राहुल गांधींच्या वाढत्या लोकप्रियतेने भाजपा चिंतित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:12 AM2017-10-27T00:12:56+5:302017-10-27T00:13:06+5:30
राहुल गांधी यांचा मेकओव्हर ज्या पद्धतीने झाला आहे आणि सार्वजनिक सभांमधून ते ज्या त-हेने लोकांशी संवाद साधत आहेत, त्या त्यांच्या संवाद कौशल्यामुळे त्यांच्या पक्षातील लोक तसेच त्यांचे टीकाकार चकित झाले आहेत.
- हरीश गुप्ता
राहुल गांधी यांचा मेकओव्हर ज्या पद्धतीने झाला आहे आणि सार्वजनिक सभांमधून ते ज्या त-हेने लोकांशी संवाद साधत आहेत, त्या त्यांच्या संवाद कौशल्यामुळे त्यांच्या पक्षातील लोक तसेच त्यांचे टीकाकार चकित झाले आहेत. नुकतीच भाजपाच्या कोअर ग्रुपची बैठक झाली. या बैठकीत स्वत: मोदी, अमित शहा, अरुण जेटली, राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी उपस्थित होते. त्यांनी विद्यमान राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. त्यात ‘पप्पू बोलना सिख गया है’ अशात-हेने राहुल गांधींवर खुसखुशीत शब्दात मल्लिनाथी करण्यात आली. पण त्यापेक्षा आणखी गंभीर विषयावर बैठकीत चर्चा झाली तो विषय होता सोशल मीडियावर राहुल गांधींना मिळणा-या प्रतिसादाचा, त्यावर प्रतिक्रिया देताना भाजपाच्या काही मंत्र्यांनी रशिया, कझाकीस्तान आणि इंडोनेशियातील बनावट अकाऊंटसचा उल्लेख करून त्याचा राहुल गांधींशी संबंध जोडला. राहुल गांधी हे लोकसंपर्क करू लागले आहेत म्हणून काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अलीकडे अमेठीहून परत येताना खासगी वाहनातून जाण्याऐवजी त्यांनी फेरीबोटीतून लोकांसोबत जाणे पसंत केले. इतकेच नव्हे तर प्रवाशांसोबत सेल्फी काढून घेण्याचीही परवानगी देऊन त्यांनी लोकांची मने जिंकून घेतली!
संकटमोचक स्वत: संकटात
दिनेश्वर शर्मा हे ट्रबलशूटर (संकटमोचक) म्हणून काश्मिरात दाखल झाले आहेत. पण तेथे तेच संकटात सापडले आहेत. कारण हुरियत कॉन्फरन्सचे काही नेते वगळता बरेचसे नेते काळा पैसा पांढरा करण्याच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. राष्टÑीय तपास संस्थेने हुरियतचे चेअरमन सय्यद अली शाह गिलानी यांच्या जावयाला अटक केली आहे. शब्बीर शाह, जहूर वटाली, फारुख अहमद दार, अब्दुल रशीद, यासीन मलिक, मीरवैज उमेद फारुख आणि त्यांच्या साथीदारांना पोलिसी हिसक्याला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे सध्या तरी राजकीय पक्षांशिवाय अन्य कुणासोबत चर्चा करणे दिनेश्वर शर्मा यांना शक्य झालेले नाही. काश्मिरातील १५ कट्टरपंथीयांच्या गटाचे नेतृत्व करणारी हुरियत चर्चा करण्यास उत्सुक नाही. त्यामुळे राष्टÑीय तपास संस्थेने चार्जशीट दाखल करण्याचे काम थांबवावे, असे शर्मा यांना वाटते. पण तसे केल्यास आपल्यावर टीका होईल या भीतीने ती संस्था आरोप दाखल करण्याचे काम थांबवायला तयार नाही. प्रत्यक्ष काय घडते, ते बघायचे!
सीबीआयमध्ये जुगलबंदी!
राकेश अस्थाना यांना विशेष संचालक म्हणून बढती मिळाल्यामुळे सीबीआयमध्ये असंतोष उफाळला आहे. अस्थाना हे सुरत शहराचे पोलीस आयुक्त असताना स्टर्र्लिंग बायोटेकच्या २०११ मध्ये सापडलेल्या डायºयांमध्ये त्यांचे नाव झळकले होते. या डायºया बरीच वर्षे दाबून ठेवण्यात आल्या होत्या. पण आयकर विभागाला त्याचा सुगावा लागल्याने अंमलबजावणी संचालनालय कामाला लागली. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्याकडे हे प्रकरण पाठविण्यात आले. अस्थाना यांचा पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क असल्याने, ते वर्मा यांच्याशी बोलत नव्हते. पण वर्मा यांची नेमणूकही मोदींनीच केली होती. अस्थाना यांच्या विरुद्धचा अहवाल हातात आल्यावर वर्मा यांनी अस्थाना यांच्या बढतीला विरोध केला तरीही सरकारने ही बढती केलीच. आता आपल्याविरुद्धचा अहवाल वर्मा यांनी मीडियाला दिला, असा आरोप अस्थाना करीत आहेत. पण वर्मा आणि अस्थाना या दोघांच्या नेमणुका मोदींनी केलेल्या असल्यामुळे सर्वांचे हात बांधले गेले आहेत, एवढे मात्र खरे!
या गडकरींना कोण थांबविणार?
गडकरी हे दिल्लीतील मीडियाला खाद्य पुरवीत असतात. त्यांनी दिवाळीपूर्व पार्टीसाठी मीडियाला आपल्या बंगल्यावर निमंत्रित केल्यामुळे मीडिया खुशीत होती. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना गडकरींनी उत्तरे देत कुणालाच निराश केले नाही. ते रस्ता बांधणीविषयी कमी आणि हवाई वाहतुकीविषयी जास्त बोलत होते. कारण एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीसाठी नेमलेल्या समितीत त्यांचाही समावेश आहे. गडकरी यांची त्याविषयी स्वत:ची मते आहेत. हवाई वाहतुकीत उदारीकरण आणण्याबाबत निर्णय न घेतल्याने विजय मल्ल्या यांना त्याची किंमत चुकवावी लागली, असे गडकरींना वाटते. रस्ता बांधणीचे काम मार्गाला लागले असल्याने गडकरींनी आपले लक्ष जलसिंचनाकडे वळवले आहे. १.८० कोटी हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरण्याची त्यांची योजना आहे. आंतरराज्यीय पाणीतंटे निकालात काढण्याचाही त्यांचा विचार आहे. महाराष्टÑ व गुजरातमधील पाण्याचा वाद त्यांनी मिटवला आहे. उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश यांच्यातील जलविवाद मिटविण्यासाठी त्यांनी स्वत: अनेक बैठकी घेतल्या. पण पंजाब व हरियाणा यांच्यातील जलविवाद आपल्याला मिटवता आला नसल्याने आपण पंतप्रधानांना त्यात लक्ष घालायला सांगितले आहे, असेही गडकरी म्हणाले.
(‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर)