शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार! कमला हॅरिस यांना पराभूत करत मिळवला दणदणीत विजय
2
भारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती यांचा विजय, अमेरिकेच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा मारली बाजी! 
3
Maharashtra Election 2024: राज ठाकरेंचा 'या' मतदारसंघातील उमेदवाराबद्दल मोठा निर्णय
4
AUS vs IND BGT : ऑस्ट्रेलियात Team India चा दारुण पराभव होणार; रिकी पाँटिंगची 'मन की बात'
5
“राहुल गांधी शहरी नक्षलवाद्यांचे समुपदेशन करण्यासाठी महाराष्ट्रात आले”: चंद्रशेखर बावनकुळे
6
"जरांगेंच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांचं नुकसान; ...आम्ही व्यवस्थित डाव मारू!"; काय म्हणाले बच्चू कडू?
7
"तुम्हा सर्वांना उडवून टाकेन..."; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी
8
"...तर पाय कलम करू", नितेश राणेंना मारण्याची धमकी देणाऱ्या सिद्दिकींना नारायण राणेंचे उत्तर
9
AUS vs IND : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी यजमानांची 'भारी' तयारी; क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय
10
Waaree Energies Share Price : एका आठवड्यात 'या' शेअरमध्ये ४९ टक्क्यांची वाढ, बनली १ लाख कोटींची कंपनी; गुंतवणूकदार मालामाल
11
Salman Khan : हस्ताक्षरामुळे उघड होणार सलमान खानच्या घरावरील गोळीबार आणि पत्राचं रहस्य
12
Raha Kapoor Birthday: दोन वर्षांची झाली राहा कपूर, आजी नीतू अन् आत्या रिद्धीमाने शेअर केला क्युट फोटो
13
भारत ऑस्ट्रेलियाशी टेस्ट मालिका हरला तरीही WTC Final गाठू शकतो, जाणून घ्या गणित
14
मुस्लिमांसाठी १० हजार कोटींचं बजेट; मविआच्या जाहीरनाम्यात समाजवादी पक्षाची मागणी
15
लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
16
‘गुरुचरित्र’सारखा प्रभाव, दत्तात्रेयांच्या आद्य अवताराचे सार; मनोभावे स्मरण, लाभेल पुण्य!
17
Swiggy IPO गुंतवणूकीसाठी खुला, अँकर गुंतवणूकदारांकडून उभे केले ५००० कोटी; GMP काय?
18
कोण आहे अमन देवगण? 'आजाद'मधून करतोय पदार्पण, अजय देवगणसोबत आहे हे कनेक्शन
19
'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीवर सावत्र मुलीचे नवे आरोप; म्हणाली, "ती माझ्या आईच्या बेडवर..."
20
सीमेवर नवी ताकद... आता भारतीय लष्कराला मेड इन इंडिया ASMI शस्त्र मिळणार!

काका, पुतण्या, भाजप अन् गोंधळ... पवार वटवृक्ष, पण 'ही' प्रश्नपत्रिका सोपी नाही!

By यदू जोशी | Published: July 07, 2023 7:37 AM

काका, पुतण्यांच्या राजकारणानं महाराष्ट्र पुन्हा एकदा ढवळून निघाला आहे. सर्वसामान्य मतदाराला मात्र वेड लागण्याची पाळी आली आहे.

अजित पवार यांना सोबत घेतल्याने भाजपची ताकद नक्कीच वाढली; पण नैतिकतेवर प्रश्नचिन्ह लागले. ज्यांच्याविरुद्ध भाजपचे नेते, कार्यकर्ते यांनी आरोपांची राळ उठवली, जिल्ह्या-जिल्ह्यात संघर्ष केला, आंदोलने केली त्यांच्याच गळ्यात हार टाकायची पाळी भाजप अन् शिंदेंच्याही आमदार, खासदार, नेते, कार्यकर्त्यांवर आली.  छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडेच काय, अजित पवारांच्याही दादागिरीविरोधात दोन हात करणाऱ्यांचे हात या निर्णयाने कलम झाले आहेत. एवढेच नव्हे, तर भाजपचा परंपरागत मतदार अस्वस्थ आहे. ‘हे असे लोक सोबत राहिले तर आम्ही नाही देणार कमळाला मत’ असे ते बोलून दाखवत आहेत. बाकीच्यांमध्ये अन् आमच्यात फरक काय राहिला मग, असा त्यांचा सवाल आहे. संघ परिवारातील घरांच्या भिंतींना भाजपच्या नेत्यांनी थोडेही कान लावले ना तरी हेच ऐकायला येईल. सामान्य मतदाराला वेड लागण्याची पाळी आली आहे.

