पुन्हा एकदा भाजपा-सेनेच्या साठमारीला सुरुवात झाली आहे. सेना आपले विरोधी पक्षपण विसरायला तयार नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत असताना भांडत होते, पण त्याचे कारण निरंकुश सत्तेपेक्षा पैशाचे राजकारण होते. तितके असूनही त्यांनी दगाबाज, शपथ, मर्द मराठे, अफझलखान, कोथळा, गद्दारी, हिंदुत्व, राष्ट्रप्रेम असले ऐतिहासिक भयानक मुद्दे उपस्थित करून इतक्या उच्च(?)पातळीवर आपले साट्यालोट्याचे राजकारण केले नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळी सेनेच्या हयातीत अशक्य असे घडले आणि तब्बल १८ खासदार मोदी लाटेत संसदेत पोचले. ५० किलो गटातल्या मल्लाने २०० किलो उचलले. चोच देतो तो दाणा देतो या न्यायाने भाजपाने केद्रात सेनेला एक मंत्रिपद दिले. लगेच आमच्यामुळे मोदी पंतप्रधान झाले असे हल्ले सुरु झाले. संख्याबळाच्या गरजेवर मित्र-शत्रू ठरतात, हा राजकारणाचा अगदीच प्राथमिक धडा आहे. पण सेना आणि अकॅडमीक वृत्ती यांचा काडीचा संबंध नाही. सेना वाकड्यात शिरली आणि अलगद भाजपाच्या खेळीत अडकली. शत प्रतिशतचे योग कुंडलीत दुर्मिळ असतात हे त्यांना अनुभवाने समजले होते. ते कशाला सेनेच्या नाकदुऱ्या काढतील? बाळासाहेबांनी भाजपाला प्रसंगी चवचाल कमळाबाई संबोधून हिणवले, पण कधीही वाटाघाटीवरची पकड सोडली नाही. सेनेचा सगळा प्रचार भाजपाच्या बदनामीवर आधारलेला. नुसत्या ऐतिहासिक आरोळ्या आणि भावनिक ठोकताळे यातून सेना कधी बाहेरच आली नाही. बाळसाहेबही भावनिक खेळायचे पण पानातल्या मिठाइतके. यांच्या ताटात जागोजागी मीठच वाढलेले. खरे तर सेनेकडे बहुजन समाजाची नस आहे. आजचे सेनेचे नेते एकेकाळच्या काँग्रेस पुढाऱ्यांचे वंशज आहेत. भाजपाला अजूनही बहुजनांनी आपलेसे केलेले नाही. पण सेनेच्या मुत्सद्यांना (?) राजकारणाच्या युद्धात उपयोगिता मूल्य मोठे असते हे पटलेले नाही बहुतेक. भावनेचे आणि उपयोगिता न वाढवणारे राजकारण सातत्याने करत राहिले तर उपद्रव शक्तीचेही अवमूल्यन होते हा धडा सेनेला फडणवीस यांनी शांतपणे गेल्या वर्षभरात शिकवला. सेनेला इतके वर्षे काम करूनही शेतकरी अन्याय हा विषय शेवटपर्यंत यशस्वीपणे धसाला लावता आलेला नाही. बेलगाम बोलण्याने आणि लिहिण्याने चेकाळून जाईल इतका आता शेतकरी भाबडा राहिलेला नाही. दुष्काळावर सरकार काही करीत नाही हा मुद्दा जलयुक्त शिवार योजनेने बऱ्यापैकी विसविशीत करून टाकला आहे. दोन महिन्यात पावसाला सुरुवात होईल व या वर्षी जर बरा पाऊस झाला तर जलयुक्त शिवाराने ग्रामीण राजकारणाचा ढाचाच बदलून जाईल. सेनेचे ग्रामीण राजकारण कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या बेफिकिरीचे व विरोधाचे राजकारण आहे, व्यवस्था घडविणारे नाही. सेनेच्या जनाधाराचे मोजमाप फडणवीस करीत असावेत.