्ष भाजपच्या विरोधात भक्कमपणे एकवटले आहेत. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असलेली सहानुभूती, शरद पवार यांचा मजबूत एकखांबी तंबू आणि अजूनही पाळेमुळे घट्ट असलेली काँग्रेस ही महाविकास आघाडीची बलस्थाने आहेत. तिन्ही पक्षांच्या ऐक्याने आघाडीला शेर बनविले असले तरी समोर ड्रॅगन उभा आहे. सामना ड्रॅगनशी आहे..

Web Title: BJP must be worried about what will happen if they face the Lok Sabha and Assembly elections.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.