पहाटेच्या शपथविधीनंतर अशीच अस्वस्थता परिवारात आली होती. आता राष्ट्रवादीचे भूत नाचवून का घेतले गेले, असा सवाल कट्टर लोक करत आहेत. नेते, लोकप्रतिनिधीही धक्क्यातून बाहेर आलेले नाहीत. त्यांच्या उद्विग्नतेला गेल्या सहा दिवसांत भाजपच्या एकाही नेत्याने हात घातलेला नाही. ‘आपलेच आहेत, जातील कुठे’ ही बेपर्वाई आज ना उद्या अंगावर येऊ शकते. अजित पवार, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांचे आरोप करणाऱ्यांनीच त्यांना पवित्र करून घेतले याचे सखेद आश्चर्य अनेकांना वाटले आहे.  शिंदेंसोबतच भावना गवळी, यशवंत जाधव यांच्यासाठीही भाजपने वॉशिंग मशीन वापरली होती. आता लोकसभेच्या ४२ जागा जिंकण्याच्या नादात राष्ट्रवादीला पवित्र करून ‘आपल्या’ विश्वास टाकणाऱ्या मतदारांशी प्रतारणा कितपत परवडेल हाही प्रश्न आहेच.

देशातील सर्व विरोधी पक्षांची मोट बांधायला शरद पवार निघाले अन् आठच दिवसांत पवारांना भाजपने घरातच दणका दिला. साडेपाच दशके  राजकारणात असलेल्या पवार यांनी केलेल्या अचूक खेळींनी आजवर अनेकांचे राजकारण संपविले. पवारांशी पंगा घ्यायला दिग्गज नेते घाबरत आले आहेत. अशा पवारांना घरातच जायबंदी करण्याचे भाजपच्या श्रेष्ठींचे सध्याचे धोरण दिसते. अजित पवार यांचे बंड त्यातूनच घडविले गेले. महाविकास आघाडीचा प्रयोग करणारे, उद्धव ठाकरेंना स्वत:कडे ओढणारे शरद पवार २०२४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आणखी असे काही करतील की त्यामुळे भाजपचे मोठे नुकसान होईल हे लक्षात घेऊन त्यांना दणका दिला गेला. २०१९ च्या बंडावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला व दिल्लीला कळविले. यावेळी दिल्लीने फडणवीसांच्या मदतीने पुढाकार घेतला. फडणवीस यांनी साहसवादी राजकारणाचा प्रत्यय पुन्हा एकदा देत करेक्ट कार्यक्रम केला.

पवार घराण्याच्या चिरेबंदी वाड्याला भगदाड पडले..  पवार यांनी गोपीनाथ मुंडेंपासून बरीच घराणी फोडली. या चक्राने आज त्यांचाच भेद केला.  भाजपने केवळ शरद पवार यांना घायाळ केले नाही, तर एका घराण्याच्या राजकारणावर टाच आणली. उद्धव ठाकरे एकांड्या शिलेदाराप्रमाणे भाजपशी दोन हात करत आहेतच, आता ती वेळ पवारांवर आली आहे. घराण्यांची मक्तेदारी संपवत असतानाच प्रादेशिक पक्ष क्षीण करत राजकारणाचा डायग्राम बदलण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतो. शेत वाढवले की पीक वाढते. ओबीसी व्होट बँकेवर निर्भर असलेल्या भाजपने अजितदादांच्या निमित्ताने मराठा व्होट बँकेला कुरवाळले आहे. ‘यावेळच्या अजितदादांच्या बंडाला शरद पवार यांचा पाठिंबा होता, त्यांच्या संमतीनेच सगळे घडले आणि ही सगळी साहेबांचीच खेळी आहे’, अशी थिअरी दिली जात आहे. यात कुठलेही तथ्य नाही. अजित पवार आणि इतर सहकाऱ्यांना सत्ता मिळवून देण्यासाठी शरद पवार स्वत:चे राजकीय अस्तित्व धोक्यात आणतील अशी कोणतीही शक्यता नाही. संमती असती तर काका-पुतणे एवढे एकमेकांना भिडले नसते.

