- यदु जोशी(सहयोगी संपादक, लोकमत)
भाजपने राज ठाकरेंना साद घातलेली आहेच. महादेव जानकर रागावून गेले होते शरद पवारांकडे, त्यांना परत आणले आणि एक जागा देतो म्हणून सांगितले. ॲड. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत जाऊ नयेत असे भाजपला मनोमन नक्कीच वाटत असणार.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींची लाट होती; पण अकोला, नांदेड, हिंगोली, परभणी, सांगली, सोलापूर, बुलढाणा, यवतमाळ-वाशिम, जालना, नाशिक, धाराशिव, लातूर, हिंगोलीत वंचित बहुजन आघाडी-एमआयएम युतीने लक्षणीय मते घेतली होती. काही ठिकाणी त्यामुळे थेट निकाल बदलले, काही ठिकाणी लाखाहून अधिक मते या युतीने घेतली, ज्याचा थेट फायदा भाजप-शिवसेना युतीला झाला होता. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा सरळ लढती होताना दिसत असल्याने सावध झालेल्या भाजपने स्वत: मित्र जोडणे आणि मविआचे मित्र तोडणे सुरू केले आहे.
एमआयएम, वंचित, बसपा हे फॅक्टर पूर्वीसारखे मतखाऊ राहतील की नाही ही शंका त्यांना आधीच आली असणार. त्यातच उद्धव ठाकरेंकडे मुस्लीम मतदारांचा दिसत असलेला ओढा ही चिंता वेगळीच आहे. मतविभाजन होणार नाही याचा अंदाज फार आधीच भाजपला आला असावा. त्या पूर्वकल्पनेतूनच अशोक चव्हाण, बसवराज पाटील, अनंतराव देशमुख, डॉ. उल्हास पाटील अशा नेत्यांना भाजपमध्ये आणले असे दिसते.
याशिवाय, प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ३०-४० हजार किंवा त्यापेक्षा अधिक मतांची ताकद ठेवणाऱ्या बऱ्याच नेत्यांना गेली वर्ष-दोन वर्षांत भाजपमध्ये आणले गेले, त्यामागे हा सगळा विचार होता. महाराष्ट्रात पाच टप्प्यांत लोकसभा निवडणूक होणार आहे. मतविभाजनासाठी टप्पानिहाय रणनीती भाजप आखत असल्याची माहिती आहे. केवळ उमेदवार उभे करूनच मतविभाजन साधता येते असे नाही, त्याचे अनेक मार्ग असतात. एकेक टप्पा येईल तसतसे भाजपच्या खेळी सगळ्यांना कळतीलच. फडणवीसांचा ओव्हरटाइमदेवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात काय काय चाललेले असते. मध्यंतरी फडणवीस म्हणाले होते की, ‘शिंदे-अजित पवारांबाबत मी ट्रॅफिक पोलिसाची भूमिका बजावतो. कधी यांना थांबवा, कधी त्यांना जाऊ द्या, असे ट्रॅफिक जाम होऊ नये म्हणून माझे चाललेले असते.’ बरेच जण असे म्हणतात की, देवेंद्र यांचे आडनाव फडणवीस ऐवजी पाटील असते तर ते आणखी भारी ठरले असते. त्यांचे फडणवीस असणे त्यांच्यासाठी अडचणीचे ठरावे असे प्रयत्न सध्या त्यांच्याच पक्षात होत आहेत. सध्या भाजपमधली भांडणे सोडविण्याबरोबरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा त्रास कमी करणे, शिवसेनेतील अंतर्गत वादातही मध्यस्थी करणे असा ओव्हरटाइम ते सागरवर बसून करत आहेत. फडणवीसांकडे गेल्यावर मार्ग निघतो असे लोकांना वाटते. मुख्यमंत्री शिंदे हजारो लोकांना भेटतात, पण कोणालाही ‘भेटत’ नाहीत. म्हणजे त्यांच्या भेटीने समाधान होत नाही असे भेटून आलेले लोक बोलतात. गर्दी त्यांना आवडते, साधा सहज बोलणारा माणूस म्हणून लोकांनाही ते भावतात, पण गर्दीचे नियोजन त्यांना जमत नाही.
उमेदवारीचा अमरावती पॅटर्नअमरावतीतले झाडून सगळे नेते फडणवीसांना जाऊन भेटले की काहीही करा, आम्हाला नवनीत राणा नको. आदल्या दिवशी हे झाले अन् दुसऱ्या दिवशी नवनीत यांची थेट उमेदवारीच जाहीर झाली. रात्री १२ वाजता चंद्राच्या साक्षीने चंद्रशेखर बावनकुळे यांनी सगळ्यांचे ‘मनोमिलन’ घडवून आणले. भाजपचा हा उमेदवारीचा अमरावती पॅटर्न आहे. आम्ही देऊ तो उमेदवार गपगुमान स्वीकारा अन् कामाला लागा हा स्पष्ट संदेश दिला गेला आहे. आता सगळे प्रचाराला लागतील, त्याशिवाय पर्याय नाही. भाजपमध्ये सगळ्यांना दिल्लीची भीती वाटते. माढ्यात एक मोहिते पाटलांचा अपवाद सोडला तर बाकी सगळे कामाला लागलेच ना! ‘तुम्ही आमच्यासोबत नसाल तर आम्ही तुमच्या विरोधात आहोत’, असा स्पष्ट मेसेज तिथे वरून दिला गेला आहे. तरीही मोहिते दबले नाहीत तर त्यांना दाद ही द्यावीच लागेल.
आता नाही तर नंतर नाहीलोकसभा निवडणुकीत तीन पक्षांमधील कोणत्या नेत्यांनी आपल्या पट्ट्यात खरेच काम केले की नाही हे शोधण्याची एक पद्धत भाजपने तयार केल्याची माहिती आहे. कोणत्या नेत्याचा कोणकोणत्या गावांमध्ये प्रभाव आहे, कुठल्या भागात त्याच्या नावावर मतदान पडू शकते याची तिन्ही पक्षांच्या नेत्यांचा समावेश असलेली एक यादी तयार करण्यात आली आहे. निकालानंतर एकेकाच्या हातात रिपोर्ट कार्ड दिले जाईल. माझ्या पट्ट्यात आपला उमेदवार एकतर्फी चालला असा खोटा दावा कोणी केला तर मिळालेल्या मतांचा आरसा त्याला दाखवला जाणार आहे. भाजपचे एक नेते परवा याबाबत सांगत होते. त्या रिपोर्ट कार्डवरच सहा महिन्यांनी होणारी विधानसभा निवडणूक, त्यानंतरच्या महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीतील संधीचे प्रमाण ठरविले जाणार आहे.
काँग्रेसमध्ये अशी हिशेबाची व्यवस्था केली तर अनेक जण निमूटपणे काम करतील, पण तसे होत नाही हीच काँग्रेसची खरी अडचण आहे. विजयाचे अनेक बाप असतात, पराभव अनाथ असतो. उत्तरदायित्व निश्चित केले तर काँग्रेसमध्येही जय-पराजयाचे बाप कोण ते कळेल.