शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

काळे काका!

By admin | Published: September 06, 2016 3:44 AM

काळे काका अशांना कवटाळून घ्यायचे. ते स्वत:बद्दल फारसे बोलत नसत. त्यांना कुणी म्हटले ‘काका तुमचे काम फार मोठे आहे.

आपण फार काळ जगणार नाही ही गोष्ट त्यांना कळून चुकली असेल कदाचित, स्रेहांचलमधून निघताना काळे काकांनी थांबवले, ‘मी समाधानी आहे आणि आनंदीही...मला या वेदना अनुभवायच्या होत्या’सुरेश काळे परवा गेले. मेडिकल कॉलेजच्या कुटुंबाचे ते काका. कर्करोगाने उमेद हरवलेल्या रुग्णांच्या वेदनेशी त्यांची नाळ जुळली होती. मेडिकलमध्ये येणाऱ्या रुग्णांना त्यांचा आधार होता. दु:खितांचे अश्रू पुसण्यासाठी समाजसेवेचा वडिलोपार्जित वारसा असावाच लागतो असे नाही. मालगुजारीतून मिळालेल्या वलयातून अनेकांना अहंकाराचा रोग जडतो. असे अहंकाराने फसफसत असलेले समाजसेवक आपल्या अवती-भवती पाहायला मिळतात. काळे काकांना असा कुठलाही वारसा नव्हता आणि सेवेची शिकवणही नाही. कृषी विभागातील नोकरी सांभाळून ते रुग्णांची सेवा करायचे. एके दिवशी नोकरी सोडून दिली आणि स्वत:ला रुग्णसेवेत झोकून दिले. मेडिकलमध्ये येणारे रुग्ण हाच त्यांचा गोतावळा. तिथे ते सतत धावपळीत असायचे. रुग्णांना डॉक्टरकडे घेऊन जाणे, त्यांच्या उपचाराची व्यवस्था करणे, याच कामात ते व्यग्र असायचे. एखाद्या गरीब रुग्णासोबत रात्री कुणी नसेल तर रात्रभर त्याच्याजवळ ते थांबायचे. काका चिंतेत दिसले की समजून जावे, कुठल्या तरी रुग्णाची अवस्था त्यांना अस्वस्थ करून गेली आहे. कर्करुग्णाशी रक्ताचे नाते असले तरी आप्तस्वकीय त्याच्याशी अंतर ठेवून राहतात. काळे काका अशांना कवटाळून घ्यायचे. ते स्वत:बद्दल फारसे बोलत नसत. त्यांना कुणी म्हटले ‘काका तुमचे काम फार मोठे आहे. आम्हाला सत्कार करायचा आहे’. त्यावर त्यांचे उत्तर ठरलेले, ‘माझा सत्कार कशाला करता, त्याऐवजी रुग्णांची सेवा करा, त्यांना मदत करा. हाच खरा सत्कार आहे’. समाजाला अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांचा सत्कार नेहमी करावासा वाटतो. पण, त्यांच्यासारखी रुग्णसेवा आपण करू शकत नाही. त्यासाठी मन मोठे असावे लागते. आत्म्याच्या गाभाऱ्यात दीन-दुबळ्यांबद्दल करुणा असावी लागते. हे आपण करू शकत नसल्याचे अपराधीपण मनाला सतत बोचत असते. त्याचे प्रायश्चित घेण्यासाठी मग अशा कार्यकर्त्यांच्या सत्काराचा सोईचा मार्ग आपण निवडतो. काळे काकांना या मतलबी आणि सत्कारप्रवृत्त दुनियेची रीत ठाऊक असल्याने ते अशा सत्कारांना बळी पडले नाहीत आणि त्यांनी कुणाला प्रायश्चितही घेऊ दिले नाही. मेडिकलच्या कर्करोग विभागात रुग्णांना अत्याधुनिक उपचार मिळावेत यासाठी ते सतत भांडायचे. चार वर्षांपूर्वी मेडिकलच्या गेटसमोर त्यांनी आंदोलन केले. तत्कालीन आमदार आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार दरबारी हा प्रश्न मांडला. सरकारने स्वतंत्र कॅन्सर इन्स्टिट्यूटची नंतर घोषणाही केली. त्याचे खरे श्रेय काळे काकांना. पण, या कामाचे डफडे त्यांनी कधी वाजवले नाही. वर्षभरापूर्वी त्यांना कर्करोगाने गाठले. रुग्णांची सेवा करताना प्रकृतीकडे एव्हाना दुर्लक्ष झाले होते. त्यापूर्वी त्यांना क्षयरोग झाला. त्यातून बरे होत नाही तोच कर्करोग. डॉक्टर परिचयाचे असूनही मेडिकलच्या रांगेत ते इतर रुग्णांसोबत बसलेले दिसायचे. त्या अवस्थेतही ते वेदनेने कण्हत असलेल्या रुग्णांचे डोळे पुसायचे. आठवडाभरापूर्वी त्यांची प्रकृती खूपच खालावली. मेडिकलमधून त्यांना स्रेहांचल केंद्रात भरती करण्यात आले. उपचारांमुळे त्यांचे डोक्यावरचे केस गळून गेले होते, प्राणांतिक वेदना होत असल्याचे जाणवायचे. पण, काकांच्या चेहऱ्यावरील हास्य कायम होते. त्या अवस्थेतही त्यांचा जीव मेडिकलमधील रुग्णांमध्येच गुंतला होता. आपण फार काळ जगणार नाही ही गोष्ट त्यांना कळून चुकली असेल कदाचित, स्रेहांचलमधून निघताना त्यांनी थांबवले, ‘मी समाधानी आहे आणि आनंदीही... मला या वेदना अनुभवायच्या होत्या....’. या देवमाणसाच्या वाक्याची अर्थसंगती कशी लावायची? तेवढी आपली कुवतही नाही. कर्करुग्णांची सेवा करताना त्यांच्या वेदनेशी एकरूप होणाऱ्या या भल्या माणसाला त्या वेदना अनुभवाव्या वाटाव्यात! करुणेच्या या तळाशी आपण नाही पोहचू शकत. कारण ‘दुरितांचे तिमिर जावो’ अशी प्रार्थना करीत असताना ‘हात पाय सुखाचे ठेव’ असे वैयक्तिक मागणेही आपण मागत असतो. तो माणसाचा सहजभाव आहे. काळे काका नावाचा हा भला माणूस या स्वार्थभावापलीकडे कधीचाच गेला होता. तो कुठल्या मातीचा होता, माहीत नाही. पण, सेवेची, दिव्यत्वाची प्रचिती मागे ठेवून तो निघून गेला.- गजानन जानभोर