कोलकाता - हिंसाचारग्रस्त आसनसोल- राणीगंज गावात भाजपच्या चार सदस्यीय शिष्टमंडळाने प्रतिबंधात्मक आदेश धुडकावून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रविवारी कडक सुरक्षा व्यवस्थेत भेट दिली. राम नवमीच्या मिरवणुकांवरून आसनसोल गावात हिंसाचार झाला होता.आसनसोल-राणीगंज (जिल्हा पश्चिम बुर्दवान) पट्ट्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारला अपयश आल्याचा ठपका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाझ हुसेन यांनी ठेवला. ते म्हणाले, आसनसोलमधील रामकृष्णपूर आणि धडकाच्या मदत शिबिरांना आम्ही भेट दिली आणि जे काही घडले ते चुकीचे होते, असे आम्हाला आढळले. राज्य सरकारचे हे अपयश आहे. लोकांनी शांतता पाळावी.’भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी तयार केलेले हे शिष्टमंडळ अहवाल देणार आहे. यात हुसेन यांच्याशिवाय भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्यसभेचे सदस्य ओम प्रकाश माथूर व पलामुचे खासदार व झारखंडचे माजी पोलिस महासंचालक विष्णू दयाळ राम व राज्यसभा सदस्य रुपा गांगुली होत्या. (वृत्तसंस्था)
आसनसोलला गेले भाजपाचे शिष्टमंडळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 1:07 AM