डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी नावाचे थोर थोर गृहस्थ पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचे अघोषित प्रवक्ते असल्याची जी टीका काँग्रेस पक्षाने केली आहे तिच्यात अणुमात्रही अतिशयोक्ती नाही. खरे तर स्वामी यांना बाटलीतील राक्षसाची उपमा देणे अधिक सयुक्तिक ठरेल. या राक्षसाने म्हणे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांचा घास घेतला आहे आणि आपणच तो घेतला असे सांगत सध्या ते ‘जितं मया’ अशा आरोळ्या ठोकत आहेत. आता म्हणे त्यांना घास घ्यायचा आहे तो केन्द्र सरकारचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांचा. तो घेऊन झाला की केन्द्राच्या सेवेतील सत्तावीस अधिकाऱ्यांची एक ‘हिट लिस्ट’ त्यांच्या खिशात तयार आहे. अरविंद सुब्रह्मण्यम अनिवासी भारतीय आहेत आणि अमेरिकेचे नागरिक आहेत. पण ते केवळ त्या देशाचे नागरिक आहेत इतकेच नव्हे तर अमेरिकेचे एजंट आहेत आणि भारताच्या हिताच्या विरुद्ध जाणारे आहेत असा स्वामींचा त्यांच्यावर आरोप आहे. एक बाब निश्चित की, अरविंद सुब्रह्मण्यम गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेन्द्र मोदी यांचे कठोर टीकाकार होते. तरीही मोदी सरकारनेच त्यांना आपला आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्त केले होते. त्यावरुन तेव्हां मोदींनी स्वामींचा सल्ला घेतला नसावा असे दिसते. रघुराम राजन यांचे तसे नव्हे. त्यांची नियुक्ती संपुआच्या द्वितीय सत्ताकाळात झाली असली तरी सत्तांतरानंतर नव्या सरकारने त्यांची कारकीर्द सुरु ठेवली होती. पण तितकेच नव्हे तर मोदींनी प्रारंभीच्या काळात राजन यांची जाहीर प्रशंसादेखील केली होती. दरम्यान अत्यंत उटपटांग अशी वैश्विक ख्याती प्राप्त केलेल्या स्वामींना पंतप्रधानांनी राज्यसभेत आणून बसवले. आणि लगेचच रघुराम राजन मनाने पूर्ण भारतीय नसल्याचा व त्यांच्या असण्याने देशाला आर्थिक अवकळा येत चालल्याचा शोध स्वामी यांना लागला. ज्या सरकारचा ‘स्वामी’च इतका अगोचर आहे, त्या सरकारबरोबरचे संबंध पुढे चालू ठेवण्यापेक्षा अध्ययन आणि अध्यापन या मूळ आवडीच्या क्षेत्राकडे वळलेले बरे असा विचार राजन यांनी केला तेव्हां स्वामी यांना त्यात स्वत:चा विजय दिसला. त्यानंतर तर स्वामींना जणू चेवच आला आहे. परिणामी त्यांना याचसाठी मोदींनी खासदार केले असे म्हणणे अतार्किक ठरु नये. स्वामी राजन यांच्या दिशेने चिखलाचे गोळे फेकत होते, तेव्हां त्यांना कुणीही गप्प केले नाही पण अरविंद सुब्रह्मण्यम यांच्यावर त्यांनी दात धरताच अर्थमंत्री अरुण जेटली आणि वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वामींचे मत व्यक्तिगत मत असल्याचे म्हटले आहे. पण या दोहोंच्या प्रतिक्रियांना अर्थ नाही कारण खुद्द जेटलीदेखील स्वामींच्या हिट लिस्टवरच आहेत. अशा स्थितीत स्वामींना केवळ मोदीच गप्प करु शकतात पण अडवाणी-मुरलीमनोहर यांचे निर्माल्य करणारे मोदी स्वामींकडे कक्ष देत नाहीत यातच सर्व काही येते. पण एक बाब मोदीही विसरतात आणि ती म्हणजे बाटलीतल्या राक्षसाला जो बाहेर काढतो त्यालाच तो राक्षस एक ना एक दिवस गिळंकृत करायला मागेपुढे बघत नसतो.