भारतमातेला रक्ताची तहान लागली आहे काय? जनसंघाचे एक पूर्वाध्यक्ष बलराज मधोक यांनी देशातील एका धर्मांध संघटनेविषयी तसे आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे. मात्र एखाद्या एकारलेल्या संघटनेची बरोबरी भारतमातेशी कशी करता येईल? आपल्या संघटनेलाच देश, देव, माता-पिता, गुरु व तसेच काही समजणाऱ्यांच्या मनात आपल्या संघटनेचे असे व्यसन भारतमातेलाही असावे असे येणे व ते पूर्ण करण्याची त्याने जाहीर प्रतिज्ञा करणे हे त्याच्या वेडात बसणारे असते की आंधळ्या भक्तिभावात? कोणतेही एकारलेपण वेडसरपणाच्या जवळ जाणारेच असते अशी मानसशास्त्राचीही धारणा आहे. त्यामुळे संघाचे पुढारी व प्रचारप्रमुख डॉ. कुंदन चंद्रावत यांनी उज्जैन येथील एका सूडसभेत ‘केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचे शीर कापून आणणाऱ्याला एक कोटी रुपयांची दक्षिणा देण्याचा’ संकल्प जाहीर केला असेल आणि त्याच वेळी ‘भारतमातेला तीन लक्ष मानवी शिरे अर्पण करण्याची’ प्रतिज्ञा केली असेल तर तो त्यांना आलेला वेडाचा झटका समजायचा की त्यांच्या भक्तिभावनेला हिंसाचाराची शिंगे फुटली आहेत असे म्हणायचे? मध्ययुगात धर्माच्या नावावर लढाईला निघालेले राजे वा बादशाह अशा गर्जना करून शत्रूंच्या मनात धडकी भरविण्याचा प्रयत्न करीत. त्यांच्यातल्या कोणत्या राजाने वा बादशाहने किती शिरांचे मनोरे रचले याच्या कहाण्या इतिहासात आहेतही. अलीकडे अशा कहाण्या तालिबान, अल-कायदा, बोकोहराम किंवा इसिससारख्या धर्मांध संघटनांच्या नावावर आहेत. मात्र त्यांनी कापलेल्या शिरांची संख्या लाखांच्या आसपास जाताना अजून दिसली नाही. या पार्श्वभूमीवर केरळवर हल्ला चढवून त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याचे मस्तक धडावेगळे करण्याची आणि त्यासोबत आणखी तीन लक्ष मानवी मस्तके भारतमातेला अर्पण करण्याची चंद्रावत व त्यांच्या पक्षाची तयारी धारदार आणि मोठी आहे हे आपण मान्य केले पाहिजे. अहिंसा ही जशी मानवी प्रवृत्ती आहे तशी हिंसा हीदेखील मानवी मनाचीच एक कडा आहे. हिटलरने मारलेले दोन कोटी, स्टॅलिनने जीव घेतलेले पाच कोटी आणि माओने बळी घेतलेले सात कोटी हे सारे या कडेचेच शिकार आहेत. (ही माणसे त्यांनी युद्धात मारली नसून त्यांना विरोध केला म्हणून मारली गेली आहेत हे लक्षात घेतले की चंद्रावत आणि त्यांचे घोषणाबाज सहकारी या साऱ्यांच्या मानसिकतेचे साम्य सहज कळून चुकते.) शीरसम्राट चंद्रावत यांनी उज्जैनच्या ज्या सभेत ही भीषण प्रतिज्ञा केली तीत भाजपाचे खासदार चिंतामणी मालवीय आणि आमदार मोहन यादव हेही उपस्थित होते. केरळात काही संघ कार्यकर्त्यांचे अलीकडे जे खून झाले त्याच्या निषेध सभेत हे पुढारी बोलत होते. खून वा बलात्कारासारखे गुन्हे करणाऱ्यांना शिक्षा करणे हे कायदा व सरकारचे काम आहे. मात्र २०१४च्या निवडणुकीत भाजपाचा विजय झाल्यापासून ते अधिकार आपल्याकडे आले आहेत असा समज करून घेतलेल्या काही अतिरिक्त शहाण्यांमध्ये चंद्रावतसारखी माणसे आहेत. तशीही एका व्यक्तीच्या खुनासाठी साऱ्या समाजाला कापून काढणे वा शिक्षा ठोठावणे ही परंपरा आपल्यातही आहे. गांधीजींच्या खुनानंतर महाराष्ट्रातील शेकडो ब्राह्मणांची घरे जाळली गेली. इंदिरा गांधींवर कोणा शिखाने गोळ्या झाडल्या म्हणून चार हजारांवर शिखांची दिल्लीत व अन्यत्र जाळून हत्त्या केली गेली. गोध्रा स्टेशनवर ५६ हिंदू जाळले तेव्हा त्याचा सूड म्हणून गुजरातमध्ये दोन हजारांवर मुसलमानांची कत्तल केली गेली. माणसांचा आणि विचारांचा राग समाजावर काढायचा ही, सामान्यपणे ज्यांच्याकडे सत्ता वा संख्याबळ असते त्यांची वृत्ती आहे. त्यातूनच चंद्रावतासारखे राक्षसी लोक पुढे येतात. त्यातून राजकीय पक्षांजवळ एक छानशी पळवाटही असते. ती त्यांना या चंद्रावतांसारख्यांपासून वाचवीत असते. ‘ते एकट्या चंद्रावतांचे म्हणणे आहे. त्याचा आमच्याशी संबंध नाही’, असे म्हणून भाजपा व संघाला स्वत:ची सुटका करून घेता येते. तरीही एक गोष्ट येथे नोंदविणे आवश्यक आणि वैध आहे. ‘एखाद्याचा शिरच्छेद करा’ असे म्हणणे हाच मुळी कायद्यानुसार गुन्हा आहे. ही हत्त्येची प्रत्यक्ष चिथावणी आहे आणि त्या चिथावणीला एक कोटी रुपयांच्या बक्षिसाची जोड असणे ही बाब त्या खुनाचा इरादा मजबूत असल्याचे सांगणारी आहे. कोणत्याही लोकशाही देशात असे बोलणाऱ्याला तत्काळ जेरबंद करण्यात आले असते. पण भारतात असे सारे चालतच असते. कुणाची जीभ कापा, कुणाचे डोळे काढा, कुणाची लेखणी थांबविण्यासाठी त्याचा खून पाडा यासारख्या गोष्टी म्हणणे आणि त्या प्रत्यक्षात करणे हे आता भारतमातेच्या अंगवळणी पडलेले प्रकरण आहे. त्यामुळे चंद्रावताला उद्या कोणी धर्मवीर वा राष्ट्रवीर म्हणून गौरविले आणि त्याला त्याच्या विचारसरणीच्या संरक्षक सेनापतीची उपमा दिली तर त्याचे आपणही आश्चर्य वाटू देण्याचे कारण नाही. तरीही शिल्लक राहणारा प्रश्न आपल्या राजकारणाला जडलेली रक्ताची चटक कधी संपेल हा आहे. त्यातून ही चटक भारतमातेच्या पवित्र नावाला जोडून सांगितली जात असेल तर तो राष्ट्रीय अपराध होतो की नाही? मोदींचे सरकार या चंद्रावताच्या मुसक्या आवळते की त्याचा संकल्प तसाच जिवंत राहू देते हे यापुढे आपण पहायचे आहे.
रक्ताची तहान...!
By admin | Published: March 03, 2017 11:52 PM