‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ ही म्हण दिवसेंदिवस कशी निरर्थक ठरत चालली आहे आणि ज्याला ठेच लागते तो स्वत:देखील शहाणा होईलच याची कशी खात्री राहिलेली नाही, याचे जिवंत उदाहरण म्हणजे केरळात रविवारी पहाटे लागलेली अत्यंत उग्र आणि भीषण आग. या दुर्घटनेत शंभराहून अधिक लोक आगीच्या भक्ष्यस्थानी पडले तर चारशेहून अधिक जखमी झाले. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना तातडीने तिथे जावे लागावे यातच या दुर्घटनेचे गांभीर्य दिसून येते. आता या अपघाताची किंवा स्पर्धेतून अथवा राजकीय आणि जातीय ईर्ष्येमधून निर्माण झालेल्या घटनेची म्हणे उच्च स्तरीय न्यायालयीन चौकशी केली जाणार आहे. पण चौकशी कशाकशाची करणार हा एक प्रश्नच आहे. केरळच्या कोलम जिल्ह्यातील पुत्तिंगल येथील देवी मंदिरात साजऱ्या होत असलेल्या वार्षिक उत्सवाच्या वेळी शोभेच्या दारुची जी आतषबाजी केली गेली, तिच्यातून संबंधित दुर्घटना घडली. आतषबाजीसाठी जमा केलेल्या शोभेच्या दारुपैकी जवळजवळ सत्तर टक्के दारु संपुष्टात आल्यानंतर एक ठिणगी दारुच्या उर्वरित साठ्यावर जाऊन पडली आणि सारीकडे हाहाकार माजला. वार्षिक उत्सवासाठी आणि सदर आतषबाजी बघण्यासाठी हजारो लोक तिथे जमले होते आणि त्यामुळेच मृत आणि जखमींच्या संख्येत मोठी वाढ झाली. आतषबाजी हादेखील वार्षिक सोहळ्याचाच अविभाज्य भाग मानला जात असला तरी अशा प्रसंगी होणाऱ्या आतषबाजीतील धोके लक्षात घेऊन कोलमच्या अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्याने आतषबाजीस परवानगी नाकारली होती. परंतु हा अधिकारी धर्माने मुस्लीम असल्याने त्याच्या निर्णयास काहींनी धार्मिक रंग फासण्याचा प्रयत्न केला. मंदीर व्यवस्थापन समितीला आतषबाजी हवीच असल्याने व सध्या केरळात निवडणुकीचे वातावरण असल्याने परवानगी नाकारली जाण्याच्या निर्णयाला राजकीय रंगदेखील प्राप्त झाला. दुर्दैवाची बाब म्हणजे कोलमचे पोलीस आयुक्त म्हणतात की मंदीर व्यवस्थापन समितीने त्यांची दिशाभूल करताना आतषबाजीस अनुमती मिळाल्याचे खोटेच सांगितले. वस्तुत: समितीने जे सांगितले त्याची खातरजमा करुन घेणे आयुक्ताना अवघड नव्हते पण त्यांनी ते न करता समितीने जे सांगितले त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला. परंतु त्याहूनही दुर्दैवाचा भाग पुढेच आहे. जिल्हा दंडाधिकाऱ्याने आतषबाजीस परवानगी नाकारण्यापूर्वी संबंधित तहसीलदाराकडून अहवाल मागविला होता. या अहवालात तहसीलदाराने स्पष्टपणे असे म्हटले होते की आयोजक केवळ आतषबाजी करणार नसून आतषबाजीची स्पर्धा त्यांनी आयोजित केली आहे व ती संपूर्ण परिसराच्या दृष्टीने धोकेदायक आहे. तरीही देवस्थान समितीच्या लोकानी आपल्याला तोंडी अनुमती मिळाल्याचा दावा केला आणि आतषबाजीची स्पर्धा चालू केली, त्यावेळी पोलीस तिथे जातीने हजर होते. पण त्यांनी ती रोखण्याऐवजी तिचा ‘आनंद’ घेण्यात धन्यता मानली. म्हणूनच चौकशी कशाकशाची करणार?
शहाणपण भस्मसात
By admin | Published: April 12, 2016 4:06 AM