गेल्या दोन दिवसांत एकीकडे हनुमान चित्रपटाचा नायक तेजा व दिग्दर्शक प्रशांत वर्मा गृहमंत्री अमित शाह यांना भेटत असताना स्वत:ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हनुमान म्हणविणारे लोकजनशक्ती पक्षाचे तरुण नेते, दिवंगत रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना भेटत होते. पासवान-नड्डा भेटीत बिहारमधील जागावाटपाचा पेच सुटला. चिराग पासवान यांच्या वाट्याला पाच जागा आल्या. महागठबंधन सोडून नुकतेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील झालेले नितीश कुमार यांच्या युनायटेड जनता दलाची एक जागा कमी झाली.
भाजप आता ‘जदयू’पेक्षा एक जागा अधिक लढेल, तर जीतनराम मांझी व उपेंद्र कुशवाह यांच्या वाट्याला एकेक जागा आली आहे. बिहारचा हा इतका तपशील यासाठी की, लोकसभा उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्यानंतरही भारतीय जनता पक्षाने अजून बिहारला हात लावलेला नाही. ८० जागांचा उत्तर प्रदेश, ४८ जागांचा महाराष्ट्र व ४२ जागांचा पश्चिम बंगाल या मोठ्या राज्यांमधील उमेदवारांची घोषणा कमी-अधिक प्रमाणात मार्गी लावताना ४० जागांचा बिहार मात्र मागे आहे. येत्या एक-दोन दिवसांत तिथल्या उमेदवारांचीही घोषणा होईल आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच, ४०० जागांचे लक्ष्य नजरेसमाेर असलेल्या भाजपचा बहुतेक प्रमुख राज्यांमधील उमेदवारीचा विषय मार्गी लागलेला असेल. बिहारप्रमाणेच ज्या-ज्या राज्यांत मित्रपक्षांमध्ये वाद आहेत तिथे भाजप प्रत्येक पाऊल सावधपणे उचलत असल्याचे दिसते. दहा वर्षांच्या सत्तेनंतर निवडणुकीला सामोरे जाताना भाकरी फिरविण्याचा, जुन्यांची तिकिटे कापून नवे चेहरे देण्याचा प्रयत्न सुरू आहे. १९५ उमेदवारांची पहिली आणि ७२ जणांची दुसरी अशा दोन याद्यांचा विचार केला तर ६७ जणांची तिकिटे कापली गेली आहेत. हे प्रमाण २१ टक्के इतके आहे. हा बदल दखलपात्र असला, तरी धक्कादायक वगैरे किंवा भाजपच्या उमेदवार निवडीचे वैशिष्ट्य म्हणावे असा नाही.
तिकिटे नाकारलेल्यांमध्ये प्रामुख्याने वादग्रस्त वक्तव्ये व वर्तणूक करणारे प्रज्ञा ठाकूर, रमेश बिधुडी, परवेश शर्मा यांसारखे लोक आहेत. गुजरात, उत्तर प्रदेश किंवा गेला बाजार मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने पूर्ण भाकरी फिरविली जाते, आमूलाग्र बदल करून, नवे चेहरे देऊन अँटी-इन्कम्बन्सीचा प्रभाव टाळण्याचा प्रयत्न होतो, तसे लोकसभा उमेदवारीबाबत घडताना दिसत नाही. सलग दोनवेळा विधानसभा आणि नंतर महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाकडून पराभूत झालेल्या भाजपने राजधानी दिल्लीत मात्र सहापैकी पाच जागी नवे चेहरे दिले आहेत. बाकी ठिकाणी जे थोडेबहुत बदलाचे प्रयत्न झाले त्याची कारणे वेगळी आहेत. काही ठिकाणी पायउतार झालेल्या किंवा राज्याच्या राजकारणात त्रास असलेल्या माजी मुख्यमंत्र्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.
उदाहरणार्थ, मनोहरलाल खट्टर यांना हरयाणाचे मुख्यमंत्रिपद सोडायला सांगून लोकसभेच्या रिंगणात उतरविले गेले. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई; तसेच त्रिवेंद्रसिंह रावत व तिरथसिंह रावत या उत्तराखंडच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावरही लोकसभेची जबाबदारी टाकण्यात आली. ज्या राज्यांमध्ये विरोधकांचे आव्हान मोठे आहे, तिथे भाजपला जुन्याच चेहऱ्यावर विसंबून राहावे लागत आहे. याच कारणाने काल जाहीर झालेल्या यादीत महाराष्ट्रातील वीसपैकी चौदा जागांवर विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली. उरलेल्या सहा जागी जो बदल दिसतो त्यात प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे, आजारी संजय धोत्रे यांच्याऐवजी त्यांचे पुत्र अनुप हे प्रमुख आहेत. नांदेड, रावेर, धुळे आदी मतदारसंघांमध्ये यावेळी नवे चेहरे असतील अशी चर्चा होती; परंतु ती खरी निघाली नाही. विद्यमान खासदारांनाच उमेदवारी मिळाली.
याउलट जळगाव तसेच मुंबईतील दोन जागांवर मात्र खरा बदल आहे आणि राज्याचे वन; तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपुरातून लोकसभेच्या रिंगणात उतरविण्यात आले. थोडक्यात, भाकरी फिरविण्याचा प्रयत्न झाला खरा; पण तो पूर्ण भाकरीचा नाही, चतकोरच आहे. अन्य पक्षांच्या तुलनेत उमेदवारांची नावे जाहीर करण्यात भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली आहे. काही अपवाद वगळता भाजपचा प्रभाव असलेल्या हिंदीभाषिक पट्ट्यातील बहुतेक राज्यांमधील उमेदवार जाहीर झाले आहेत. इंडिया आघाडीतील घटकपक्षांना उमेदवार निवडताना भाजपच्या उमेदवारांचा विचार करावा लागेल.