हेमंत देसाई( जेष्ठ पत्रकार) - काँग्रेस व राष्ट्रवादीने ११ लक्ष कोटी रुपयांचे घोटाळे केले असून, त्यांना कायमचे गाडा, असे भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांचे आवाहन होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बारामतीत जाऊन पवारशाहीवर शरसंधान साधले होते. विधानसभा निवडणुकीत भाजपा प्रथम स्थानावर येईल, हा अंदाज होताच. महायुतीत असतानाही शहा यांनी पूर्ण बहुमताने भाजपाला निवडून देण्याची हाक दिली होती. मात्र, शतप्रतिशत भाजपा हे महाराष्ट्राला मान्य नसल्याचे दिसते. याचे कारण एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील सत्यशोधक चळवळ व नंतरची ब्राह्मणेतर चळवळ यामुळे महाराष्ट्रात मध्यम व कनिष्ठ जाती सत्तेच्या परिघात उतरू लागल्या होत्या. पुढे हीच गोष्ट लोकशाही चौकटीत बसवून आपली सामाजिक मुळे पक्की करण्याचे कसब काँग्रेसने बेरजेच्या राजकारणातून दाखवले. त्यात सहकारी संस्थांच्या माध्यमातून काँग्रेस ग्रामीण महाराष्ट्रात पोहोचली, तर समाजवादी पक्ष व जनसंघ शहरांतच होते. राज्यातील जनाधार असलेल्या नेत्यांना लगाम घालून आपल्या प्याद्यांना पुढं आणायचे, या इंदिराजींच्या तंत्रामुळे १९७0च्या दशकाच्या उत्तराधार्पासून काँग्रेस विस्कटू लागली. १९९९ मध्ये राष्ट्रवादीचा जन्म झाला, तेव्हा दलित, आदिवासी, मुसलमान, कनिष्ठ जाती काँग्रेसकडे व मुख्यत: मराठा आणि काही प्रमाणात ओबीसी राष्ट्रवादीकडे, असे चित्र तयार झाले. आघाडी सरकारचा कारभार दिवाळखोरीचा असूनही, विरोधी पक्षांच्या नाकर्तेपणामुळे तो चालू राहिला. युती भंगली, त्यामुळे भाजपाला आपण शिवसेनेपेक्षा श्रेष्ठ असल्याचे दाखवून देता आले. मात्र तरीही, भाजपाला महाराष्ट्रातला काँग्रेसी पाया उखडून टाकता आलेला नाही, हे सर्वात महत्त्वाचे. मोदी यांचा करिश्मा व भाजपाचे आर्य चाणक्य अमित शहा यांची व्यूहरचना नसती, तर भाजपाच्या प्रदेश नेत्यांना ही निवडणूक जिंकता आली नसती. याचे कारण उत्तमराव पाटील व गोपीनाथ मुंडेंसारखे नेते आज पक्षात नाहीत. माध्यमांच्या बळावर सध्या जिल्हा नेते प्रादेशिक नेते म्हणून गाजत आहेत. शिवाय ज्या पक्षाचे सरकार केंद्रात असते, त्याचेच सरकार राज्यात असावे, या जनभावनेचा भाजपाला लाभ झाला.उद्धव ठाकरेंच्या मागे आज बाळासाहेब ठाकरे नाहीत. पक्ष प्रादेशिक असल्यामुळे त्यांच्यामागे कोणी राष्ट्रीय करिश्मा असलेले नेते नाहीत. तरीसुद्धा त्यांनी हिमतीने यश मिळवले. मात्र, सेनेने जो गुजराती विरुद्ध मराठीचा संघर्ष उभा केला, तो सेनेच्या मतांचे ध्रुवीकरण करण्यास उपयुक्त ठरला असला, तरी अव्वल स्थान मिळवण्याइतका तो मुद्दा महत्त्वाचा नव्हता. शिवाय, तो राज्यव्यापी मुद्दा ठरू शकत नव्हता. राज्याचे ५0 टक्के नागरीकरण झाले आहे. त्यामुळे गुंतवणूक, कारखाने, रोजगार, एलबीटी, वाहतूक, पर्यटन, स्त्रीसुरक्षा हे प्रश्न भाजपाने रास्तपणे अजेंड्यावर घेतले. त्यामुळे शहरी मध्यमवर्ग, स्त्रिया, तरुणांनी भाजपाला डोक्यावर घेतले. ह्यमी अखंड आशावादीह्ण असे म्हणत राष्ट्रवादीने प्रगतीचे ढोल पिटले, परंतु लोकांनी त्यावर विश्वास ठेवला नाही. काँग्रेसने स्वच्छ व पारदर्शक प्रशासनाची जाहिरात करताना, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना प्रकाशझोतात ठेवले. पण मुख्यमंत्री स्वच्छ, मात्र त्यांच्या शेजारचे, म्हणजे राष्ट्रवादीचे घर अस्वच्छ हे जनतेला दिसत होते. सर्व माजी मुख्यमंत्री बाबांच्या विरोधात. लोकशाही आघाडीत परस्परविरोध इतका होता की, खरे तर वेगळ्या विरोधी पक्षाची गरजच नव्हती! एवढे असूनही, ग्रामीण महाराष्ट्राने लोकसभा निवडणुकांच्या इतके विधानसभेत आघाडीला लाथाडलेले नाही. राष्ट्रवादीने भ्रष्टाचार केला नसता व बाबांनी स्वच्छतेबरोबरच सर्वांना बरोबर घेऊन धडाक्यात निर्णय घेतले असते, तर?... या निवडणुकीत उद्धवला तुच्छ लेखणारे नारायण राणेंचे व राज ठाकरे यांच्या मनसेचे पानिपत झाले. ब्लू प्रिंटवाल्यांचा चेहरा पांढरा फटफटीत झाला. स्वत:ची रेघ मोठी करण्याचा प्रयत्न करण्याचा मार्ग माहीत नसलेल्यांना लोकांनी ताळ्यावर आणले. उलट एमआयएमला पहिल्या फटक्यात जे यश मिळाले, ते काँग्रेसने मुस्लिमांची निराशा केल्यामुळे.निकाल लागताच पवारांनी भाजपाला पाठिंबा देऊन टाकला. देशाला हिंदू धर्मांधतेपासून धोका आहे, प्रज्ञासिंह ठाकूर प्रभृतींना वाढवण्याच्या शक्तीपासून सावध राहा, असे पवार म्हणत होते. आता ते म्हणतात, ह्यराज्याला स्थिर सरकार हवे आहेह्ण. पण भाजपाचे सरकार स्थिर झाल्यास धर्मांधतेची विषवल्ली वाढणार नाही का?
भाजपाचे ह्यबँग बँगह्ण!
By admin | Published: October 20, 2014 1:02 AM