- राजू नायककोविड कळात गोव्यातील परिस्थिती व्यवस्थित हाताळली नाही, उलट कोविड बाधितांचा उद्रेक होऊ दिला व त्यात अनेक बळी गेले याबद्दल प्रमोद सावंत सरकारला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागतेय.गेल्या चार महिन्यांतील या सरकारचे अनेक निर्णय वादग्रस्त ठरले. त्याची झळ जनतेला बसली. बुधवारी या सरकारने दुसरा लॉकडाऊन जाहीर केला तर तोही लोकांना धक्का होता, कारण कालपर्यंत आणखी लॉकडाऊन नाही, असेच मुख्यमंत्री म्हणत होते. मांगोरहिल जेथे उद्रेक घडला त्या वास्को शहरातील नागरिक लॉकडाऊन करा, असे सांगत असूनही मुख्यमंत्री त्यांचे ऐकत नव्हते आणि काल अचानक मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. परंतु तो करताना आचारसंहिता जाहीर केलेली नाही; परिणामी गुरुवारी (16 जुलै) सकाळपासून लोकांनी जीवनावश्यक वस्तू मिळविण्यासाठी बाजारात एकच गर्दी केली. सामाजिक अंतराचा फज्जा उडाला. सरकारी विश्वासार्हतेलाही लागलेला हा डाग आहे.अचानक तीन दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’ व शुक्रवारपासून तीन दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यामागे राजकीय निर्णय आहे असे म्हणतात. मागच्या तीन महिन्यांत सरकारची विश्वासार्हता तळाला पोहोचली आहे. केवळ दोन प्रशासकीय अधिकारी निर्णय घेतात, असा जनतेचा समज झाला आहे. या अधिका-यांना ग्राऊंड रिअॅलिटी माहिती नाही. त्यामुळे जेथे कण्टेनमेण्ट झोन जाहीर केले तेथे जनतेचे हाल झाले आहेत. लोक सतत आंदोलन करू लागले आहेत. कारण जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत झालेला नाही.दुसरे दोन मंत्री वगळता इतर मंत्रिमंडळ सदस्य यांचे काहीच अस्तित्व नाही. जेथे मलिदा आहे, तेथेच मंत्री व आमदार काम करतात असा आरोप होतो. खनिजाच्या खाणी चालू आहे, सरकारच्या मर्जीतील फार्मा उद्योग व जमीन रूपांतरे चालू आहेत, अशी टीका होते. लोह खनिजाला सरकारने मुक्तद्वार दिले आहे, त्यामुळे पावसाळ्यातही पहिल्यांदा हा उद्योग चालू राहिला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत खाण व्यवसायात असल्याने त्यांना काही उद्योगांना उपकृत करायचे आहे, अशी टीका झाली आहे. पर्यटनालाही त्यांनी या काळात मान्यता दिल्याबद्दल लोक नाखुश आहेत.या काळात भाजपा सरकारप्रमाणेच पक्षाला उतरती कळा लागली आहे. आमदारांप्रमाणेच बहुतांश कार्यकर्ते नाराज आहेत. या पक्षाची येत्या निवडणुकीत शाश्वती नाही, असे लोक समाजमाध्यमांमध्ये बोलू लागले आहेत. त्यामुळे पक्षाची कोअर कमिटी अस्वस्थ बनली असून मुख्यमंत्र्यांवर संघटनेचा दबाव वाढू लागला आहे. नजीकच्या काळात नेतृत्वबदलाची मागणी होऊ शकते. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे पर्यायी नेते म्हणून नाव घेतले जाते.भाजपाला जनाधार नसतानाही त्या पक्षाने त्यांचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकरांच्या नेतृत्वाखाली २०१७ साली सरकार घडविले होते. पर्रीकरांच्या शेवटच्या काळात ते सत्तेला चिकटून राहिल्याने जनतेत रागाची भावना निर्माण होत गेली. परंतु त्यानंतर प्रमोद सावंत यांना नेतेपद मिळाले आणि त्यांनी ज्या पद्धतीने स्थैर्य प्राप्त करण्यासाठी कॉँग्रेस पक्षाला भगदाड पाडले व त्यानंतर कोविडची परिस्थिती हाताळली यामुळे लोक नाराज आहेत. सरकारने गेल्या दोन वर्षात पाच हजार कोटींचे कर्ज घेतले आहे. गोव्यावर अजूनपर्यंत २० हजार ५०० कोटींच कर्ज साचले आहे. सावंत यांना अर्थव्यवस्थेला दिशा देण्यातही अपयश आल्याने व ते केवळ खाण उद्योगांच्या दबावात असल्याने खाणींच्या लिजांचा लिलाव होऊ देत नसल्याची टीका होते.
गोव्यात भाजपाचा ग्राफ ढासळला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 7:57 PM