अजित पवार बंड करण्याच्या पवित्र्यात आहेत आणि ते कधीही भाजपसोबत जाऊ शकतात याची पूर्ण कल्पना मोठ्या पवारांना नक्कीच असावी. २०१९ मध्ये ते सर्वांना रोखू शकले, कारण समोर सत्ता दिसत होती. यावेळी तशी स्थिती नव्हती. देण्यासाठी त्यांच्याकडे सत्तेचे भांडे नव्हते. अजित पवार अन् अनेक आमदार सोडून जाताना शरद पवारांकडे असहाय होऊन पाहत राहण्याऐवजी दुसरा पर्याय नव्हता. याआधी चारवेळा भाजपसोबत जाण्याची तयारी राष्ट्रवादीने केलेली होती; पण साहेबांनी व्हेटो वापरला हे आता अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्या विधानांतून समोर आलेच आहे. चारवेळा बैलाचा दोरखंड सोडला; पण बैलाला गोठ्याबाहेर जाऊ दिले नाही तर पाचव्यांदा बैलच ढुसकणी मारून पळणारच; इथे तसेच झाले. पुतण्याने काकांचे जोखड झुगारले. शरद पवार संपले असे मात्र अजिबात नाही. वटवृक्ष आहे; सहजासहजी पडणार नाहीच.

ही प्रश्नपत्रिका सोपी नाहीपरवाच्या भाषणात अजित पवार रोखठोक बोलले, मात्र आयुष्यात ज्यांनी सगळे काही दिले त्यांच्याबद्दल अजितदादा ज्या पद्धतीने बोलले ते अभिरुचीला धरून नव्हते. आपले राजकीय भवितव्य कोणत्या नेत्याच्या नेतृत्वात सुरक्षित आहे, याचा विचार कोणताही राजकारणी करत असतो हे लक्षात घेता त्यांच्या समर्थक आमदारांचा आकडा वाढेल. अशक्य ते शक्य करून दाखविण्याची ताकद राखून असलेले शरद पवार नावाचे जादुगार आता बाजी पलटवू शकतील, असे वाटत नाही. बाळासाहेबांना बडव्यांनी घेरले आहे, असे बंडाच्या वेळी म्हणताना भुजबळ, राणे यांनी बाळासाहेबांच्या राजकीय विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लावले नव्हते. ‘भाजपच्या दारात चारवेळा नेले आणि मग स्वत:च माघारी फिरले,’ असा गंभीर आरोप त्यांनी काकांवर केला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देणे सोपे होते, कारण त्यांना लगेच पेशवाई चिकटवता येत होती.

पुतण्याने दिलेली प्रश्नपत्रिका सोपी नाही, कारण ती रक्ताच्या नात्याने लिहिली आहे. एका ताटात आता तिघे जेवतील, त्यात राष्ट्रवादीची भूक मोठी. त्यामुळे शिंदे गटाची अस्वस्थता साहजिक आहे. पण खोके, खोके म्हणणारे अर्धे लोक कमी झाले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने बळ मिळाले हा फायदा झालाच. शिंदे-फडणवीस-अजित पवार या तीन तलवारी एकाच म्यानात वरच्यांच्या दबावाने राहतील. वरचे ठरवतील तेव्हा खटके सुरू होतील, पण लोकसभेपर्यंत ते शक्य नाही. २०२४ पूर्वी शिंदेंना भाजपने हटविले तर ती घोडचूक असेल. राज्यात जे काही चालले आहे त्याचा फायदा उचलण्याची नामी संधी काँग्रेसकडे आहे. पण ज्या पक्षाचे काही नेते भाजपच्या जाळ्यात अडकत चालले आहेत, त्या पक्षाकडून अपेक्षा ती काय करायची?

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षSharad Pawarशरद पवार