‘मेक इन इंडिया’च्या कार्यक्र मात उद्धव ठाकरेंना स्थान मिळू नये हे दिल्लीचेच धोरण होते. मोदींविरुद्ध सेनेने विधानसभेला जो विखारी आणि वैयक्तिक प्रचार केला तो मोदी कधीही विसरणे शक्य नाही. त्यामुळे फडणवीस यांनी योग्य वेळी मध्यस्थी करुन सेनेला सांभाळून घेतल्याचे चित्र उभे करण्यात ते यशस्वी झाले. अणे प्रकरणात अणेंचा बोलविता धनी वेगळा असल्याचे माहित असूनही सेनेने हा मुद्दा राजकीय मुत्सद्दीपणाने हाताळला नाही. त्यांनी अणेंविरुद्ध अगदी खालची पातळी गाठून वैयक्तिक हल्ले केले व त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवीत फडणीसांवर नेम धरले. एक क्षण असाही आला की आता युती तुटणार. पण सेनेच्या सोयीच्या मुद्यावर ती तुटू देतील तर ते फडणवीस कसले? वातावरण छान तापलेले असताना शेवटच्या क्षणी फडणवीस एकदम खेळी खेळले. अणेंचा राजीनामा घेतला. आपली विदर्भाची भूमिका उघड केली नाही. नंतर मात्र नाशिकला ठाम बाजू मांडत विदर्भाला नि:संदिग्ध पाठिंबा जाहीर केला. तिथेच न थांबता त्यांनी नाशिकच्या जाहीर सभेत बोलताना भारत माता की जय म्हणायचे नसेल तर भारतात राहू नका असेही विधान केले. सेनेची सारी गोची मुंबई महानगर पालिकेत आहे. फडणवीसांनी मुंबईतल्या बिल्डर लॉबीवर पकड घेतली आहे. जोडीला शिवस्मारक, आंबेडकर स्मारक, विमानतळ, कोस्टल रोड, धारावी पुनर्विकास, मेट्रो अशा एकापाठोपाठ वेगवान निर्णयांनी त्यांनी मुंबईत स्वत:बद्दल विश्वास कमावला आहे. नागपूरचा असूनही मुंबईकरिता मोठे काम करून दाखवेन असे ते म्हणतात आणि लोकाना ते पटते यात सेनेला धोक्याची घंटा दिसते आहे. अजून एक बाब म्हणजे विनोद तावडे सांस्कृतिक मंत्री असूनही फडणवीसच सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात असतात. त्यांना मुंबईच्या जनतेवरील कलाकारांचे गारुड समजते. पक्षातील समीकरणांचेही त्यांना भान आहे. शक्य तेव्हढे उपद्रव निर्माण करून, सेना शेवटच्या क्षणी मुंबई मनपासाठी वाटाघाटी करेलही, पण चाणाक्ष फडणवीस ते होऊ देणार नाहीत. भाजपाने दुसरा एखादा मोहरा पुढे करून उद्या मुंबईत मराठी मुद्दा उचलला तर आश्चर्य वाटायला नको. भाजपाने सेनेच्या तथाकथित राष्ट्रप्रेमी अजेंड्याला हात घालायचे ठरवून नाशिकला आपल्या ताकदीची समीकरणे मांडायला सुरुवात केली आहे. केवळ तितकेच नव्हे तर सेनेबरोबर निर्णायक लढाई घ्यायचेही ठरविले आहे असे दिसते. गडकरी समारोपाला गेले ते केवळ सेनेच्या विरोधात बेधडक बोलणारा नेता म्हणून नव्हे. तण जाळताना आग सगळीकडूनच पेटवावी लागते. फडणवीसांनी इंधनाची जमवाजमव करायला सुरुवात केली इतकाच नाशिक बैठकीचा अर्थ आहे.- नितीन नाशिककर
सेनेचे तण भस्म करण्याची भाजपाची तयारी?
By admin | Published: April 04, 2016 10:01 PM