नितीन गडकरी यांना महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय केले जाणार असल्याच्या बातम्या येताहेत. मध्यंतरी चंद्रशेखर बावनकुळे यांनीही तसे स्पष्ट संकेत दिले. गेली दहा वर्षे गडकरी दिल्लीत पुरते रुळले आहेत. त्याआधीही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ते दिल्लीतच होते. ते एक नंबरचे खवय्ये आहेत. खवय्या म्हणून दिल्लीत त्यांची मुशाफिरी आजही चाललेली असते. ते शुद्ध शाकाहारी आहेत. पूर्वी ते सगळे अन् भरपूर खायचे, आताही ते सगळे खातात; पण कमी कमी खातात, उम्र और तबियत का तकाजा है. तिकडे दिल्लीत छोले-भटुरे, आलू की चाट खात रस्ते, पुलांच्या विकासाची हजारो कोटींची कामे करत ते सुखी आहेत. - पण, आता त्यांना मिसळ खायला महाराष्ट्रात बोलवले जात आहे. त्यांना तेही जमले आणि हेही जमेल, त्यांची क्षमता अपार आहे.
२०१४ मध्ये ते विधानसभा निवडणुकीत जेवढे सक्रिय होते तेवढे सक्रिय राहायला त्यांना पक्षाने आणि विशेषतः रा.स्व. संघाने सांगितले आहे. महाराष्ट्राची जबाबदारी असलेले दिल्लीतील एक नेते पाच दिवसांपूर्वी दोन तास गडकरींना नागपुरात भेटले आणि ‘तुम्ही सक्रिय व्हा’ अशी विनंती करून आले. परवा गडकरींशी बोललो. ते म्हणाले, ‘मी पक्षादेश पाळणारा कार्यकर्ता आहे, पक्ष सांगेल तसे करेन. त्यासाठी मी कोणतीही अट वगैरे घातलेली नाही’. त्यांच्या या विधानानंतर प्रश्न पडला की ते तर आधीही प्रचार करत होतेच, आताही ते करणारच होते; पण ‘ते पूर्ण ताकदीने प्रचारात उतरणार’ हे बावनकुळे यांना जाहीर का करावे लागले?
तर त्याचीही कारणे असू शकतात. गडकरींना साइडलाइन केले जात असल्याची भावना भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यासाठी कोण कारणीभूत आहे, याची चर्चा पक्षात नेहमीच होत असते. ती भावना राहू नये हे एक कारण असावे. ‘गडकरी आले तर खूप फरक पडेल’, असे पक्षातले लोक बोलतात. या भावनेला हात घालून त्यांना प्रचारात आणले जात असावे. राज्यातील भाजपचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे आणि निवडणुकीतही ते त्यांच्याकडेच राहील. आरक्षणासह विविध मुद्द्यांवर फडणवीस यांना लक्ष्य केले जात असताना त्यांच्यासोबत गडकरींनाही आणले तर टीकेची धार बोथट होऊन पक्षाला त्याचा फायदा होईल, असेही गणित दिसते.
शरद पवार यांच्यासह सर्वच पक्षांच्या नेत्यांशी गडकरींचे घनिष्ठ संबंध असल्याने त्यांच्यावर फडणवीसांप्रमाणे टोकाची टीका केली जाणार नाही. भाजपला घेरण्याच्या विरोधकांच्या प्रयत्नांना गडकरींच्या असण्याने मर्यादा येतील, असेही भाजप, संघाला वाटत असावे. निवडणुकीच्या काळात पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी, जुने कार्यकर्ते यांचे काही म्हणणे असेल तर ते मांडण्यासाठी फडणवीसांबरोबरच गडकरींचा पर्यायही त्यांच्यासाठी खुला असेल. गडकरी व फडणवीस यांच्यातील संबंध ‘ऑलवेल’ नाहीत असे महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या तोंडावर अधिकाधिक भासविले जाईल, ते त्यांना करता येऊ नये म्हणूनही या दोन नेत्यांना ‘साथ-साथ’ राहण्यास सांगितले असावे.
भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाने महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषत: सत्ताप्राप्तीसाठी जे आडवेतिडवे; मनमानी निर्णय घेतले त्याचा फटका भाजप आणि फडणवीस दोघांनाही बसतो आहे. शिंदेंना सोबत घेतले ते ठीकच होते; पण अजित पवारांना घेण्याची काय गरज होती, असा रोष कार्यकर्त्यांच्या मनात कुठेना कुठे आहे. या मनमानीला गडकरी त्यांच्या शैलीने अधूनमधून चिमटे काढत असतात. ते कार्यकर्त्यांना भावते. ‘गडकरीच काय ते एकटे बोलतात’ असे त्यांना वाटते. त्यामुळे गडकरींचे नुकसान होते हा भाग वेगळा. एकांगी आणि एककल्ली राजकारण चालणार नाही हा संदेश लोकसभा निवडणूक निकालाने दिलेला आहेच. या पार्श्वभूमीवर टोकाची भूमिका न घेणारा आणि घाणेरड्या राजकारणापेक्षा विकासाची भाषा बोलणारा गडकरींसारखा नेता प्रचारात असला तर चांगलेच अशी भावनादेखील त्यांना प्रचारात पूर्ण ताकदीने उतरविण्यामागे असावी.
गडकरी महाराष्ट्रात परत येण्याची ही सुरुवात आहे असे काही जणांना वाटते; पण ती शक्यता आजतरी दिसत नाही. राष्ट्रीय स्तरावरील राजकारणात त्यांची मांड पक्की झाली आहे. ते दिल्लीतील महाराष्ट्राचे ब्रॅण्ड ॲॅम्बेसिडर आहेत. त्यांच्याशिवाय दिल्लीत महाराष्ट्राला आज कोण वाली आहे? केंद्रात त्यांना अडथळे जरूर आहेत; पण त्यांनी स्वत:चे कर्तृत्व त्यापलीकडे नेऊन ठेवले आहे. इतर नेतेही पक्षात आहेत ही जाणीव लोकसभा निवडणुकीच्या निकालाने ज्यांना व्हायला हवी होती त्यांना झालीच आहे. काळ, नियती कोणासाठी कधी, कुठली संधी निर्माण करेल हे कोणी पाहिले? ते तर गडकरी आहेत ! उद्याचे कोणी बघितले? शिवाय, स्वत: गडकरी यांना महाराष्ट्रात परतण्यामध्ये रस राहिलेला नाही. २०१४ मध्ये भाजप-शिवसेनेची सत्ता आली तेव्हा ‘त्यांना मुख्यमंत्री करा’ असा धोशा काही आमदारांनी लावला होता; पण तसे काही घडले नाही. २०२४ नंतरही तसे घडेल असे वाटत नाही.
जाता जाता शालेय शिक्षण आणि मराठी भाषा अशी दोन खाती दीपक केसरकर यांच्याकडे आहेत. केसरकर स्वत: आपल्या नावाचा ‘दि’ असा ऱ्हस्व का लिहितात? मंत्रालयातील त्यांच्या कक्षाबाहेरील पाटीवरही ‘दिपक’ लिहिले आहे. व्याकरणदृष्ट्या ते चुकीचे आहे. एकतर सवयीने तसे लिहीत असतील किंवा आणखी काही कारण असू शकते; पण मराठी भाषा विभागाच्या मंत्र्याने आपल्याच नावात ऱ्हस्व-दीर्घची चूक करावी हे जरा खटकतेच.
yadu.joshi@lokmat.com