सचिन जवळकोटे, निवासी संपादक, लोकमत, सोलापूर -इंद्र दरबारात अप्सरांनी टूम काढली की, आमचीही एखादी समर ट्रिप व्हायला हवी. हल्ली जो तो फिरायला जातो, आम्ही का नाही?- मग काय.. महाराजांच्या आदेशानुसार नारदमुनी सर्व ललनांना घेऊन भूतलावर पोहोचले. अहमदाबादचं नामांतरित स्टेडियम पाहून पुढे सरकले. अगोदर ‘मुंबई’ की ‘पुणं’ या विचारात महाराष्ट्राच्या सीमेवर पोहोचले. गुजरात-महाराष्ट्राच्या सीमेवर प्रचंड गर्दी दिसल्यानं त्यांच्या गाड्या कचकन थांबल्या.रस्त्यालगत एक जण निपचित पडला होता. दोन्ही राज्यांचे पोलीस त्याचा पंचनामा वेगवेगळ्या पद्धतीनं करत होते. ‘साहेब.. बॉडी आपल्याकडच्या माणसाची असावी. कारण, पायात वापरून-वापरून झिजलेल्या स्लीपर्स दिसताहेत. मात्र बॉडीचा त्रासलेला चेहरा समोरच्या स्टेटच्या दिशेनं असल्यामुळं ही नक्कीच सुसाइड केस असावी’,- आपल्या वरिष्ठांना मोबाइलवरून इकडचे फौजदार पाटील रिपोर्टिंग करत होते. दुसरीकडं तिकडचे फौजदार पटेल आपल्या बॉसला सांगत होते, ‘डेंजरस मॅटर छे.. आपडा माणस नुं मर्डर छे.. हे ऐकून नारदांची टीम दचकली. ‘व्यक्ती कोणत्या राज्यातली’, यावर आत्महत्या किंवा हत्या ठरत असते, हा विचित्र अनुभव नारदांच्या टीमला पहिल्यांदाच आला होता. एवढ्यात गाडीतून उतरलेल्या मेनकेला पाटलांनी हटकलं, ‘ओऽऽ मॅडम.. तुम्ही कोण.. तुमचं काय काम? ’ मेनका संस्कृतमध्ये उत्तरली, ‘आम्ही वरून आलो आहोत.’तिची भाषा कोणती हे समजलं नाही. मात्र, पाटलांना एवढं नीट कळलं की, ही नक्कीच नॉन मराठी बाय. त्यांनी तत्काळ आपल्या बॉसला मेसेज पाठवला, ‘सुसाइड मॅटरमध्ये बाहेरच्या हिरॉइनचाही हात दिसतोय. उचलू का?’तिकडून लगेच रिप्लाय थडकला, ‘जस्ट वेट. आम्ही मंत्रालयातच आहोत. विचारून सांगतो.’ एका नॉन मराठी महिलेची चौकशी केली जातेय, हे पाहून ‘फौजदार पटेल’नी हळूच चॅनलवाल्यांना कळवलं. लगेच ब्रेकिंग न्यूज झळकली, ‘हत्या का मामला दबाने की गंदी साजीश !’ मुंबईतून गाड्या सुटल्या. नागपुरातूनही कैक नेते सुसाट निघाले. होम मिनिस्टरनी आरोप केला, ‘या आत्महत्येला विरोधकच जबाबदार. हा तर महाराष्ट्र द्रोही कट.’ विरोधी नेत्यांनीही खणखणीत प्रत्युत्तर दिलं, ‘या हत्येचे हजारो पुरावे आमच्या जॅकेटच्या खिशात. हे तर देशद्रोही कारस्थान.’ आश्चर्यचकित झालेल्या उर्वशीनं नारदांना हळूच विचारलं, ‘हे दोन्ही नेते विदर्भातले. तरीही प्रत्येक मुद्द्यावर भांडतात’ गंभीर होऊन मुनी म्हणाले, ‘हीच तर विदर्भाची खंत आहे. नेते कधी एक होत नाहीत म्हणूनच विदर्भ कधी वेगळा होत नाही.’या मृत्यूचा तपास कसा करायचा, यावर दोन्हीकडच्या पोलिस अधिकाऱ्यांपेक्षा ‘बूम’वाल्यांनीच अधिक पुढाकार घेतला. अखेर ‘सीआयडी’ची टीम बोलावण्याचा निर्णय घेतला गेला. फटाफट कॉल झाले. टीमही आली. गाडीतून उतरून ‘एसीपी प्रद्युम्न त्या व्यक्तीजवळ गेले. रंभेनं चमकून विचारलं, ‘आता या घटनेशी कलाकारांचा काय संबंध’ गालातल्या गालात हसत मुनी उत्तरले, ‘आजकाल क्राइम अन् पॉलिटिकल मॅटरमध्ये आर्टिस्ट मंडळींचाच गवगवा वाढत चाललाय.’ एवढ्यात बोटं नाचवत ‘एसीपी प्रद्युम्न’ चित्कारले, ‘डेडबॉडी तो जिंदा है.. कुछ तो गडबड है दयाऽऽ ’ ..तोंडावर पाणी मारताच ती व्यक्ती उठून बसली. दोन्हीकडच्या पोलिसांनी प्रश्नांचा भडिमार सुरू केला. चेहऱ्यावरचा घाम पुसत घाबऱ्या-घुबऱ्या आवाजात कळवळून तो एवढंच बोलू शकला, ‘ना मी महाराष्ट्रद्रोही. ना मी देशद्रोही. कोरोनाच्या विळख्यात सापडलेला अन् लॉकडाऊनच्या तडाख्यात भरकटलेला मी तर एक साधा कॉमन मॅन. मला सुखानं जगू देऊ शकत नसाल तरी ठीक.. पण किमान माझ्या मरणयातनेवर तरी राजकारण करू नका ना !’ -मुनींची टीम गपगुमान निघाली. नारायणऽऽ नारायणऽऽ sachin.javalkote@lokmat.com