हरीश गुप्तानॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली
भाजपने आता बिहारकडे नजर वळवल्याचे दिसते. सावकाश, एकेक पाऊल पुढे जात हे राज्य काबीज करण्याच्या दिशेने रणनीती आखली जात आहे !
भाजप आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या गच्छंतीचे बेत शिजवत आहे. बिहारमध्ये वरचष्मा मिळवून पक्षाचा मुख्यमंत्री तेथे बसवण्याची घाई त्यांना झाली आहे. उत्तर प्रदेशात लागोपाठ दुसऱ्यांदा बहुमत मिळवून सत्तेवर आल्याने भाजपचे बाहू फुरफुरत आहेत. पक्षधुरिणांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत. उत्तर प्रदेशात ४० वर्षांनंतर पहिल्यांदा लागोपाठ सत्तेवर येण्याचा पराक्रम करण्यासाठी पक्षाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. गोवा, मणिपूर, उत्तराखंडातही पक्षाने सत्ता राखली. पंतप्रधान मोदी यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे.
दिल्लीतील सूत्रांच्या हवाल्यानुसार बिहारच्या बाबतीत भाजप सावकाश, एकेक पाऊल पुढे जाण्याचा विचार करीत आहे. बिहार विधानसभेच्या २४३ आमदारांच्या सभागृहात भाजपकडे ७४ आमदार आहेत. सरकार स्थापन करायचे तर १२२ आमदार लागतील. हे बहुमत कसे मिळवायचे, याच्या योजना आखल्या जात आहेत. त्यासाठी विविध पातळ्यांवर जोरदार काम सुरू आहे.
व्हीआयपी पक्षाचे (विकासशील इन्सान पार्टी) तीन आमदार तो पक्ष सोडून आधी भाजपात आले. मुकेश सहानी यांच्या नेतृत्वाखालचा हा पक्ष बिहारमध्ये एनडीएचा भाग आहे. या पक्षाने चार जागा जिंकल्या; पण त्यांच्या एका आमदाराचे निधन झाले. महत्त्वाकांक्षी साहनी स्वबळावर विधानसभा लढले आणि त्याची किंमत त्यांनी मोजली. उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता पुन्हा आल्यावर तिन्ही आमदार त्वरेने भाजपात आले. सहानी यांना बिहार मंत्रिमंडळाबाहेर काढायला भाजपने नितीश कुमार यांना भाग पाडले. भाजपने आता बिहारमधल्या छोट्या पक्षांकडे मोर्चा वळवला आहे. त्यांच्या आमदारांसाठी गळ टाकण्यात आले आहेत.
बिहारमधला काँग्रेस पक्षाचा १९ आमदारांचा गटही त्यांच्या गळाला लागू शकतो, अशी चर्चा आहे. आपल्याला कोणतेही भवितव्य नाही, अशी काँग्रेस नेत्यांची भावना झाली आहे. जून-जुलैत राज्यसभा निवडणुका होतील, तेव्हा यादवांमधील कुटुंबकलह उफाळून वर येईल, असे म्हणतात. विविध कारणांनी नितीश यांचा पक्ष जनता दल युनायटेड आतून खदखदत असल्याचेही सांगितले जाते.
बिहारमधील सर्व पक्ष कमकुवत कसे होतील, यावर भाजप सतत काम करीत आहे. फुटीला प्रोत्साहन हा त्यातला एक भाग आहे. या सगळ्यात सभापतींची भूमिका महत्त्वाची असून, ते भाजपचे आहेत, हेही येथे अधोरेखित केले पाहिजे!
नितीश यांची उपेक्षानितीश यांच्या कारभाराच्या शैलीविषयी भाजप नाराज आहे. ते उद्धटासारखे वागतात, भेटत नाहीत, स्वत:चेच धकवतात, अशा तक्रारी त्यांच्याबद्दल आहेत. एकेकाळी त्यांचे वर्णन ‘सुशासन बाबू’ असे केले जात असे; पण आता तो काळ गेला. त्यांच्या मद्य धोरणावरून राज्यात रणकंदन माजले आहे. कायदा-सुव्यवस्था स्थिती त्यांना हाताळता येत नाही. न्यायालयाने अनेक ताशेरे मारले, विरोधी निकाल दिले, तेव्हा कुठे मद्य धोरण बदलायला नितीश तयार झाले. भाजपच्या सभापतींशी सभागृहात त्यांचे जंगी खटके उडाले. दोन्ही पक्षांत वितुष्ट यायला ते एक कारण झाले. भाजपमधले नितीश यांचे मित्र म्हणजे सुशील मोदी! त्यांनारा ज्यसभेत पाठविण्यात आले आहे. त्यांच्याहून कडक अशा संजय जयस्वाल यांना बिहार भाजपच्या अध्यक्षपदी बसवण्यात आले आहे. हे जयस्वाल सध्या भाजपातले उगवते तारे आहेत.बिहारमध्ये जायला नेते उतावीळराज्यात काहीतरी घडणार, याची चाहूल लागल्याने केंद्रातले अनेक भाजप नेते पक्षकार्यासाठी बिहारमध्ये जाण्यास उतावीळ आहेत. नितीश यांच्याविरुद्ध बंडाचे बेत आखले जात असल्याने बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर या नेत्यांचा डोळा असेल. रविशंकर प्रसाद यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. त्यानंतर ग्रामीण विकास मंत्री गिरीराज सिंग आणि ऊर्जामंत्री आर. के. सिंग हे दोघे बिहारी मंत्री केंद्रात आहेत. आर. के. सिंग दिल्लीत सुखात आहेत; पण गिरीराज किशोर पक्षाला वेळ देऊ इच्छितात, असे सांगितले जाते. सध्या भाजपची मतपेढी १९.४६ टक्क्यांची आहे, ती २५ पर्यंत नेली पाहिजे, असे ते म्हणतात. त्यांना केवळ भूमिहार नेते म्हणून संबोधले जाते, त्यांना जातीय शिक्का नको आहे. राधा मोहन सिंग आणि राजीव प्रताप रुडी हेही रांगेत आहेत.